ग्रंथ परिक्षण : पुस्तकांवर बोलू काही... प्रा.डाॅ.प्रकाश मोगले एक चांगलं आत्मकथन वाचल्याच समाधान देणारं : अक्षरनाती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 24 May 2020

ग्रंथ परिक्षण : पुस्तकांवर बोलू काही... प्रा.डाॅ.प्रकाश मोगले एक चांगलं आत्मकथन वाचल्याच समाधान देणारं : अक्षरनाती

निर्मलकुमार सूर्यवंशी हे यशस्वी प्रकाशक, ऊत्तम  कवी नि चांगला माणूस म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हे तिनही गुण एकत्र येणे तसे दुर्मिळच. अक्षरनाती हे त्यांचे आत्मकथन.  गेली चाळीस वर्षे ते नांदेडच्या साहित्य, संस्कृतीविषयक उपक्रमाचे भागिदार/ साक्षीदार आहेत. त्यांच्या आत्मकथनातून ते नांदेडला कसे आले, कसे शिकले,नरहर कुरूंदकर यांच्या संपर्कात येऊन त्यांचे आवडते विद्यार्थी कसे झाले,  प्रकाशन व्यवसाय कसा सुरू केला, त्यातील चढऊतार यांची जशी माहिती मिळते त्याच प्रमाणे गेल्या चाळीस वर्षातील नांदेडमधील साहित्यिक,साहित्यविषयक  चळवळी यांचाही तपशिलवार नि रंजक  ईतिहास वाचकाला ज्ञात होतो. अक्षरनातीमधून  नरहर कुरूंदकर ,  रविचंद्र हडसनकर, दत्ता भगत, सुधाकर डोइफोडे, शेषराव मोरे,जगदिश कदम आदिंच्या व्यक्तीमत्वावरही प्रकाश पडतो. पेंटर रविचंद्र हडसनकरांना ऊभे करण्यात कृष्णामायची मदत जशी महत्वाची आहे, तशी नागोराव म्हणजे निर्मलकुमारांचीही मदत मोलाची आहे.  कृष्णामायचे व्यक्तीचित्रण अतिशय लोभस नि ठळक ऊभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. चाळीस एकर शेती नि पदरात दोन लहान मुलं घेऊन जीवनाशी दोन हात करत जगणारी, दोन्ही मुलांना घडवणारी करारी बाण्याची कृष्णामाय वाचकांच्या कायम स्मरणात राहाते. नरहर कुरूंदकरांंची एक आठवण त्यांच्या थोरपणावर प्रकाश टाकणारी आहे. निर्मलकुमार यांना एक हजार रूपयांची गरज असते.ते कुरूंदकरांना पैसे मागतात.कुरूंदकरांकडे तेवढे पैसे नसतात.ते सहकारी  अध्यापकाकडून मागवून विद्यार्थ्याची निकड  भागवतात. पीेेएच.डी.च्या/  व्हायवाच्या  नावाखाली विद्यार्थ्याकडून पैसे मागणार्या/ पार्ट्या,दारू मागणार्या  आजकालच्या  आधुनिक, आचार्यांच्या पार्श्वभूमिवर  कुरूंदकर अंमळ मागासलेले वाटतात.पण हेच मागासलेपण त्यांना थोरपणा मिळवून देते.त्यांच्या बद्लचा  आदर अधिकच  वाढतो.  वाचकांना अपरिचित असणारी  प्रकाशन व्यवसायातील बारकावे,  माहितीही या आत्मकथनातून मिळते.काही बेरकी माणसे लेखकाला फसवतात, फ.मुं.शिंदेच्या गौरवग्रंथाची जन्मकथा  नि त्यातून झालेला लाखो रुपयांचा तोटा हा भाग मुळातुनच वाचनासारखा आहे. विठ्ल वाघांच्या "साहित्यिक आस्वादाबद्लही"  माहिती वाचकांना मिळते. शेषराव मोरे यांच्या"  सावरकरांचा बुद्धीवाद:  एक चिकित्सक अभ्यास:"चे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करायचे पक्के झाल्यानंतर शेषराव मोरे बाळासाहेबांना " पुस्तक वाचा नि अभिप्राय द्या" असे
दबक्या आवाजात म्हणतात . या विनंतीला बाळासाहेबांनी दिलेले मार्मिक ऊत्तर हे बाळासाहेबांच्या निर्भिड स्वभावावर  प्रकाश टाकणारे तर आहेच त्याबरोबर राजकारणातील बहुतांश सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते  साहित्य,संस्कृतीचे अभ्यासु,व्यासंगी,बहूश्रुत  का नसतात, यावरही भेदकपणे  प्रकाश टाकणारे आहे. बाळासाहेब म्हणतात "  हे बघा,मी पुस्तक वाचणे बंद केले आहे आणि वैचारिक तर मुळीच नाही.तुमचे पुस्तक वैचारिक आहे.कारण  माझ्या विचारांच्या  दिशा ठरवलेल्या आहेत.वाचन केल्यामुळे त्या बदलू नयेत,  म्हणून मी वाचतच नाही." पान नंबर 125.  तरीही शेषराव मोरे त्यांच्याच हातून सदरील पुस्तकाचे प्रकाशन करून घेतात नि वर आणि नरहर कुरूंदकरांचे शिष्यही म्हणवून घेतात! असो. कुठलीही पोज न घेता निर्मलकुमार घटना, प्रसंग प्रांजळपणे सांगतात. त्यांना ज्यांनी फसवलं त्यांच्याबद्ल कटुतेची ,वैर भावना कुठेही येत नाही.  व्यवसायापेक्षा माणसं अधिक महत्वाची हे कृष्णामाईने केलेले  संस्कार  लेखक कधीच नजरेआड करत नाही. स्वत: ची झालेली फजितीही ते न लपवता थेटपणे  सांगतात. बुटाला पॉलिस करण्यासाठी ते चांभाराच्या दुकानाऐवजी पंक्चर जोडणाराच्या दुकानी जातात.तिथला किस्सा खुमासदार शब्दात व्यक्त करतात. काही ठिकाणी   वृत्तांत आल्यासारखे ई. स.,माणसांची नावे,फक्त घटना येतात.कुठे काय जेवलं हेही साग्रसंगीत येते.  तो भाग निरस होतो,कंटाळवाना होतो. हे टाळता आलं असतं तर अधिक बरं झालं असतं. निर्मल प्रकाशन,नांदेड यांनी प्रकाशित केलेले हे 272 पेजेसचे  पुस्तक, एक चांगलं आत्मकथन वाचल्याचं समाधान देउन जाते.

No comments:

Post a Comment

Pages