प्रासंगिक : 'रमाई' म्हणजे त्याग - राजेश सावंत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 27 May 2020

प्रासंगिक : 'रमाई' म्हणजे त्याग - राजेश सावंत

महामाता रमाई यांच्या जीवनाची थोर गाथा, त्याग सांगणं, कथन, वर्णन करणं म्हणजे कवी लेखकाचे शब्दच निशब्द होतात. खरं तर माता रमाईनं जीवनात सोसलेल्या खडतर काटेरी वाटांवर फुलं केवळ त्याचं पसरवू शकल्या. दुसरं कोणीही उभ्या आयुष्यात करू शकलं नसतं. कारण लहानपणीच नुकत्याच उमललेल्या कळीचा अर्थात मूळ नाव भागिरथीचा विवाह कोवळ्या वयातच रामजी सकपाळ बाबांनी त्यांचा सुपुत्र 'भीमराव' यांच्या बरोबर भायखला, मुंबई मासळी बाजारात उरकला. त्यानंतर खऱ्या अर्थानं रमाईच्या जीवनाला सुरुवात झाली. लहानपणीच आई वडिलांचे मातृत्व हरपले असताना देखील दहा बारा वर्षात सुद्धा ती विचारानं, आचारानं जबाबदार व्यक्ती सारखी सहनशीलतेेने अगदी चोखपणे वागायची. तिचे हेच मोठेपण भिवाला अर्थात 'भीमा" ला महान प्रकांड पंडित, विद्वतेचा महामेरू महामानव डॉ.बाबासाहेब घडवूनच अवघ्या जगात महान केलं.हे खरं वास्तव,सत्य समोर आहे. ते केवळ तिच्या निस्सीम अथक प्रयत्नामुळेच व त्यागामुळेच. संसाराचा गाढा रमाईनं ओढला नसता तर भीमराव शिकला नसता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाला नसता. आपला उद्धारकर्ता, तुम्हा, आम्हाचा मार्गदाता, मागासलेल्या, उपेक्षित, शोषित दारिद्र्यतेत सडलेल्या समाजाला कदापि मिळाला नसता. हे आपण रमाईला नतमस्तक होऊन मान्य करावंच लागेल. अगदी लहान अजाण वयातच तिला सर्व सोसावं लागेल असं कधी स्वप्नात देखील तिला वाटलं नसेल. परंतु रमाई माउलीनं मेहनत पराकाष्ठा सोसून आपला संसार उभा केला. मोल मजुरी करून, शेणाच्या गवऱ्या थापून आपल्या मुलांना संभाळल. परदेशात शिकत असलेल्या बाबासाहेबांना कधीही जाणून दिले नाही. रमाई मातेनं स्वत: ची मुलं मांडीवर प्राण सोडताना डोळ्या देखत, पाहात हृदयावर दगड ठेवूनच अंतिम संस्कार स्वतः च्या पदरात गुंडाळून करणारी माता अशा क्षणी तिला काय यातना,वेदना झाल्या असतील? हेच दु:ख मनाशी बांधून, झेलून नेसलेल्या साडीचा पदर फाडून त्यात गुंडाळून स्वतः स्मशानात जाऊन आपल्या उदरातून जन्मलेल्या मुलांवर अंतिम संस्कार करणारी माता या जगात कुठे सापडेल? मृत्यू झालेल्या शरीरावर पांढऱ्या रंगाचं कफन घातलं जात ते सुद्धा घालायला तिच्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते.

विचार करा. आजच्या २१व्या शतकातील मातानो, भगिनीनो,  रमाई सारख्या महान कर्तुत्ववान मातेकडून धाडसाचे, जिद्दीचं, जिवंत मूर्तिमंत उदाहरणं, आत्मविश्वास व मनाचा कठोरपणा घ्या. त्याकाळात रमाई करू शकल्या.आज आपण काय करतो? याचा डोळस विचार करावा. आभाळाचे ढग जसे दाटून आल्यानंतर गडगडाट होतो. अंधारात जशा विजा चमकतात. क्षणाधार्थ त्या स्वत: च्या अंगावर धाऊन येत आहेत असे तिला वाटलं असेल. कारण आभाळा एवढा आधार अर्थात डॉ. बाबासाहेब तिच्या जवळ नव्हते. तिच्यावर कोसळले दु:ख सावरायला. रमाईन आयुष्यात एकटेपणाची सवय लावूनच डॉ. बाबासाहेबांना आपला उद्धार करण्यासाठी परदेशात शिकायला धाडले होते. आज आपण काय करतो आहोत? याचं आकलन, मनन, चिंतन करावंच लागेल. जेंव्हा डॉ. बाबासाहेब विद्वान होऊन भारतात येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले. हे तारेने कळल्यानंतर रमाईनं मनाशी पक्का निश्चय केला की, मला साहेबांच स्वागत करायला भाऊच्या धक्यावर जायचंच आहे. रमाईकडे एखाद दुसरी साडी नेहमी नेसण्याकरिता होती. पण ती बाहेर नेसण्यासारखी नव्हती. मग तीनं मोर्चा ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीकडे वळला व चांगली साडी शोधु लागली, परंतु त्या पत्र्याच्या पेटीत ठेवलेली साडी बिलकुल नेसण्यासारखी नव्हती. तिला वाळवी लागली होती, सडली होती, भोकं पडली होती. रमाई विचारात पडली होती. आता काय करावं? मी स्वागतास हजर राहू शकत नाही.अशी शंका मनात आली. रमाईनं तर आधीच दृढ निश्चय केला होता. तो मनाशी ठाम बाळगून अगदी निर्धार करून रमाई त्या ठिकाणी पोहचली. ती पुढील प्रमाणे माझ्या 'निळ्या नभाचा आसरा' या काव्यातून...

बाबासाहेब आंबेडकर विद्वतेचा महामेरू झाले. निघाले भारतात येण्यास लुगडं फाटलेल नेसू कसं मी, जाऊ साहेबांच्या स्वागतास नेसले साडी मी, 'फेटा' जरीचा साहेबांना दिला होता, एका सत्कारात 'शाहू' महाराजांचे आभार मानते मी. हजर राहिले बाबासाहेबांच्या स्वागतास हजर..

पहा, रमाईच्या लेकीनो,
किती कमालीची उत्सुकता, आतुरता माता रमाईकडे होती. छात्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांना सत्कारात बांधलेला फेटा नेसून आपल्या नवऱ्याच अर्थात डॉ. बाबासाहेबांच स्वागत करायला गेली व लांबूनच उभं राहून स्वागत केलं. कारण तिला स्वतः ला कळत नकळत मनातून भीती देखील वाटत होती की, साहेबांना काय वाटेल. साहेब सुटाबुटात येणार आणी मी स्वतः त्यांची रामू जरीचा फेटा नेसलेली एका झाडाच्या आडोशाला उभी आहे. दिसणार नाही अशी परंतु बाबासाहेबांचे डोळे सुद्धा कोणाला तरी शोधत होते. नजर इकडे तिकडे जाताच जेंव्हा साहेबांची तीक्ष्ण नजर 'रामू' कडे गेली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धाराच लागल्या होत्या. कदाचित साहेबांना जाणीव झाली असेल मी एवढा शिकून मोठा झालो. सुटाबुटात परदेशातून आलो आहे. अनुयायी फुलांचे हार घालून स्वागत करीत आहेत. मी लंडन अमेरिका राहिलो. परंतु माझ्या पत्नीला, रामूला एक साडी घेऊ शकलो नाही. याचं शल्य कायमच मनात त्यांच्या कोरून राहिल असावं. पण आजची भगिनी, स्त्री ही केवळ रमाईच्या महान त्यागामुळेच दहा - वीस हजाराची साडी नेसते आहे, मोठ्या कपाटात वेगवेगळ्या प्रकारची साडी लाऊन ठेवत आहे. आनंदाने स्वतः च्या नवऱ्याला कधी तरी प्रेमाने विचारते अहो, आज मी कोणती साडी नेसू? ही सहजता, साज, नटणे, मुरडणे, रमाईच्या अवर्णनीय त्यागामुळे तिने घडवलेल्या महान साहेब अर्थात डॉ. बाबासाहेबांच्या परी स्पर्शामुळे हे नाकारू शकत नाही.

लक्षात असू द्या माझ्या भगिनीनो,
हे केवळ रमाईच्या, डॉ. बाबासाहेबांच्या कठोर महान त्यागामुळेच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं अर्थ निर्माण झाला हे विसरता कामा नये. आपलं स्वतः च जीवन, आयुष्य जो पर्यंत असेल, जो पर्यंत शरीरातील धमण्या मध्ये रक्त असेल, जो पर्यंत अखेरचा श्वास असेल तो पर्यंत जगात माणसात ज्यांनी आणले व भारतातील जाती पातींचा, विषमतेचा डोळ्या समोर असलेला अंधार कायमचा दूर केला. त्यांना मनातील आतील नाजूक  हृदयात मानाचं, अनमोल स्थान द्या. त्या दोघां महान उभयतांचे स्मरण, कायमच स्थान आई - वडिलापेक्षा अधिक मोलाचं असून क्षितिजाच्या पली कडील पोहचण्याचा मान सन्मान त्यांनी आपल्याला मिळवून दिला. याचा विसर नकोच. त्यांच्या मुळेच आपल्याला हिमालयाचं शिखर पहाता, बघता आलं. ही प्रेक्षणीय, रमणीय सृष्टी डोळ्यांनी पहाता आली.याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी अवलोकन करून आपण स्वतः सुद्धा आपल्या समाजाचा मागासलेल्या उपेक्षितांचा उद्धार करण्यासाठी प्रत्येकानं एकमेकांना साथ देऊन अनेक हात एकसंग जोडायचे आहेत. रमाईला बाबासाहेबांनी पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेण्यास मनाई केली होती. स्पष्ट नकार दिला होता आणि रमाईला म्हणाले होते की - "मी तुझ्यासाठी समाजासाठी दुसरे पंढरपूर निर्मान करीन." त्यांनी १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन, देवून तथागतांचा विज्ञान बुद्ध स्वीकारून जगाच्या इतिहासात रक्त रहित क्रांती करून पंढरपूरातील विठ्ठला (मुळात विठ्ठल हा बुद्धच आहे) पेक्षा नागभूमीत नागवंशीय नागपूरातीत भारतातील मूळ बुद्धाला अंगीकृत करून भारतीय भूमी किती अधिक श्रेष्ठ आहे. याची ओळख जगाला निर्माण करून दिली. अर्थात "दीक्षाभूमी' हेच आपले पंढरपूर आहे. असे दाखवून दिले. मात्र हा सोहळा पाहण्यासाठी त्यागमूर्ती माता रमाई त्याक्षणी नव्हत्या. ही सल त्यांच्या मनात कायमची राहिली असेल. मात्र एवढं नक्की करू शकतो ते असं माता रमाई डॉ. बाबासाहेबांच्या मायेच्या "सावली" ला वंदन स्मरण करताना स्वाभिमानानं, अभिमानानं त्यांचे विचार बुद्ध धम्माला पोषक असतील असंच अनुसरण करून 'रम'मय, 'भिम'मय, 'बुद्ध'मय होऊ या. अशा महान कर्तुत्वास जयंती निम्मित वंदन! अभिवादन!

राजेश सावंत
चेअरमन : 'आसरा' एज्युकेशन आणि सामाजिक संस्था


































































No comments:

Post a Comment

Pages