हृदयाच्या तळाशी असलेल्या तप्त लाव्ह्यातून कवितेचे झरे फुटतात. दग्ध आनुभवातून पिळवटून निघावा श्वास तसे चाललेय कवीचे आयुष्य. ते सभोवतीच्या दुःखाने वनवा पेटावे तसे जळत राहते. ही वनवे रोजच येतात कवीच्या वाटेवर..कवी देतो जन्म कवितेला. कविताही जन्म देते कवीला. अभावग्रस्त माणसाच्या डोळ्यांना स्वप्न देणारी कविता वेदनेचा डोंगर फोडून येते. जगण्यातील कटूतेला निष्ठूरतेला रुपांतरीत करण्याचे बळ देते ही कविता .
हे कवी तू जोडलेस मला पराकोटीच्या संतापाशी
तू मला पराकोटीचे हळवे आणि व्याकूळही केलेस
तुझ्यामुळे अनेक बाभळींनी काट्यांचा त्याग केला माझ्यासाठी
तू मला खूप खूप मित्र दिलेस आणि छोटे छोटे शत्रूही दिलेस...
( हे कवी..पान.६)
कवीचे मानस अंतराळ जेथे जीवनाचे गतीचक्र नवनवाअवकाश अनुभवते. कवी आदिम द्वंद्व घेऊन हिंडतो आहे. एखाद्या चक्रासारख ते मस्तकात फिरत राहते. जे या अंतराळात प्रश्नांचे तोरण बांधते. ते बेफामतेला विचार करायला बाध्य करते. विवेकाचे भान देऊ पाहते निद्रिस्थ विश्वव्यवस्थेला. माणसाला आश्वस्त करणारे पहाटगाणेच आहे ही कविता.
जीवनउर्जेला उन्रिर्मीत करणारी ही कविता. माणसाला माणूषतेचे सौंदर्य बहाल करते. त्याला प्रज्ञासन्मुख करते. विपरीतता आणि विरुपतेला रुपांतरीत करण्याचे स्वप्न देते.
कवीचे कवी असणे ही एक संवेदनेला परजवणारी प्रक्रिया आहे. जगातील दुःखे दूर करण्याचा ध्यास कविने घेतला आहे."पर दुक्खे सति साधुनं हदयं कंपनं करोति ति करुणा. " करूणा मणुष्यत्त्व फुलवते. त्या करुणेचे तिव्रोत्कट कंपने कवीच्या हृदयात आहे. म्हणूनच कवी अर्थात कवीतला माणूस कवीला.."तुझ्यामुळे शिरतो निवडुंगाच्या अरण्यात,भांडतो काट्यांसोबत." निवडुंगाचे अरण्य जे कवीच्या अस्तित्वाचा भाग झालेय. शोषणाचे ,जुलुमाचे काटे जे माणसाची अप्रतिष्ठा करते. मानवीमूल्य लुटते. त्याविरोधात कवी अहोरात्र भांडतो. अस्वस्थ होतो. माणुसकिच्या मूल्यप्रस्थापणेचे हे महास्वप्नच नव्हे ही सर्जनाची महायात्रा आहे...अग्नीचा आदिबंध.
- सुभाष गडलिंग

No comments:
Post a Comment