आधार प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेअभावी कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 12 June 2020

आधार प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेअभावी कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

 
किनवट,दि.१२ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे.    मृग नक्षत्राच्या पावसााल सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग पाहायला मिळत आहे. परंतु शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेव्दारे शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी बोगस ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे. कर्जमाफीसाठी शासनाने ठरवून दिलेली आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पार न पडल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होऊ शकले नाहीत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांंनी गुगल फॉर्म स्वरूपात लिंक तयार करून शेतकऱ्यांकडून पीक कर्जाकरीता अर्ज मागवले. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे होती. त्यानंतर ६ जून अशी मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु ती लिंक अद्यापही सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये  लिंकसंदर्भात साशंकता निर्माण झाली आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज मागवले, परंतु त्यावर काही प्रक्रिया करणार की नाही ? जर करणार असतील, तर पेरणीची वेळ निघून गेल्यावर पीककर्ज अर्जावर प्रक्रिया करून काय उपयोग,असा प्रश्न शेतकऱ्यांंनी उपस्थित केला आहे. बिकट परिस्थितीत शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडली असती, तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती.
शासनाने कर्जमाफी योजना लागू करताना तिच्या अंमलबजावणीकरीता सेतू सुविधा व सीएससी     केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे घेऊन शेतकऱ्यांकडूनच त्यांचे कर्ज आधारद्वारे प्रमाणीकरण करण्याची पद्धत अवलंबली होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने अशा बायोमेट्रिक यंत्राच्या वापरावर प्रतिबंध आणला. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.  यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले. त्यात लाखो अर्ज प्राप्त झाले. त्यावर प्रक्रिया कधी करण्यात येईल व कधी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Pages