किनवट,दि.४ : किनवट तालुक्यात मंगळवारी व बुधवारी(दि.२ व ३) सायंकाळपासून मान्सूनपूर्व अर्थात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला.यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला जोमाने लागले आहेत. गुरुवारी (दि.४) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात तालुक्यातील सात पैकी चार मंडळांमध्ये एकूण २२ मि. मी. पावसाची नोंद झाली. याची सरासरी टक्केवारी ३.१४ एवढी होते.
वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम म्हणून मंगळवारी (दि.२) शहर व परिसरात सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस जोरदार पडेल अशी चिन्हे दिसत होती. त्यानंतर रात्री सात वाजता जोरदार पावसाने बरसण्यास सुरूवात केली. रात्रभर अधूनमधून विश्रांती घेत पाऊस कोसळत होता. मात्र पावसाने हजेरी लावताच वातावरणात बदल होऊन थंडावा निर्माण झाला. तापमानात घट होऊन किनवटमध्ये मंगळवारी ३२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. या पावसाने उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान गतवर्षीपर्यंत १ हजार २४० मि.मी.एवढे होते. तब्बल १४ वर्षानंतर हवामान विभागाने मागील काही वर्षांत नेमक्या पडणार्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. त्यानुसार यावर्षीपासून किनवट तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १ हजार ६३.०९ एवढे निश्चित झालेले आहे. तालुक्यात गुरुवारी (ता.४) सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे : किनवट- ८ मि.मी.; ईस्लापूर- ३ मि.मी.; मांडवी- ५ मि.मी.; बोधडी- ६ मि.मी.; दहेली- ०० मि.मी.; जलधरा- ०० मि.मी.; शिवणी- ०० मि.मी.
या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही वार्डात तुंबलेल्या नाल्यातील घाण पाणी पावसामुळे रस्त्यावर वहात होते. गेल्या आठवड्यात रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाला. नवतपाचे नऊ दिवस सोमवारी संपल्यानंतर मंगळवारी अखेर रोहिण्या बरसल्याने, शेतकर्यांना आता पेरणीयोग्य मृगधारांची आस लागली आहे. विशेष म्हणजे यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे.
Thursday, 4 June 2020
किनवट तालुक्यात सर्वदूर वळवाचा पाऊस बरसला
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment