किनवट,ता.४(बातमीदार) : राज्यात झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून ‘लोकवाहिनी’ म्हणून ओळख असलेल्या ‘लालपरी’ची सेवा सुरू होऊनही, सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी प्रत्येक बसमध्ये फक्त २२ प्रवासीच घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे, प्रत्येक बसफेरी सध्या तोट्यातच जात आहे. किनवट आगारातून दररोज सहा बसच्या एकूण सोळा फेर्या होत असून, दररोजचे सरासरी उत्पन्न जेमतेम २५ ते ३० हजार रुपये होत आहे. परिणामी किनवट आगाराला प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
किनवट आगारात एकूण ५० एसटी बसेस आहेत. वाहक ८४, तर चालकांची संख्या ९३ आहे. यांत्रिक विभागात ५० तर कार्यालयीन कार्यप्रणालीसाठी सुमारे १० ते १२ कर्मचारी कर्तव्यावर आहेत. कोरानाच्या प्रादुर्भावापूर्वी किनवट आगारातून दररोज १८९ फेर्या होत असत. त्यातून या आगाराला उन्हाळ्यात विवाहसोहळ्यांमुळे दररोज ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न होत असे. विद्यार्थ्यांचा पास,स्मार्टकार्ड,सहलीसारखे इतर उत्पन्नाचे स्त्रोत वेगळेच होत. मात्र देशभर कोरानाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीची चाकेही थांबली होती. तब्बल दोन महिन्यानंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ‘लालपरी’ ला जिल्ह्यांतर्गगत धावण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, कोरानाची धास्ती घेतल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत असल्याने, अत्यल्प प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू आहे. ५५ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी केवळ २२ प्रवासी घ्यायचे ठरल्याने, फक्त ‘प्रवाशांची सोय मात्र आगाराची हानी’ असा प्रकार सध्यातरी सुरू आहे.
किनवट आगारातून २२ मे पासून नांदेडसाठी दिवसभरातून तीन बस व माहूरसाठी दोन बस अशा एकूण ५ बस चालू केल्यात. नांदेडचे प्रवासी गत दोन चार दिवसात वाढल्यामुळे ३० मे पासून सकाळी अजून एक बस वाढविण्यात आली. सध्या दररोज नांदेडच्या चार बसच्या आठ फेर्या व माहूरच्या दोन बसच्या दिवसभरात आठ फेर्या मिळून एकूण १६ फेर्या(जाणे-येणे) होत असून, रविवारपर्यंत एकूण १४४ फेर्या झालेल्या आहेत.ता.३१ मे पर्यंत एकूण सहा बसेसनी १३ हजार ६००कि.मी.चे अंतर कापले आहे. गत दहा दिवसातील एकूण ३ हजार ६९ प्रवाशांकडून किनवट आगारास केवळ २ लाख ५ हजार १३६ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. जे की, गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्यादिवसाच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे.
एरव्ही दर उन्हाळ्यात किनवटचे बसस्थानक गर्दीने फुलून असायचे. परंतु, लॉकडाऊननंतर या परिसरात स्मशानशांतता पहावयास मिळते आहे. कोरोनामुळे सध्या शाळा, कॉलेज, लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव आदीवर बंदी असल्यानेदेखील प्रवाशांचे आवागमन कमी आहे. १० वर्षाखालील मुले व ६० वर्षावरील नागरिकांना प्रवास करण्यास मनाई आहे. महामंडळाचे आर्थिक नुकसाना होण्यासाठी ह्या बाबीदेखील कारणीभूत आहे.
*सध्या जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी परवानगी असल्यामुळे, आम्ही किनवट आगारातून माहूर व नांदेडसाठी बससेवा सुरू केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने, आगारातून एसटी बाहेर निघतांना स्वच्छ धुऊन फवारणी करून निर्जंतुक केली जाते. त्यानंतरच प्रवाशांना बसमध्ये बसू देण्यात येते. हा खर्च तसेच डिझेल, चालक व वाहकाचे वेतन या सर्वांचा फेरीमागे येणारा खर्च काढला असता, वीस टक्के रक्कमही प्रवासी भाड्यातून सध्या मिळत नाही. अशा स्थितीत एसटी महामंडळाला बसफेर्या चालविणे प्रचंड तोट्याचे झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक मिलिंदकुमार सोनाळे यांनी दिली*


No comments:
Post a Comment