
किनवट, : शहरातील शिवाजी चौक ते हनुमान मंदिर या प्रमुख मार्गावरून सराफा लाईनमध्ये जाणारा रस्ता अरुंद व कच्चा असतानाही या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड व मोठी वाहनांची वाहतूक सुरू आहे.यामुळे सराफा व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.सदर रस्त्यावर जड वाहनांना बंदी घाला,अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांनी पालिकेकडे केली आहे.
शहरातील शिवाजी चौक ते हनुमान मंदिर या मुख्य बाजारपेठेच्या मार्गावरून गोपाल हॉटेल ते सराफा लाईन हा रस्ता अरुंद व कच्चा आहे. असे असताना या रस्त्यावरून ट्रक, टेम्पोसारखी मोठी व अवजड वाहने वाहतूक करत असल्याने दुकानदारासह नागरिकांना या वाहनांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सराफा लाईनमध्ये दिवसभर वर्दळ असते. अरुंद व कच्च्या रस्त्यामुळे तसेच वर्दळीमुळे कित्येकदा या ठिकाणी अपघात घडले आहेत.विशेष म्हणजे व्यापाऱ्यांची जड वाहने याच रस्त्यावरून जात असल्याने रस्त्याचा मुख्य पूल ढासळून जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात छोटी - मोठी वाहने अडकून रहदारीला अडथळा निर्माण होत असतानाही नगर परिषद लक्ष देण्यास तयार नाही. सराफा लाईनमधील अरुंद रस्ता लक्षात घेऊन तसेच नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन या रस्त्यावर मोठ्या वाहनांना वाहतूक करण्यास प्रतिबंध घालून धोकादायक झालेल्या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी तसेच नगरपरिषदेच्या ठरावानुसार याठिकाणी नियोजित कमान उभारुन सराफा दुकानदारांसह नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नितीन मोहरे यांनी निवेदनात केली आहे.
No comments:
Post a Comment