सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून भारताच्या लिखित इतिहासाचा प्रारंभ होतो हे निर्विवाद सत्य आहे. या शिलालेखांच्या पूर्वीचा लिखित पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. आपली नीतिपर शिकवण आणि इतिहास हा दगडांवर कायमस्वरूपी कोरून ठेवण्याच्या अशोकांच्या दूरदृष्टीपणाचे आणि बुद्धिमतेचे कौतुक करावेसे वाटते. सम्राटाच्या या शिलालेखांचा शोधप्रवास हा देखील त्याच्या व्यक्तिमत्वा इतकाच रंजक आहे.
१७५० साली सर्वात पहिल्यांदा पाद्री टायफेनथालर यांना दिल्ली मेरठ येथील स्तंभलेख आढळला. त्याची लिपी व भाषा माहित नसल्यामुळे त्यांनी फक्त त्याची नोंद करून ठेवली. १७८५ मध्ये ह्यरिंग्टन यांनी बाराबर आणि नागार्जुनी डोंगरावरच्या लेणींना भेट दिली व पहिल्यांदाच या लेणींची इतिहासात नोंद झाली. तेथील शिलालेख देखील नोंदवून ठेवण्यात आला. याच काळामध्ये कॅप्टन पोलियर यांनी दिल्ली टोपरा येथील स्तंभलेख शोधला आणि त्याचे चित्र काढून सर विलियम जोन्सकडे पाठवून दिले. जोन्स यांनी हा स्तंभलेख आणि त्या बरोबरच अलाहाबाद कोसम येथील कॅप्टन जेम्स होरे यांनी शोधलेला स्तंभलेख हे दोन्ही १८०१ साली ‘एशियाटिक रिसर्चेस’ मध्ये प्रकाशित केले व त्याचा अर्थ शोधण्याचे आवाहन सर्व अभ्यासकांना केले. १८२२ मध्ये मेजर जेम्स टॉड यांनी गिरनारचा शिलालेख शोधला. याच काळात अलाहाबाद येथील टांकसाळीत अधिकारी असलेला जेम्स प्रिन्सेप, या सर्व स्तंभलेख आणि शिलालेखांची लिपि समजावून घेण्याची धडपड करत होता. खंदाहर मध्ये सापडलेल्या खरोष्टी लिपीतील शिलालेख आणि येथील शिलालेखांच्या लिपी वर त्याचे संशोधन चालू होते. १८३४ साली बंगाल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल मध्ये लेफ्टनंट बर्ट यांनी केलेल्या अलाहाबाद स्तंभलेखाचे चित्रण व प्रिन्सेपणे शोधलेले काही लिपींची अक्षरे प्रकाशित करण्यात आली. १८३५ साली कॅप्टन लान्ग यांनी गिरनारचा शिलालेख कापडावर लिहून मुंबईच्या डॉ. विल्सन कडे पाठविला जो त्यांनी प्रिन्सेपकडे भाषांतरासाठी पाठवून दिला. १८३६ च्या उत्तरार्धात महाराज रणजित सिंहांच्या दरबारी असलेल्या फ्रेंच अधिकारी कोर्ट यांनी शाहबाजगढी येथील शिलालेख शोधला व त्याची नक्कल करून प्रिन्सेपकडे पाठवली. सगळीकडून येत असलेले स्तंभलेख आणि शिलालेखांचे चित्रण आणि नक्कल पाहून प्रिन्सेपने ही लिपि शोधून काढण्याचा ध्यास घेतला. सतत सहा महिने, दिवस रात्र प्रचंड मेहनत घेऊन जेम्स प्रिन्सेपने अशोकांच्या शिलालेखांची स्वर, व्यंजन वर्णमाला तयार केली. १८३७ साली सर्वात पहिल्यांदा दिल्ली टोपरा येथील अशोकांच्या स्तंभलेखाचे वाचन जेम्स प्रिन्सेपने केले व त्याचे प्रकाशन केले. त्यानंतर लगेचच त्याने लौरिया आरिया आणि लौरिया नंदनगढ येथील स्तंभलेखांचे वाचन केले.
मेजर पेव यांनी दिल्ली मेरठ येथील स्तंभलेखाचे संपूर्ण दृश्यप्रत बनवली जी प्रिन्सेपने प्रकाशित केली. याच वर्षाच्या शेवटी लेफ्टनंट कीटोय यांनी धौली येथील अशोकाचा एक महत्त्वाचा शिलालेख शोधून काढला. हा शिलालेख शोधत असताना त्यांच्या जीवावर बेतले होते. खरं तर धौली येथे लेफ्टनंट कीटोय १८३६ सालीच गेले होते, मात्र या शिलालेखाच्या पायथ्याशी एक अस्वल आपल्या दोन बछड्यांबरोबर राहत होती. कीटोयला पाहताच अस्वलीने त्यांच्यावर हल्ला केला आणि नाईलाजस्तव कीटोय यांना तिच्यावर गोळी झाडावी लागली. जखमी झालेल्या कीटोय यांना परत फिरावे लागले. मात्र या शिलालेखाचा शोध घ्याचाच म्हणून ते परत १८३७ साली तेथे गेले तेव्हा त्यांना मोठे झालेले दोन्ही बछडे दिसले. त्यांना हुसकावून लावून कीटोय यांनी दगडावर चढून हा शिलालेख लिहून घेतला व प्रिन्सेपकडे पाठविला. याचे संपूर्ण वर्णन त्यांनी जर्नल मध्ये प्रकाशित केले आहे. १८३८ मध्ये प्रिन्सेपने गिरनार आणि धौली येथील शिलालेखांचा तौलनिक अभ्यास केला आणि तो प्रकाशित केला. १८३९ साली रावेनशॉ यांनी शाह कबिराउद्दीनच्या मदतीने सासाराम, बिहार येथील शिलालेख लिहून घेतला.
१८४० साली मेसन यांनी शहाबाजगढी येथे जाऊन तेथील शिलालेखाची दृश्यप्रत बनवली व प्रकाशित केली. यूरोप मधील अभ्यासक नॉरीस यांनी अभ्यास करून खरोष्टी लिपीतील 'देवानंपियास' हा शब्द शोधून काढला. याच साली बैराट येथी भाब्रु शिलालेख कॅप्टन बर्ट यांनी लिहून काढला आणि तो कॅप्टन कीटोय यांनी पंडित कमलाकांत यांच्या मदतीने लिप्यांतरित केला. हे सर्व शिलालेख अशोक नावाच्या सम्राटाने लिहिले आहे याची खात्री जेम्स प्रिन्सेपला पटली, मात्र ठोस पुरावा सापडत नव्हता कारण कुठल्याच शिलालेखांमध्ये हे नाव आढळत नव्हते. प्रिन्सेपने शिलालेखांच्या लिपीला "अशोकन स्क्रिप्ट" हे नांव दिले. याच वर्षी प्रिन्सेपचे कामाच्या प्रचंड ताणांमुळे, अवघ्या चाळीसाव्या वर्षी निधन झाले. मात्र अशोकांच्या शिलालेखाचे शोधकार्य आणि भाषांतराचे काम थांबले नाही. प्रिन्सेपने तयार करून दिलेल्या वर्णमालाच्या साह्याने अनेक अभ्यासक हे काम करत राहिले. १८५० साली सर वॉल्टर इलियट यांनी ओडिशा येथील जौगडा येथे असलेला अशोकाचा शिलालेख शोधून त्याची दृश्यप्रत बनवली. अभ्यासांती त्यांनी हा शिलालेख शहाबाजगढी, गिरनार आणि धौली यांच्या सारखाच आहे हे सिद्ध केले. १८६० साली फॉरेस्ट यांनी देहरादून येथील कालसी या ठिकाणाचा शिलालेख शोधून काढला. या शिलालेखाच्या दगडावर संपूर्ण शेवाळ पसरले होते. १८७० मध्ये कर्नल एलिस यांनी मध्य प्रदेशातील रुपनाथ येथील शिलालेख शोधून काढला. १८७२ मध्ये कार्लाईल यांनी राजस्थानातील बैराट येथील लहान शिलालेख आणि बिहार मधील रामपूरवा येथील स्तंभलेख शोधून काढला. १८७९ साली सर अलेक्झांडर कंनिंगहम यांनी अशोकाचे शोधलेले सर्व शिलालेख, स्तंभलेख यांच्या लिप्यांतरांचे व भाषांतराचे संकलन करून 'कॉर्पस इन्स्क्रिप्टोनम इंडिकारम' च्या पहिल्या भागात प्रकाशित केले. याची संकल्पना जेम्स प्रिन्सेपचीच होती आणि अजून शिलालेख सापडू शकतील हे गृहीत धरून कनिंगहम यांनी पहिला भाग प्रकाशित केला व नंतर सापडणारे शिलालेख दुसऱ्या भागात प्रकाशित करावे असे सूचित केले. सम्राट अशोकाचे शिलालेख शोधण्याचे काम अविरत चालू होते. १८८२ साली डॉ. भगवानलाल इंद्रजी यांना मुंबई जवळील सोपारा येथे शिलालेख सापडला. १८८९ साली कॅप्टन लेह यांना पाकिस्तानातील मनशेरा येथे अशोकाचा शिलालेख सापडला. १८९१ साली लेविस राईस यांना म्हैसूर येथे तीन शिलालेख सापडले. १८९५ साली फ्युरर यांनी नेपाळ येथील निगाली सागर येथे स्तंभलेख शोधला तर १८९६ साली त्यांनीच रुम्मिनदायी येथील स्तंभलेखही शोधला. १९०५ साली ओर्टेल यांनी सारनाथ येथील स्तंभलेख शोधला. १९१५ साली कर्नाटक येथील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथील सोन्याच्या खाणीचे इंजिनियर बेडॉन घरी परतत असताना त्यांना अचानकपणे एका दगडावर शिलालेख दिसला. हा शिलालेख अतिशय महत्त्वाचा ठरला कारण आत्तापर्यंतच्या सर्व शिलालेखात 'देवानं पियदस्सी राज्ञो' एवढंच लिहिले होते त्यामुळे हे शिलालेख कोणी लिहिले हे कळत नव्हते मात्र मस्की येथील शिलालेखात प्रथमच 'देवानं पियदस्सी राज्ञो असोक' लिहिलेले आढळले आणि भारतात अशोक नावाचा सम्राट होऊन गेला आणि त्यानेच हे सर्व शिलालेख लिहिले ही माहिती जगाला प्रथमच कळाली. संशोधकांना या महान सम्राटाच्या राज्याची कल्पना आणि त्याने लिहिले नीतिपर शिकवणीचा परिणाम भारताबरोबरच इतर देशांवर कसा झाला याची माहिती मिळाली. या देशावर सम्राट अशोक नावाचा महान राजा होऊन गेला हे जेम्स प्रिन्सेपचे संशोधन खरे ठरले. या सर्व शिलालेखांचे लिप्यांतर आणि भाषांतराच्या कामात अनेक संशोधक आणि अभ्यासकांनी स्वतःला वाहून घेतले. फ्रँके, स्मिथ, फ्लीट, मायकलसन, ल्यूडर्स, थॉमस, हल्ट्झ, भांडारकर, जयस्वाल, बरुआ आणि वूलनर यांनी अशोकांच्या शिलालेखांवर खूप काम केले. १९२५ साली हल्ट्झ यांनी शिलालेखाचा कॉर्पस मध्ये दुसरा भाग प्रकाशित केला.
सम्राट अशोकाचे शिलालेख शोधण्याचा या २७० वर्षांचा अथक प्रवास अतिशय महत्त्वपूर्ण आणि भारताच्या इतिहासाला नवीन वळण देणारा ठरला. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि तहान भूक हरवून, अशोकाचे शिलालेख शोधण्याचे काम करणाऱ्या या सर्व संशोधकांना मनापासून आदरांजली.
अतुल भोसेकर
९५४५२७७४१०
मस्की येथील अशोकाचा शिलालेख
No comments:
Post a Comment