राजगृहावर हल्ला झाला आणी सर्व थरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. ते स्वाभाविकही आहे. पण.. एक प्रतिक्रिया मात्र जेंव्हा जेंव्हा आपल्यावर
अन्याय-अत्याचार होतो त्या त्या वेळी येतेच येते. ती म्हणजे "आपली एकजूट नाही म्हणून आपल्यावर हल्ले होतात." हे जर आपल्याला कळते तर आपण एकत्र का येत नाही?
आपल्या फटफुटीची जी अनेक कारणे आहेत त्या पैकी एक महत्वाचे कारण मला वाटते ते असे की, आपल्याकडे 'वारसा' निर्मिती नाही. हे वाक्य मी खूप धाडसाने लिहिलेय. आता आपण म्हणाल जर वारसा निर्मिती नाही तर आपण कोण आहोत? मला मान्य आहे आपण सर्व आंबेडकरी चळवळीचे वारस आहोत. मग मी असे का लिहितोय? तेच मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर १९५७ साली बाबासाहेबांच्या संकल्पनेतल्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना करण्यात आली. आणि एका वर्षातच त्या पक्षाचे अनेक तुकडे झाले. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. माझा मुद्दा इथून पुढे सुरू होतो.
त्या वेळी आपले जे काही प्रमुख गट निर्माण झाले त्या गटांचे अध्यक्ष ज्यांनी गट निर्माण केले तेच झाले आणि कायमस्वरूपी तेच राहिले. ( एखादं दुसरा अपवाद वगळता.) त्याचा परिणाम असा झाला की त्या नेत्याच्या अस्तानंतर त्यांचा पक्ष किंवा गट सुद्धा अस्तित्वहीन झाला. अगदी त्या वेळेपासून आजपर्यंत पाहिले तर हेच चित्र दिसते.
मला प्रश्न पडतो की, ज्या कार्यकर्त्यांनी तो पक्ष-गट वाढवण्या साठी इमाने-इतबारे अगदी प्रामाणिकपणे पंचवीस तीस वर्षे मेहनत घेतली, दिवस-रात्र राबले, अनेक गोष्टीचा त्याग केला, प्रचंड अनुभव जमा केला अशा तावून सुलाखून निघालेल्या एखाद्या कार्यकर्त्याला पक्ष-गटाचा वारस म्हणून प्रमुख होण्याची संधी का दिली गेली नाही? सगळेच कार्यकर्ते एवढा मोठा भार पेलण्याच्या कुवतीचे नसतात हे मला मान्य आहे. पण अनेक कार्यकर्ते अनुभवांनी तितके सक्षम असतात आणि आहेत मग त्यांना का डावलले गेले? त्यांना जर संधी दिली गेली असती तर आजचे चित्र कदाचित वेगळे असते.
राजाच्या पोटी राजाचा जन्म ही आततायी पद्धत संविधानाने नेस्तनाबूत केली. हे आपण छाती बडवून सांगतो. पण दुसऱ्यांना... आपण मात्र विचारकेंद्री पणाचा आव आणून व्यक्तिकेंद्री चळवळ, समाजकारण, राजकारण करतो. त्याचाच परिणाम असा होतो की, ज्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन एखादा पक्ष-गट बांधलेला असतो. त्या अनुभवी कार्यकर्त्यांला डावलून त्या पक्ष-गटाच्या प्रमुखांच्या घरातील कोणीतरी मुलगा किंवा आणखी कोणीतरी प्रमुख म्हणून येतो. आणि फुटाची ठिणगी पडते.
आता प्रश्न असाही निर्माण होतो. त्या पक्ष-गट प्रमुखांच्या घरातून कोणी येऊ नये काय? त्यांना अधिकार नाही का? त्याचे उत्तर होय असेच आहे. लोकशाही त्यांनाही अधिकार देते. पण पक्ष-गट प्रमुख होण्याकरिता काहीतरी नियमावली असावी ना. पण तसे होत नाही. आणि काही भक्त तर इतके आंधळे असतात की विचारता सोय नाही.
जे आपले प्रमुख वैचारिक विरोधक आहेत, जे लोकशाही मानत नाहीत. ते (आरएसएस वाले) मात्र त्यांना अभिप्रेत असणाऱ्या विचारांच्या पेरणीसाठीच काम करतात. त्यांच्याकडे एकच नेता किंवा प्रमुख नाही. त्यांची संघटना जो प्रमुख देतील तो त्यांना मान्यच. करण त्यांच्यासाठी कोण प्रमुख आहे हे महत्वाचे नाही तर जो विचार रुजवायचा आहे तो महत्वाचा आहे. त्याच्याकडे कोणत्याही प्रमुखांच्या घरातील त्या पदासाठी दावा करीत नाहीत. आणि म्हणूनच ते आपल्या संघटनेसाठी निष्ठेने काम करतात व फुटत सुद्धा नाहीत. अशा लोकांशी आपल्याला लढा द्यायचा आहे. आपण कसे वागले पाहिजे ?
दुसरे असे की, आपले जे अनेक गट आहेत ते एकमेकाला पाण्यात बघतात. एकमेकांला कट्टर विरोधक मानतात. एकमेकांचा इतका द्वेष करतात की बघून हादरायला होतं. आपण सगळेच आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते आहोत. मार्ग वेगवेगळे असले तरी विचार एकच आहे. आपण एकमेकांशी लढून आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपण एकत्र होऊन शत्रूशी भिडायला पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आपल्याला कळत नाही असं समजायचे का ?
आपल्याला वाटेल मी फक्त आपल्या त्रुटीच मांडतोय. यावरचा उपाय काय? ते उपाय सांगण्या साठीच हे लिहितोय. माझा आंबेडकरी तरुणांवर फार विश्वास आहे. एखादे सकारात्मक परिवर्तन त्या चळवळीतले तरुणच घडवतात. आपल्याला पँथरचा लढा ज्ञात आहेच. त्यांनी प्रचंड मोठे परिवर्तन त्या काळात घडवले. पण पुढे पँथरचे जे झाले ते आजच्या तरुणांचे होऊ नये म्हणूनच हा प्रयत्न आहे.
आमच्याकडे आराखडा तयार आहे.(तो येथे मांडता येत नाही.) त्यावर आजच्या तरुणांनी विचार विनिमय करावा. या अपेक्षा आहेत. आता तो आराखडा जर मांडलेलाच नाही तर त्यावर विचार विनिमय कसा करायचा? हा प्रश्न... तर त्याचे उत्तर असे आहे. सुरुवातीला मुंबई व मुंबईच्या आसपासच्या परिसरातील म्हणजे नवी मुंबई, ठाणे येथे अनेक आंबेडकरी तरुणांच्या छोट्या मोठ्या संघटना चांगली कामे करत आहेत. या संघटनांच्या प्रमुखांनी एकमेकांशी संपर्क करून लॉकडाऊन उठल्या उठल्या सर्वांच्या सोयीनुसार तातडीने बैठक लावावी. आम्हालाही तुम्हीच बोलवावे. तेथे तो आराखडा मांडू. त्यावर आजच्या तरुण कार्यकर्त्यांनी विचार करावा. जर योग्य वाटले तर पुढे महाराष्टभर राबवण्याचा विचार करू.
शेवटी एक महत्वाचे. आम्हाला नेता व्हायचे नाही. आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते आहोत आणि शेवट पर्यंत कार्यकर्ते म्हणूनच काम करू. ही जी यातायात करतोय ती म्हणजे, लढवय्या निखाऱ्यांवर जमा झालेली विस्कळितपणाची राख झटकून तरुणांना ताज्या उमेदीने उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण ...
अजूनही वेळ गेलेली नाही.
-------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment