किनवट,दि.२० : किनवट तालुक्यात एप्रिल ते जून मध्ये मुदत संपलेल्या १० ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकार्यांना ‘प्रशासक’ म्हणून नेमण्यात आले आहेत. तसेच जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत आणखी १६ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. त्यामुळे तेथील पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, सरपंचाचे आसनही रिकामे होणार आहे. दि.१३ च्या शासनआदेशानुसार सरपंचपदी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची नियुक्ती सीईओ करणार असल्याने, नियुक्त झालेल्या विस्तार अधिकार्यांच्या प्रशासकपदावर गंडांतर येणार आहे. दरम्यान २६ ग्रामपंचायतींच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी प्रशासक नियुक्तीच्या स्पर्धेत स्वत:ची वर्णी लावण्यासाठी स्थानिक नेत्यांची धावपळ सुरू झालेली आहे.
किनवट तालुक्यातील मदनापूर चि., बोधडी खु., दहेगाव चि.या तीन ग्रामपंचायतींची मुदत २२ एप्रिलपर्यंत, तर आंदबोरी ई., मलकापूर खेर्डा, गोंडेमहागाव, करंजी हुडी, कुपटी बु., लिंगी, मलकवाडी या सात ग्रामपंचायतींची मुदत १ मे रोजी संपलेली आहे. या दहा ग्रामपंचातींच्या निवडणुका मे अखेर होणे अपेक्षित होते. त्याची तयारी म्हणून दहा ग्रामपंचायतींच्या ३१ प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले होते. नॉमिनेशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली होती. फक्त अर्जांची छाननी बाकी होती. त्यामुळे डावपेच आखले जात होते.सरपंचपदाची स्वप्न स्थानिक नेत्यांना पडत होती. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाला. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित झाल्याची बातमी येऊन धडकली. शासनआदेशानुसार या दहा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले.
जुलै ते डिसेंबर या कालावधीत चिखली ई., दयालधानोरा, भिसी, गोंडजेवली, पांगरपहाड, फुलेनगर, रिठा, पांगरी, मूळझरा, शिवणी, कोसमेट, इस्लापूर, अप्पारावपेठ, इरेगाव, कंचली ई., रामपूर/भामपूर या १६ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे. उपरोक्त शासन आदेशान्वये आता जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने तालुक्यातील एकूण २६ ग्रामपंचायतींवर योग्य प्रशासकाची नियुक्ती करणार असल्याने, इच्छुकांची लगबग वाढली आहे.
पूर्वीच्या निर्णयात प्रशासकांना फक्त सरपंचांचे अधिकार राहतील असे नमूद केले होते. मात्र ग्रामविकास विभागाने १४ जुलैला शुद्धिपत्रक काढून ग्रामपंचायतींवर नियुक्त होणार्या प्रशासकांना सरपंचांच्या अधिकारासह ग्रामपंचायतीचे सर्व अधिकार राहतील, असे नमूद केले आहे. ग्रामपंचायत प्रशासक पदावर विराजमान होणारी योग्य व्यक्ती कोणत्या शर्ती, अटी लावून ठरविले जातील, हे कुठेच स्पष्ट केले नाही. स्वाभाविकच ते व्यक्ती कोण असतील, या बाबतीत डोकं खाजविण्याची वेळ आली आहे.त्यामुळे गावाचा प्रथम नागरिक बनण्याची सुवर्णसंधी कुणाला मिळणार याकहे गावकर्यांच्या नजरा लागल्या आहेत.
विशेष म्हणजे, या शासनआदेशातील निर्देशाप्रमाणे प्रशासकाची नेमणूक पालक मंत्र्यांच्या सल्ल्याने होणार असल्यामुळे, किनवट विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असूनसुद्धा, तालुक्यातील मुदत संपलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे प्रशासक नेमल्या जाण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.
Monday, 20 July 2020
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment