कोरोनाच्या जागरात सकारात्मक सहभागासाठी “मिशन पॉझिटिव्ह सोच” - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 11 July 2020

कोरोनाच्या जागरात सकारात्मक सहभागासाठी “मिशन पॉझिटिव्ह सोच”


नांदेड  दि. 11 :- कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे विविध प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. या प्रयत्नांसमवेत लोकांच्या मनात कोरोना आजाराबद्दल असलेली भिती दूर करणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविले जाणारे “मिशन पॉझिटिव्ह सोच” हे अभियान जनतेच्या मनात सकारात्मक सद्भाव निर्माण करेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करीत या अभियानास शुभेच्छा दिल्या.

या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यापासून रोखायचे असेल तर जनतेने स्वत:हून काळजी घेत सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वावरले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग खूप आव्हानात्मक आहे. लोकांनी अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. सुरक्षिततेसाठी शासनातर्फे जे काही नियम, आदेश दिले जात आहेत ते कसोशीने पाळले पाहिजेत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. “मिशन पॉझिटिव्ह सोच” या अभियानाचा मुळ उद्देश लोकांच्या मनात या आजाराविषयी असलेली भिती घालवून परस्परांबद्दल विश्वास निर्माण व्हावा असा आहे. यात ज्या कोविड योद्धांनी या आजारावर मात केली त्यांचे अनुभव त्यांच्याच बोलण्यातून लोकांपर्यंत पोहचावेत असा प्रयत्न केला गेला आहे. यातील मुलाखती या डिजिटल प्लॅटफॉर्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अलिकडच्या काळात व्हाट्सॲप, ट्विटर, इनस्ट्राग्राम, फेसबुक आदी सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक चुकीचे संदेश व्हायरल होत असल्यामुळे जनतेत कोरोना आजाराविषयी जनतेच्या मनात भिती व घृणास्पद भावना वाढीस लागली आहे. याची बाधा ज्यांना होते त्यांच्याविषयी अनेक गैरसमज सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात आहेत. ज्या व्यक्ती या आजाराने बाधित होत आहेत त्यांना वेगळ्या मानसिक स्थितीतून जावे लागते. शिवाय ज्या कुटुंबात बाधित व्यक्ती आढळतो त्या कुटुंबाबद्दलही अनेक गैरसमज समाजात निर्माण होत असल्याने हा आजार आता एका मानसिक आव्हानावर येऊन ठेपला आहे. लोकांच्या मनातील कोविड-19 बद्दलचे असलेले गैरसमज दूर व्हावेत व बाधित व्यक्तींना समाजाकडून धीर मिळावा या उद्देशाने राज्यात प्रथमच “मिशन पॉझिटिव्ह सोच” हे अभियान प्रातिनिधिक स्वरुपात राबविल्या जात असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी दिली. कोरोनाविषयी एकमेकांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या भावना जितक्या अधिक प्रमाणात सोशल मिडियावर शेअर केल्या जातील तेवढ्या प्रमाणात लोकांच्या मनात या संसर्गजन्य आजाराकडे व ज्या कुटुंबातील सदस्याला हा आजार झाला त्यांच्या परिवारातील सदस्याविषयी एक वेगळी विश्वासर्हता या अभियानातून निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले. या अभियानात शासकिय विभागांसह समाजातील विविध मान्यवरांचा सहभाग घेतला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages