किनवट,दि.13 (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून,मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक असल्याने, प्रशासनाने रविवारच्या मध्यरात्रीपासून संचारबंदीचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर दवाखाने,औषधी आदी अत्यावश्यक सेवा सोडून किनवट शहरासह तालुक्यातील सर्व प्रतिष्ठाणे कडकडीत बंद होती.
यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, दूध, किराणा आदी ज्या सुविधा काहीकाळासाठी चालू होत्या, आता भाजीमंडई व किराणा दुकानेही पूर्णपणे बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळी 7 ते 10 पर्यंत आवश्यक तिथे दूध,भाजीपाला व वृत्तपत्रे घरपोच पोहोचविण्याची सूट असल्यामुळे, ते वितरित करण्यात आले. रास्तभाव दुकानांना सकाळी सात दुपारी दोन पर्यंत सूट असल्याने, ती काही ठिकाणी उघडी होती. शहरात लॉकडाऊनची कडकपणे नीट अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी येथील सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शहरात आज सोमवारी सकाळी फेरफटका मारला. सोबतच्या सहकार्यांसह त्यांनी प्रत्येक चौकात फिरून नागरिकांंच्या तोंडाला मास्क आहे की नाही? लोक सामाजिक अंतर राखत आहेत की नाही? याची तपासणी केली. संबंधित अधिकार्यांना विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी तसेच कृषी सेवा केंद्रात बी-बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना शेतकर्यांनी गर्दी करू नये, आपापसात अंतर राखावे व नागरिकांनी अकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करून या बाबींकडे लक्ष देण्यासाठी नगरपरिषद, तहसील व पोलीस प्रशासनाच्या संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार उत्तम कागणे, एपीआय विजयकुमार कांबळे, किनवट नगर परिषदेचे चंद्रकांत दुधारे, रमेश नेम्मानीवार, अभियंता राहुल निकम, अभिजित मिरकले, अल्ताफ, तोफिक, सय्यद सिराज आदी कर्मचारी होते. गोकुंदा येथे कोरोना बाधित व्यक्ती आढळल्यानंतर किनवटवासी खडबडून जागे झाले. त्यामुळे आज पहिल्यादिवशी तरी संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment