किनवट ,दि.१७ : बँकेच्या कर्जासह सततची नापीकी आणि सोयाबीनचे पेरलेले बोगस बियाणे उगवले नसल्यामुळे, धसका खाऊन गोंडखेडा (कोपरा) येथील एका शेतकर्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. महसूल आणि कृषी विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, बोगस बियाणे प्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोपरा ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील गोंडखेडा येथील गोविंद विश्वनाथ गुट्टे (वय ४७) या शेतकर्यानेे बुधवारी (दि.१५) विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले होते. उपचारासाठी त्यास गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यास तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे पाठवण्यात आले होते. उपचाराच्या दरम्यान गुरूवारी (दि.१६) सकाळी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करुन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
गोविंद गुट्टे हे लहान शेतकरी होते. पूर्वीचे बँकेचे थकीत कर्ज आणि दरवर्षीच नापीकीचा सामना करावा लागत होता. त्यात अधिकची भर म्हणून या खरीपात सोयाबीनने धोका दिल्याने दुबार पेरणीचे संकट आले. बोगस बियाण्यामुळे गुट्टे हे पुरते हतबल झाल्याने, शेवटी वैतागून त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची चर्चा गावामध्ये होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment