कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा सणासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 15 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा सणासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना


नांदेड,  दि. 15 :- जिल्ह्यात पोळा सण मंगळवार 18 ऑगस्ट रोजी साजरा होणार असून हा सण ग्रामपातळीवर व्यापक स्वरुपात साजरा होतो. या सणाचे औचित्य साधून ग्रामपातळीवर कोरोना संसर्गजन्य विषाणुचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार इंसिडंट कमांडर व सहाय्यक इंसिडंट कमांडर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खालील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन पोळा सण साजरा होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

पोळा सण हा घरगुती सण म्हणून साजरा करावा. यादिवशी मिरवणुका काढू नयेत. अत्यंत साधेपणाने व मर्यादित व्यक्ती समवेत मास्क, सॅनिटायझर, शारिरीक अंतर आदींचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांची ग्रामपातळीवर नियुक्ती करुन कोविड-19 कोरेाना प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन होऊन विषाणुंचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी धार्मिक स्थळाच्या‍ ठिकाणी लोकांचा जमा एकत्रित होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानिक स्तरावर नियोजन करुन हा सण व्यवस्थितरित्या पार पडेल याची इंसिडंट कमांडर व सहाय्यक इंसिडंट कमांडर यांनी योग्य ती कार्यवाही करावी.

जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश गुरुवार 20 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमणार नाहीत, सार्वजनिक रितीने घोषणा देणार नाही, गाणी म्हणणार नाहीत किंवा वाद्य वाजविणार नाहीत. तसेच नांदेड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी आदेश लागू असल्याने धार्मिक स्थळावर नागरिक, भाविकांना पुजेचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी घालण्यात आली आहे, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages