किनवट तालुक्यात सलग चवथ्या दिवशीही सर्वदूर पाऊस शेतातील पिके खरडल्या गेलीत; पिकांवर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 August 2020

किनवट तालुक्यात सलग चवथ्या दिवशीही सर्वदूर पाऊस शेतातील पिके खरडल्या गेलीत; पिकांवर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता

किनवट ,दि.१९ :  तालुक्यात  सर्वदूर पावसाचा जोर कायम असून, रविवारी तीन मंडळात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी सोमवारी मांडवी व दहेली मंडळात अतिवृष्टी झाली आहे,तर मंगळवारी तालुक्यातील सर्व सातही मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.सध्या सर्वत्र ‘झड’ लागली आहे. बुधवारी(दि.१९) सकाळी आठ वाजता संपलेल्या गत २४ तासांत तालुक्यातील सातही मंडळात मिळून ७९ मि.मी.पाऊस कोसळला असून, त्याची सरासरी ११.२९ मि.मी.आहे.
   तालुक्यातील मंडळनिहाय पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळ निहाय पावसाची नोंद दिलेली आहे.   किनवट- २६(६८८मि.मी.); इस्लापूर- ११ (६३४ मि.मी.); मांडवी- ८ (५४८ मि.मी.); बोधडी- १९(६४८ मि.मी.); दहेली- ५ (७४७ मि.मी.); जलधरा- ६ (६१५मि.मी.); शिवणी-४ (८८३ मि.मी.) हवामान विभागाने यंदा पासून किनवट तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १ हजार ६३.०९ एवढे निश्चित केलेले आहे. तालुक्यात १ जून पासून आजपर्यंत पडलेला एकूण पाऊस ४ हजार ७६३ मि.मी. एवढी असून, त्याची एकूण सरासरी ६८०.४३ मि.मी.इतकी आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६८.४३ टक्के पाऊस झालेला आहे. सर्वात जास्त पाऊस शिवणी मंडळात झाला असून, सर्वात कमी  मांडवी मंडळात झालेला आहे.

    तालुक्यात सर्वदूर बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी,नाले,ओढे भरभरून वाहू लागली आहेत. अनेक शेतातूनही पाणी वाहून जमीन खरडल्या गेली आहे. पैनगंगेला जोरदार पूर येऊन ती दुथडी भरून वहात आहे. गंगाकिनारी असलेल्या बर्‍याच शेतात पाणी शिरून पिकांची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे समजते. असाच पाऊस कोसळत राहिला तर नदीकाठावरील गावांनाही पुराचा धोका असून, प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गत चार  दिवसापासून लागलेली ही ‘झड ’ थोडी अतीच झाली असून, चार दिवसापूर्वी जीवदान मिळालेल्या पिकांना  आता चिबडण्याचा धोका आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडून मुळ्या कुजण्याचा व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे, तालुका कृषी विभागाने सांगितले.

       १३ जूनला तालुक्यातील पहिली अतिवृष्टी इस्लापूर मंडळात  दुसरी ९ जुलैला बोधडी व जलधरा मंडळात, तिसरी २३ जुलै रोजी शिवणी मंडळात,; १६ ऑगस्टला चौथी तर १७ ऑगस्टला पाचवी अतिवृष्टी झालेली आहे.  अतिवृष्टी झालेल्या मंडळ परिसरातील शेत-शिवारात दलदल तयार झाले, सखल भागात पाणी साचले तर काही भागात उतारावरील जमीन खरडून जाऊन पिकांचे नुकसान झाल्याचे कळाले. सततच्या संततधारेमुळे बर्‍याच भागातील पिके चिबडली गेल्याचे काही शेतकर्‍यांनी सांगितले. तालुक्यातील जल प्रकल्पांतील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली असून, भूगर्भातील जलस्तरही उंचावला आहे.

No comments:

Post a Comment

Pages