आंबेडकरी विद्यार्थी चळवळ सक्षमीकरण काळाची गरज-सचिन निकम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 13 August 2020

आंबेडकरी विद्यार्थी चळवळ सक्षमीकरण काळाची गरज-सचिन निकमआंबेडकरी विद्यार्थी चळवळ सक्षमीकरण काळाची गरज.
आपला देश हा तरुणांचा देश आहे हे आपल्या देशातील तरुण नागरिकांच्या लोकसंख्येवरून जागभरापुढे आलेले आहे परंतु राजकारणात अथवा थेट निवडणुकीच्या प्रक्रियेतून विचार केल्यास देशातील तरुण लोकप्रतिनिधींची संख्या हि फार समाधानकारक नाहीये असे असतांना मोठ्या राजकीय पक्षांकडून तारुणांना आपापल्या पक्षात सामील करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत परिणामी या देशातील राजकीय सूत्रे आता तरुणांकडे येण्यास फार वाव निर्माण झाला आहे.पण जातिवादाची घाणेरडी विचार सरणी शोषितांना न्याय देईल हि शक्यता धूसर होत आहे.
कारण डाव्या-उजव्या साम्यवादी विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांनी मागील काही वर्षांपासून त्यांच्या विद्यार्थी संघटना-युवक आघाड्यानां विशेष ताकत देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे परिणामी ह्या पक्षांचे प्राबल्य भारतीय राजकारणात मजबूत होत आहे व छोट्या पक्ष संघटना त्यांच्या आश्रयास जाणे पसंद करीत आहे ज्यातुन या देशात द्विपक्षीय प्रणालीचा धोका निर्माण होण्याची शक्यता जोर धरत आहे जे जगातील सर्वात मोठया लोकशाही मानणाऱ्या आपल्या भारत देशाच्या समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या तत्व प्रणालीला छेद देणारे ठरणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या राज्य घटनेची निर्मिती करीत असतांना संसदीय लोकशाही चा अवलंब न करता अध्यक्षीय लोकशाही ची मांडणी करण्यासाठी मोठा प्रयत्न देशातील प्रस्थापित मंडळी करत होती.पण हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर संसदीय लोकशाहीच या देशाला तारू शकते ह्या मता वर बाबासाहेब ठाम होते.
शिवाय तत्कालीन प्रस्थापितांना हे बाबासाहेबांच्या बुद्धिमत्ते पुढे स्वीकारणे क्रमप्राप्त होते कारण बाबासाहेबांनी येथील भौगोलिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय परिस्थितिचा सखोल अभ्यास केला होता व यावरचे उपाय फक्त तेच करू शकतात ज्याला नाकरण्याइतका विद्वान जगात नव्हता/नाहीये हि खात्री त्यांच्या विरोधकांना होती.
आज घडीला ह्या राज्यघटनेला कुठल्याहि धर्मग्रंथापेक्षा मोठे स्थान आहे परंतु या देशाची घडी बसवत असतांना बाबासाहेबांनी या देशातील सर्वच शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक उत्कर्षाचे अधिकार बहाल केले शिवाय जातीच्या नावावर मागासवर्गीयांना मानवी हक्क नाकारणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन येथील कर्मकांडवादी,ब्राम्हणवादी,धर्मांध,अंधश्रद्धावादी प्रस्थापित व्यवस्थेस मोठे आव्हान दिले.ज्यामुळे धास्तावलेल्या धर्मवाद्यांनी बाबासाहेबांनी मागासवर्गीयांना दिलेल्या सवलती धोक्यात आल्याचा मोठा अपप्रचार केल्याने बौद्ध धम्मा कडे वळणारा समाज स्तब्ध झाला.परंतु मागासवर्गीयांच्या सवलती माझ्या खिशात असल्याचे सांगून पुन्हा सर्वांना मानवतावादी बौद्ध धम्मात येण्याचे आवाहन केले.परंतु धर्मांतराच्या काही दिवसातच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याने हा असंख्य समाज पोरका झाला.परिणामी बाबासाहेबांची राजकीय चळवळ संथ झाली.त्यांच्या स्वप्नातील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष बी सी कांबळे,दादासाहेब गायकवाड,एन शिवराज,राजाभाऊ खोब्रागडे यांनी शे का फे बरखास्त करून उभा केला तसा ठराव बाबासाहेब हयातीत असतानांच करण्यात आला होता. परंतु, अति महत्वकांक्षी व्यक्ती फार काळ एकत्र राहू शकत नाही हे सर्वश्रुत आहे. यामुळे पुढे काँग्रेस ने खेळलेल्या डावा मुळे रिपब्लिकन पक्षाची शकले झाली.
एक निराशेचे वातावरण व संताप विद्यमान नेत्यां विरोधात तरुणांमध्ये निर्माण झाला जो ह्या सगळ्यांना सुतासारखे सरळ करण्याचा निश्चय करून पुढे आला होता.त्यातून दलित पँथर हि लढाऊ विद्यार्थी-युवक चळवळ उदयास येऊन आंबेडकरी वटवृक्षाला या रूपाने नवी पालवी फुटली होती.
बाबासाहेब आपल्या विद्यार्थी व युवकांना विशेष महत्व देत डॉ. बाबासाहेब यांनी अनेक प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाच्या उत्थानाची जवाबदारी स्वीकारली पाहिजे हा आशावाद बोलून दाखविला होता पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची निर्मिती करून शोषित वर्गाला शिक्षणाची दारे खुली करून दिली.येथून शिकलेला विद्यार्थी असलेल्या पँथरमध्ये जणू हीच चुणूक दिसून आल्याने सकारात्मक चित्र सर्वांसमोर होते.थोड्याच काळात दलित पँथर चे लोण संपूर्ण भारतात गेले अन्याय निपटण्यासाठी भारावलेले तरुण-विद्यार्थी आपल्या भविष्याची चिंता न करता ह्या लढ्यास स्वतःला समर्पित करीत होते,टोल्यास-टोला,जशास-तसे,हे धोरण असल्याने एक दबदबा अल्पावधीतच येथील प्रस्थापित व्यवस्थेवर निर्माण झाला.परंतु गुळाच्या ढेपिस उध्वस्त करण्यासाठी जसे मुंगळे सरसावतात तसे काही लोक या चळवळीच्या यशाचे कौतुक करीत सर्वांना येऊन मिळाले परिणामी राजा ढाले-नामदेव ढसाळ यांच्यात मार्क्सवादी विचार सरणीला समर्थन करण्यावरून वाद पेटला तो पँथर मध्ये फूट पाडून गेला.पुढे रिपाई च्या गटाप्रमाणे पँथर मध्ये हि गट निर्माण झाले,समाजाच्या उत्थानासाठी सारसावलेला तरुण हा स्वमग्न जीवन जगण्यात मश्गुल झाला.
आज घडीला डॉ.बाबासाहेबांच्या नावे शेकडो पक्ष-संघटना आहेत परंतु त्यांचाच लढा हा स्वतःच्या अस्तित्व जपण्यासाठी असल्याने यांच्या कडून फार अपेक्षा समाज करू शकत नाही ह्याचे महत्वाचे कारण आहे सक्षम विद्यार्थी संघटना उभी करण्याकडे झालेले दुर्लक्ष. कारण विद्यार्थी चळवळ हि कार्यकर्त्यानां घडवणारी महत्वाची कार्यशाळा आज नादुरुस्त अवस्थेत गेली आहे.
आज घडीला या देशातील मोठे राजकीय पक्ष म्हणून सर्वश्रुत असणारे काँग्रेस,भाजप,कम्युनिस्ट हे त्यांच्या विद्यार्थी संघटनेच्या जीवावर मोठे झालेले पक्ष आहेत.त्यांच्या संघटनेत काम करणारा विद्यार्थी अथवा विद्यार्थी नेता हा त्यांची विचारसरणीचा वाहक असतो ज्याला ते सर्वार्थाने जपण्याचा प्रयत्न करतात. कारण एखादा सज्ञान तरुण हा एखाद्या पक्षाशी निगडित विद्यार्थी-युवक संघटनेत सक्रिय होतो तोच त्या संघटनेचा पाया मजबूत करतो पुढे नेतृत्व हि त्याच्या कडे चालून येते,कार्यकर्ता घडविणारी प्रक्रिया हि विद्यार्थी केंद्रित असल्यास आपल्या संघटनेचा जनाधार वाढविणे/टिकवून ठेवणे हे जिकरीचे ठरत नाही परंतु आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटना या महत्वाच्या प्रक्रियेला राबविण्यात/टिकविण्यात नापास ठरल्या आहेत त्यामुळे ही चळवळ एक जातीय/भावनिक होत सत्तेपासून दूर गेलेली आहे.
आज खऱ्या अर्थाने ह्या चळवळीचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे.आंबेडकरी पक्ष /संघटनेच्या आज घडीला असणाऱ्या विद्यार्थी संघटना ह्या किती क्रियाशील,अभ्यासू आहे हा आकडा जरी निराशा जनक असला तरी याला कारणीभूत त्या पक्ष संघटनेचे नेते आहेत कारण विद्यार्थी संघटनेची उपयुक्तता त्यांना ठाऊक असून देखील ते याला दुय्यम स्थान देतात.
संघटनेची बांधणी,त्यांना लागणारी वैचारिक रसद,प्रश्नाची उकल करण्याची दृष्टी देण्यात ते कमी पडत आहे.
बाबासाहेबांनी आपल्याला शिका । संघटित व्हा ।। संघर्ष करा ।।। हा मूलमंत्र दिला कारण त्यांना ठाऊक होते शिक्षित समाजच क्रांती करू शकतो परंतु तो शिकत असतांना त्याच्यावर चळवळीचे संस्कार करून समाजाच्या प्रश्नाची जाणीव करून देणे,त्याला सक्रिय करणे हे हि क्रमप्राप्त होते जे आपण सपशेल विसरतो.
आज जो तो नेता विद्यार्थी व विद्यार्थी चळवळीशी निगडित प्रश्नांना बगल देत कार्यकर्त्यांचा वापर कसा करता येईल त्याला भावनिक प्रश्नाभोवती गुंतवून दैनंदिन प्रश्नापासून दूर कसे नेता येईल ह्या विचाराने काम करत आहे.पुढे नेत्याच्या ह्या धोरणाची जाणीव त्या कार्यकर्त्याला होऊन ह्यातून काही साध्य होत नसल्याचे पाहून पुढे हाच कार्यकर्ता चळवळी पासून दूर होतो किंवा चळवळीतील मूळ उद्धिष्ट सोडून गैर प्रकारे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुढे येतो. यातील निम्याहून अधिक निराशेतून स्वतःला उध्वस्त करून घेतात तर बाकी सोयीनुसार काम करीत स्वतःचा उत्कर्ष साधतात ह्या भयावह चित्राकडे पाहून अनेक तरुण स्वतःला दूर ठेवणे पसंत करतात किंवा राजकीय महत्वकांक्षे पोटी इतर अविचारी प्रवाहात काम करतात.आज आंबेडकरी चळवळीतील बहुतांश तरुण निराशेने ग्रस्त आहे तर काही तरुण अंधारात चळवळीचा मार्ग चाचपडत आहे त्यांना दिशा देण्यासाठी आता पुन्हा दीपस्तंभ उभे झाले पाहिजेत. आज या देशातील शिक्षण,रोजगार,आरोग्य या तिन्ही महत्वपूर्ण बाबी भांडवलदारांच्या हाती सोपविण्याचा प्रयत्न भांडवलशहा मंडळींच्या अर्थपूर्ण मदतीने सत्तेत आलेले पक्ष करू पाहत आहेत ज्याला विरोध करण्यात अथवा त्याविरोधात जागृती करण्यात आपण खूप कमी पडत आहोत देशातील सर्वच यंत्रणा ह्या खाजगीकरणाच्या विळख्यात सापडत असतांना शासकीय नौकरी तील आरक्षण संपवून टाकण्याचा डाव खेळला जात पदोन्नती तील आरक्षण संपवून गुणवत्ता व अनुभवाच्या जोरावर उच्चपदी नौकरी करणारा अधिकारी हा भ्रष्टाचार,आपल्या अधिकारावर लढणाऱ्या बंधानाबाबत जागृती करतो,आवाज उठवतो म्हणून त्याला प्रशासकीय सेवेत महत्वाच्या पदावरून हुसकावून लावण्याचे धोकादायक षडयंत्र करण्यात येत आहे.देशातील बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे.
त्यातच आपली प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत नाकेबंदी करण्यासाठी शिष्यवृत्ती च्या योजनेला बंद करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत,उच्चवर्णीयांना मागासवर्गीयांच्या आरक्षण व शैक्षणिक सावलतींना विरोध करण्यासाठी रसद पुरविली जात असताना आंबेडकरी तरुण हा स्वस्थ बसून या कडे नुसता पाहत आहे जे येणाऱ्या पिढी साठी धोकादायक आहे.आंबेडकरी चळवळीत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बोलके आंबेडकरवादी व कृतिशील आंबेडकरवादी असे दोन ठळक गट झाले आहेत जे सातत्याने एक दुसऱ्यावर तोंड सुख घेत असतात त्यामुळे चळवळीतील संवाद कुठे तरी हरवल्यासारखा झाला आहे त्याची लागण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाली आहे.आज घडीला आपल्या देशातील उत्तर आणि दक्षिणेतील राज्यात आंबेडकरी विद्यार्थी हे मोठ्या हिमंतीने या प्रश्नाविरोधात लढण्याचा निश्चय करून मैदानात उतरले आहेत जे वैचारिक दृष्ट्या सक्षम आहेत व प्रखर आंबेडकरवादी आहेत परंतु डाव्या उजव्या संघटनांच्या प्रमाणात त्यांना कुठल्याही प्रकारचे ठोस राजकीय पाठबळ नसल्याने या संघटना एकाकी पणे संघर्ष करत आहे. पण ह्या संघर्षासोबत उच्च शिक्षण घेऊन फुले-आंबेडकरी विचारांसोबतच पेरियार,बिरसा तसेच जागतिक पातळीवर मानवता वादी विचारवंत म्हणून ख्याती पावलेल्या विचारवंतांची प्रेरणा घेऊन आंबेडकरी चळवळ हि सर्वहारा वर्गातील विविध जातिधर्मातील शोषित घटकांना सोबत घेऊ व्यापक करताना दिसत आहे.अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीशी मित्र पणा दाखविणाऱ्या डाव्या-साम्यवादी-समाजवादी विचारांचा होणारा विरोध,त्रास त्यांना सहन करावा लागत आहे परंतु आंबेडकरी विचारावरील निष्ठा एकाकीपणे ते जपून आहेत त्यांना आंबेडकरी चळवळीतील कुठल्याच गटाकडून ठोस स्वरूपाचा पाठिंबा नाहीये उलट डाव्या विचारसरणीचा पगडा असणाऱ्या विद्यार्थी नेत्यांना मात्र सन्मान पूर्वक वागविले जाते.शिवाय डाव्या उजव्या संघटनांनी आंबेडकरी विद्यार्थ्यांना आव्हान देण्याकरिता फुले-आंबेडकरी विचारांची नावे धारण करून डाव्या-उजव्यविचारांची वकिली करणाऱ्या संघटना उभ्या केल्या आहेत परिणामी ह्याच मंडळी मित्र संघटना म्हणून डाव्यांची समर्थन करतात तर आंबेडकरी विचारांच्या संघटनांच्या कार्यपद्धतीवर टीका करतात व डाव्या-उजव्यांशी असलेल्या जवळीकतेचे समर्थन करतात या वरून आंबेडकरी संघटनांना अनेक पातळीवर उभ्या टाकणाऱ्या प्रश्नांचा सामना करावा लागतो हे लक्षात येते.
हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठातील उच्चशिक्षित संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला ह्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ह्या संघटनेच्या विद्यार्थी नेत्याला आत्महत्या करण्याकरिता मजबूर करीत त्याचा संस्थात्मक खून घडविला ह्या वरून देशभरात मोठा उठाव होण्याची चिन्हे दिसत असताना एक जबरदस्त राजकीय खेळी करून जेएनयू मधील अंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधनु हा विषय बाजूला करण्यात आला पण रोहितच्या बलिदानाची धग अजूनही त्याच्या सहकाऱ्यांनी तेवत ठेवली आहे.जेएनयू मध्ये ह्याच काळात बिरसा आंबेडकर स्टुडेन्ट असोसिएशन नावाची आंबेडकरवादी संघटना प्रकाश झोतात आली पण तिलाही ठोस पाठबळ देण्यास आपले नेते पुढे न आल्याने हि संघटनाही एकाकी पडली आहे.या वरून विदारक चित्र महाराष्ट्रातील आंबेडकरी विद्यार्थी चळवळीचे आहे कारण येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटना आहेत परंतु त्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक नाहीये कारण पक्ष संघटनेच्या नेत्यांना ह्या संघटना फक्त एक औपचारिक भाग वाटतात त्यांना कुठलेही मार्गदर्शक तत्वे नाहीत,कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नाही,ठोस कृती कार्यक्रम नाही,ठोस पाठबळ नाही नामांतर चळवळीच्या लढ्यात उतरलेला विद्यार्थी काही नेत्यांच्या चुका मुळे पुढे बाजूला झाला याचेही सोयर सुत्तक नाही.
आज महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा आपल्या नेत्याची थोरवी गाण्यात व इतर नेत्यास नावे ठेवण्यात धन्यता मानन्यात गुंग आहे.
ज्या मूळे चळवळीत नवीन विद्यार्थ्यांना ते नकळत परावृत्त करीत आहेत या उलट इतर संघटनानां सरकार मधील अधिकारी लोक प्रतिनिधी हे सातत्याने शासन स्थारावरील विविध निर्णयाची/बदलाची माहिती पुरवतात, त्यांना हवी ती मदत पुरवतात,प्रस्थापितांच्या संस्था/महाविद्यालयात ह्यांना विद्यार्थी व प्रशासनातील दुवा म्हणून अप्रत्यक्ष पणे मान्यता आहे या उलट तेथील कार्यप्रणाली व छळाच्या विरोधात आवाज उठविनाऱ्या आंबेडकरी विद्यार्थ्यांना लक्ष केले जाते किंवा थेट लालच दाखवून त्यांना मॅनेज केले जाते पुढे यांच्याच माध्यमातून त्याला प्रस्थापित पक्षाच्या संघटनेत सामावून घेतले जाते यामुळे आपल्या संघटनांना कमकुवत करण्याची खेळी खेळली जाते हा डाव आपले नेतेही जाणून आहेत परंतु वरिष्ठ पातळीवरील असहकार्य मुळे आंबेडकरी विद्यार्थी चळवळ हि एका मर्यादेपलीकडे झेप घेत नाही परिणामी आपल्या शैक्षणिक प्रश्नांना सरकार व प्रशासन गांभीर्याने घेत नाही कारण त्यांच्यावर म्हणावा तसा प्रभाव-दबाव आपल्या संघटनांचा पडत नाही.उच्च शिक्षणा सोबतच प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी मोठे अडथळे निर्माण केले जात आहे ज्यातून आपली पुढील पिढी शिक्षित होईल का?शिकली नाही तर नोकरी व्यवसायात राहील का?शिक्षण,नौकरी, व्यवसाय नाही करु शकली तर स्वाभिमान गमावून पुन्हा गुलाम होईल हे स्पष्ट आहे.आज आपल्यातला शिकला सावरलेला वर्ग सामाजिक प्रश्नांवर मूग गिळून बसला आहे,मध्यमवर्गीय तरुणांमध्ये मोठे आत्मबल आहे,कष्ट उपसण्याची तयारी आहे पण त्यांना मानावे तसे मार्गदर्शन नाहीये.
आज देशातील युवक विविध प्रश्नांवर लाखोंचे बिननेतृत्वाचे मोर्चे आंदोलन करून आपली ताकद सिद्ध करतोय पण त्याला योग्य नेतृत्वाची जोड नाही यातील संधी साधू युवक हे लागलीच हवेत जाऊन स्वतःचा पर्यायाने समाजाचा कपाळमोक्ष करून घेत आहेत असे युवक इतरांच्या हातचे बाहुले बनून कधी समाजाचा घात करू लागतात हे त्यांनाही उमगत नाही.एवढ्या मोठ्या युवा शक्तीचा विश्वास संपादन करणे आज एकही नेता शक्य करू शकत नाही.ह्या दुरावस्थेमुळे युवक आपल्या प्रश्नाबाबत फार गंभीर नाहीये कारण त्याला ह्या प्रश्नांवर बोलते करण्यासाठी नेत्यांमध्ये एकवाक्यता नाहीये,आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम नाहीये फार तर तो रस्त्यावर उतरू शकतो पण तोच दैनंदिन प्रश्नाभोवती गुरफटलेला असल्याने त्याला ह्यासाठी जबाबदार कसे धरणार.
आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपली सक्षम विद्यार्थी चळवळ बांधणे हा एकमेव पर्याय आहे जेणे करून तोच विद्यार्थी,युवक आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पुढे येईल व पुन्हा आंबेडकरी चळवळ समृद्ध होईल असा आशावाद सामान्यांनी बाळगला आहे.गरज आहे नेत्यांच्या पाठबळाची जर आजचे विद्यमान नेते हे करण्यास नालायक ठरले तर पुन्हा दुसऱ्याच्या ओंझळीने पाणी पिण्याची वेळ आपल्यावर येईल व आपण शिकले सवरले लोक बाबासाहेबांना बेईमान ठरू.

No comments:

Post a Comment

Pages