त्रिरत्न बौद्ध महासंघाचा गरजूंना मदतीचा ओघ सुरूच ; तिसऱ्या टप्प्यातही जिल्ह्यात शेकडो किटचे वाटप होणार
नांदेड - येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने अन्नधान्याची गरज असलेल्या गरवंतांना ९ आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून दैनंदिन गरजा भागविणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप पालीनगर, बेलानगर परिसरात करण्यात आले. यावेळी धम्मचारी प्रज्ञारक्षित, धम्मचारी करुणाध्वज, धम्ममित्र विजय डोंगरे, धम्ममित्र सारनाथ खरे, अनुरत्न वाघमारे, शिवाजी पाईकराव, विलास सरकटे, धम्मसहाय्यक संदीप गजभारे यांची उपस्थिती होती. महासंघाकडून वाटपाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यातही कीटचे वाटप होणार असल्याची धम्ममित्र अनुरत्न वाघमारे यांनी ही माहिती दिली.
लाॅकडाऊनमुळे अनेक लोक बेरोजगार झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. वृद्ध स्री- पुरुष यांच्यासह सर्वांचीच उपासमार होऊ लागली. हे लक्षात घेऊन अनेक मंडळे, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, नेते, प्रतिष्ठांनानी धान्य वाटप, भोजनालये, जेवणाच्या डब्यांची व्यवस्था असे काही उपक्रम हाती घेतले. काही कालावधीनंतर ते थांबले परंतु वास्तव परिस्थिती लक्षात घेवून सामाजिक जाणिवेने त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या नांदेड शाखेने आजतागायत गोरगरीब, मजूर, गरजू कुटुंबाना कीटचे वाटप करुन मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. समाजाच्या विविध स्तरांतील गरजू असलेल्या कुटुंबांना महासंघाचा हा मदतीचा हात दोन घास भरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड केंद्राचे चेअरमन धम्मचारी पद्मसेन, धम्मचारिनी दानदीपा, धम्मचारी पद्मगर्भ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले होते. त्यात सातत्य ठेवत आटा , तांदूळ, गोडेतेल, साखर, तूरदाळ,चहा पत्ती, मीठ, अंगाची साबण,कपड्यांची साबण यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या साधारणतः १५ किलो वजनाच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. याकामी नांदेड केंद्राचे सर्व धम्मचारी, धम्ममित्र , धम्मसहाय्यक परिश्रम घेत आहेत. त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड केंद्राच्या वतीने धान्य किटचे वाटप करण्यात येणार असून यापुढेही संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून जमा होणऱ्या निधीतून शेकडो किटचे वाटप करण्याचा महासंघाचा मानस असल्याची माहिती धम्ममित्र अनुरत्न वाघमारे यांनी दिली.
No comments:
Post a Comment