महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन प्रवाहाला मराठा सेवा संघाने दिली मानवतेची जोड!.. रमेश पवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 31 August 2020

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन प्रवाहाला मराठा सेवा संघाने दिली मानवतेची जोड!.. रमेश पवार



महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन प्रवाहाला मराठा सेवा संघाने दिली मानवतेची जोड!


           आज मराठा सेवा संघाची स्थापना होवून ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.तिसाव्या वर्धापन दिना निमित्त मराठा सेवा संघाच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न मी या लेखाच्या माध्यमातून करीत आहे.महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज प्रबोधनाचा आणि समाज परिवर्तनाचा क्रांती गर्भ विचार रुजविला आणि नवा माणूस नवा समाज आणि नवा भारत उदयाला आला.प्रस्थापित समाजव्यवस्थेला आणि धर्म व्यवस्थेला नाकारणे या देशात कधीच सहज सोपे नव्हते.सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीचा विध्वंस होणे अपरिहार्य होते. ही विषमता निपटून टाकणारे तत्वज्ञान या तिन्ही महामानवाने संपूर्ण भारताला  दिले आणि भूमी तरारून यावी त्याप्रमाणे अवघा महाराष्ट्र प्रकाशाच्या दिशेने वेगावत गेला अशी एक प्रकाश ज्वाला म्हणजे मराठा सेवा संघ चळवळ होय.
"मराठा तितुका मेळवावा गुणदोषांसह स्वीकारावा" हे ब्रीद घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना युगनायक अॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी १ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे केली. "विचार बदलला तर, स्वभाव बदलतो,स्वभाव बदलला तर सवयी बदलतात,सवयी बदलल्या तर व्यक्तिमत्त्व बदलते व व्यक्तिमत्व बदलल्यावर भविष्य बदलते" हा कृतियुक्त संदेश मराठा समाजाच्या ह्रदयात कोरण्यासाठी व अंधश्रद्धा, रूढी,वैदिक कर्मकांडाच्या दलदलीत खोलवर रुतत चाललेल्या मराठा-बहुजन   समाजाला बाहेर काढण्याचे काम मराठा सेवा संघ व ३२ कक्षाच्या वतीने गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात  अविरतपणे,अवितश्रांतपणे चालू आहे.
 मराठ्यांच्या संपूर्ण जीवनात आमूलाग्र बदल करायचा असेल तर,निश्चितपणे बदलाची सूत्रेही पुरोगामी, सर्वसमावेशक आणि गतिमानतेचा विचार करणारी असावीत.याचा विचार करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगनायक अॅड.  पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सुरुवातीपासूनच मानवी जीवनातील पाच महत्त्वाच्या सत्तांचे मर्म ओळखले होते. त्यामध्ये धर्मसत्ता,अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार-प्रसार माध्यम सत्ता व शिक्षण सत्ता या सत्तांचा समावेश आहे. त्याला अनुसरून सेवा संघाने मराठा सेवा संघाचे संघटनात्मक स्वरूप ठरवून, कार्यपद्धती आखली व नियोजनबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी केलेली आहे.त्यामुळे आज बरयाच प्रमाणात चांगले यश मिळालेले  आहे. समाजातील युवक,महिला, शेतकरी,उद्योजक,पत्रकार, बुद्धिवंत,साहित्यिक यांना विचारपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय मिळावा म्हणून मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद,पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद,तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद इत्यादी ३२ कक्षांची निर्मिती केली.सर्व कक्षांना समाज उपयोगी विविध कार्यक्रम देवून, शिबिरे आणि बैठकांचे आयोजन करून एका सत्यशोधकी क्रांतिकारक सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे आज महाराष्ट्रासह देशात शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे संघटन म्हणून मराठा सेवा संघ अग्रेसर आहे.अॅड.खेडेकर साहेबांनी स्वतःच्या अभियांत्रिकी ज्ञानाचा, अनुभवाचा आणि इतर क्षेत्रातील चिंतनाचा,अभ्यासाचा उपयोग मराठा सेवा संघासाठी आतापर्यंत केला आहे.मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या चिकित्सक,संशोधनात्मक धोरणामुळे दादोजी कोंडदेवाची छत्रपती शिवरायांच्या गुरू पदावरून गच्छंती झालेली आहे. मराठा सेवा संघ नसता तर अजूनही त्यांचे गुरुपद ढळले नसते.जेम्स लेन प्रकरणात संपूर्ण  महाराष्ट्र जागविला तो खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनानेच! राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊंना काळा डाग लावू पाहणाऱ्यांना असा धडा मिळाला की,ते अद्यापही उजळपणे मिरवण्याचे धाडस करीत नाहीत.कुमार केतकरांना शिवशाही या अग्रलेखाद्वारे उपहासात्मक टीका  केल्याचे प्रकरण अंगलट आले आणि मराठा शक्ती जागृत झाल्याची नोंद त्यांना घ्यावी लागली.अन्याय अत्याचार आणि बदनामी करणाऱ्या वर्ण वर्चस्वीवादी लोकांचा चौखूर   उधळणारा घोडा मराठा सेवा संघामुळे ठाणबंद करून ठेवण्यात आला आहे.
         १२ जानेवारी हा माॅसाहेब  जिजाऊंचा राष्ट्रीय जन्मोत्सव दिन! १९९० पूर्वी हा दिवस इतिहासजमा झाला होता,पण जिजाऊंच्या जन्मगावी सिंदखेड राजा येथे खेडेकर साहेबांनी जिजाऊ जन्मोत्सवाचा प्रारंभ केला आणि आज खेडोपाडी हा दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे युवक, युवती,आबालवृद्ध साजरा करतात. माॅसाहेबावर लेखन केले जात आहे.त्यांच्या चरित्राचे विविध पैलू विचारवंत आपल्या भाषणातून लेखनातून  समाजापुढे ठेवू लागले आहेत.  जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा उत्साह १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवादिवशी अत्युच्च बिंदूवर असतो. मराठा समाजाला त्या निमित्ताने एका नव्या सांस्कृतिक पर्वाचा लाभ झालेला आहे.सिंदखेड राजा या बुलढाण्यातील जिजाऊंच्या जन्मगावी लाखाहून लोक,  शेकडो गाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून "जय जिजाऊ जय शिवराय" चा घोष, ऐतिहासिक स्फूर्तीदायक पोवाड्यांचे गायन हे सारे मन उल्हासित,प्रफुल्लित करणारे असते.खेडेकर साहेबांच्या शिवप्रेमाला आलेला भक्तीपूर्ण बहर पाहून,अनुभवून आपल्या ज्ञाती बांधवांचा अभिमान वाटतो. मराठा समाजातील मान्यवरांचे सत्कार केले जातात आणि आपला नेता योग्य प्रकारे मार्गक्रमण करीत आहे; याचे खूप समाधान वाटते.तुमचं आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय ही घोषणा वातावरणाला विद्युतभारित करणारी असते.
            हे सर्व घडलं मराठा सेवा संघाच्या ऐतिहासिक संशोधन आणि खेडेकर साहेबांमुळे! समाजातील स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी विचार आणि संशोधनातून मराठा सेवा संघाने सामाजिक संरचना,जडणघडण, परिवर्तन या सर्वाचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास केला.सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाला मी प्रथम उपस्थित होतो,तेंव्हा  प्रथमच स्त्रीमुक्ती स्वातंत्र्य या संकल्पनेवर साहेबांचे अतिशय प्रभावशाली भाषण मला ऐकायला मिळाले.त्या ठिकाणी अनेक नामवंत महीला भगिनी सुद्धा आपल्या भाषणात  एकामागोमाग एक प्रभावी आणि ह्रदयाला भिडणारे मुद्दे मांडत होत्या.त्यांची क्रांतिकारी विधाने होती.त्यातील तर्कशुद्धता वादातीत होती आणि खिळवून टाकत होती.अभिजन,सत्यशोधक ब्राह्मणेतर स्त्री-सुधारकवादी चळवळीच्या पार्श्वभुमीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून स्त्रीमुक्तीची चळवळ ही शिक्षण, स्वावलंबन,अंधश्रद्धा निर्मूलन, आर्थिक स्वातंत्र्य, निर्णय प्रक्रियेत सहभाग इत्यादी विषयाची सैद्धांतिक मांडणी केली. धर्मचिकित्सा केली.बहुजनकेंद्री स्त्रीविषयक सुधारणावाद मांडला. घडलेल्या इतिहासाचा आणि लिहिलेल्या इतिहासाचा अर्थ लावत स्त्री-इतिहासाची पुनर्मांडणी केली. पुराण कथा आणि मिथके यामध्ये दडलेल्या स्त्री-सत्तेचा शोध घेतला. प्राचीन मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा आणि सध्या पुजल्या जाणाऱ्या प्रतिकात्मक प्रतिमांचा अभ्यास करण्याचे ऐतिहासिक कार्य मराठा सेवा संघाने करून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन प्रवाहाला मानवतेची जोड दिली आहे.
     मराठा सेवा संघाच्या तीन दशकीय वर्धापन दिना निमित्त  समाज बांधवांना कोटी कोटी शिवमय शिवेच्छा!

                         - रमेश पवार
           जिल्हा सचिव,मराठा सेवा संघ नांदेड
                दुरभाष क्र:७५८८४२६५२१

No comments:

Post a Comment

Pages