पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये दोन भूखंडावरून रस्सीखेच.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 30 September 2020

पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये दोन भूखंडावरून रस्सीखेच..

 


किनवट ता.30 (बातमीदार) :  शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता  आंबेडकर चौकातील जकात नाक्याची जागा नवीन पोलीस चौकीसाठी देण्यात यावी, अशी मागणी  येथील पोलीस निरीक्षकानी पालिका प्रशासनास केली आहे. त्यास आमदार व खासदारांनी पाठबळही दिले, मात्र पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांत एकमत होत नसल्याने, जागेचा प्रश्न सध्यातरी अधांतरी राहिल्यामुळे  परिसरातील जागरूक नागरिकांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.


       किनवट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी 4 मार्च 2020 रोजी किनवट नगर परिषदेला जा.क्र.पव्यशा-2/म.ब.चौकी आं.चौ.किनवट/2019  नांदेड दि.13/08/2019 च्या संदर्भीय पत्रानुसार पत्र व्यवहार करुन, प्रस्तावित पोलीस चौकी बाबतचे संमतीपत्रक, जागा उपलब्धतेचा आणि बांधकामाबाबतच्या अहवालाची मागणी केली. मात्र, त्यावर काय निर्णय झाला हे मात्र कळू शकले नाही. खा.हेमंत पाटलांनी आणि आ. भीमराव केरामांनी वरिष्ठांपर्यंत पत्रव्यवहार करुन मंजुरी मिळविल्याचे  वृत्त आहे.  परंतु नगर परिषद मात्र अद्यापपर्यंत जागा देऊ शकले नाहीत, हे विशेष !.


        नगर परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधकांत याच जकात नाक्याच्या जागेवरुन मतभेद दिसून येत आहेत. भाजपाच्या सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभा घेण्याची शक्यता व्यक्त करताच, सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षगटनेत्यांनी बैठकीत मांडलेला प्रस्ताव हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे.  पूर्वीची जकातनाका ही नगर परिषदेच्या मालकीची जागा असून, त्या ठिकाणी पोलीस चौकी जर जनहितार्थ होत असेल तर यात विरोध कशासाठी होतोय? सत्ताधार्‍यांनी लोकहिताचा निर्णय घेऊन जकातनाक्याची जागा रिकामी करून त्याची  संमती आणि बांधकामाचा अहवाल पोलीस प्रशासनाला देण्याचे धाडस दाखवावे, अशा नागरिकांच्या  अपेक्षा असल्यातरी पालिका प्रशासन निर्णय घेणार काय ? यावर सध्यातरी प्रश्नचिन्हच आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांना चांगलेच ओळखून असल्यामुळे, राजकीय डावपेच टाकतांना  पोलिस चौकीसाठी जकात नाक्याच्या जागेचा विषय चर्चेत आला की, विरोधकांनी सराफालाईन मधील एका खुल्या भूखंडाचा  विषय समोर आणून ठेवला आहे. सदर भूखंड पूर्वी ज्या संस्थेकडे होता, त्यांच्याकडे लाखो रुपयांचे भाडे थकीत आहे. त्याविषयी पालिका प्रशासन काहीच कार्यवाही करीत नाही. तसेच पालिका आपल्या मालकीच्या मालमत्ता अवैधरित्या भाडेतत्वावर देण्याचे केंद्र बनल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी ऑनलाईन सभा होती, मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द झाल्याचे समजते. मात्र, सर्वसाधारण सभा घेतलीच तर ती वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही,हे ही तेवढेच खरे !

No comments:

Post a Comment

Pages