बौद्ध स्मशानभूमीवरिल आरक्षण उठविण्याची सांगवीकरांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 17 October 2020

बौद्ध स्मशानभूमीवरिल आरक्षण उठविण्याची सांगवीकरांची मागणी

 


नांदेड,दि. 17 – सांगवी येथील गट क्रमांक 214 मध्ये बौद्ध समाजाची पारंपारिक स्मशानभूमी आहे. याठिकाणी गेल्या 60 ते 70 वर्षांपासून अंत्यविधी संस्कार केले जातात. सांगवी परिसरात सात ते आठ हजार बौद्धांची लोकसंख्या असल्यामुळे या स्मशानभूमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सांगवीच्या बौद्ध समाजातील नागरिकांनी सदर बौद्ध स्मशानभूमीला मालमत्ता क्र. देऊन मान्यता देण्यात यावी आणि यावरील आरक्षण उठविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन सहाय्यक आयुक्त झोन -1 यांना देण्यात आले. 


सांगवीसह वाढीव परिसरातील त्रिरत्ननगर,सिद्धार्थनगर,शिवनेरी नगर,अंबानगर,रामनगर,गौतम नगर, म्हाळजा आदी भागातील आठ ते दहा हजार बौद्ध समाजबांधव बौद्ध स्मशानभूमीचा लाभ घेत आले आहेत. या स्मशानभूमीसाठी  तत्कालीन ग्रामपंचायतीने 17 नोव्हेंबर 1992 रोजी ठराव घेतला. या ठरावात गट क्रमांक 214 मधील 0.64 म्हणजेच 60 गुंठे जागा स्मशानभूमी अधिग्रहित केली. याचाच आधार घेऊन 2005 मध्ये सांगवीचे तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांच्या पंचनाम्याच्या आधारे 2005 तहसीलदारांनी 214 मध्ये 60 आर. ची नोंद सातबारा वर करून घेतली. हा सबळ पुरावा समजून बौद्ध स्मशान भूमीला मालमत्ता क्र. देऊन आरक्षण हटविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन 10 ऑगस्ट रोजी सांगवीच्या बौद्ध नागरिकांनी झोन क्रमांक 1 चे सहाय्यक आयुक्त यांना दिले.


दरम्यान, सांगवीच्या बौद्ध नागरिकांच्या स्मशानभूमीच्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रभाग 3 (ब) च्या नगरसेविका कौशल्या शंकर पुरी यांनी 9 ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून गट क्रं. 214 येथील बौद्ध स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे काय, या संदर्भातील माहिती मागविली असता झोन 1 च्या सहाय्यक आयुक्तांनी सांगवी वाढीव क्षेत्रातील असून, सदर भागाचा प्रारूप प्रसिद्ध विकास योजनेनुसार मौजे सांगवी बु. गट क्र. 214 आरक्षण क्रमांक 91 फायर ब्रिगेडने काही भाग बाधित होत आहे. उर्वरित भाग रहिवास विभागात समाविष्ट आहे,  गट क्रमांक 214 नांदेड शहराच्या वाढीव क्षेत्रात असून विकास योजनेनुसार फायर ब्रिगेडसाठी आरक्षित असल्यामुळे सदर गटामधील 0.60 आर म्हणजेच 60 गुंठे मालमत्तेची नोंद करता येत नाही, असे म्हटले आहे. 


हा प्रश्न निकाली लागावा तसेच या बौद्ध स्मशानभुमीचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी नगरसेवक प्रतिनिधी सदाशिव पुरी, रमेश गोडबोले आणि नांदेड भिमशक्ती शहरअध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी गर्जे, सांगवी-तरोड्याचे झोनल आयुक्त संजय जाधव, मनपाचे अभियंता दंडे, बिल कलेक्टर जोरावार यांनी बौद्ध स्मशानभूमीची स्थळ पाहणी केली. फायरब्रिगेडसाठी केवळ 3 गुंठे आरक्षित असल्यामुळे उर्वरित जागा बौद्ध स्मशानभुमीवरिल आरक्षण उठविण्यास काही हरकत नसल्याचे नगररचना विभागाचे अधिकारी गर्जे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages