धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साहित्यानंद प्रतिष्ठान नांदेडचे ऑनलाईन कवीसंमेलन रंगले! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 15 October 2020

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साहित्यानंद प्रतिष्ठान नांदेडचे ऑनलाईन कवीसंमेलन रंगले!

 नांदेड प्रतिनिधी:

साहित्यानंद प्रतिष्ठान महाराष्ट्र शाखा-नांदेड तर्फे

दि.१४/१०/२०२० रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुगलमिटच्या माध्यमातून आयोजित ऑनलाईन  कवीसंमेलन रंगले.जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कदम (सन्मित्र) व नांदेड जिल्हा कार्यकारिणीने सदर कवीसंमेलनाचे आयोजन केले होते.


सूत्रसंचालक गजलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी कवीसंमेलनाध्यक्ष अनुरत्न वाघमारे व मान्यवर कवींचे स्वागत केले.भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून कवीसंमेलनास सुरुवात झाली.


एकेकाच्या मनात फुले शाहू कोरावेत..

प्रत्येकाच्या रोमारोमात आंबेडकर पेरावेत!

अशा आशयघन शब्दांत कवीसंमेलनाची धडाकेबाज सुरुवात कवी प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली.


विज्ञानवादी बौद्ध धर्म,नाही अंधश्रद्धेला थारा...

न्याय समता बंधुता इथे समानतेचा एकच नारा!

अशा नेमक्या शब्दांत धम्मचळवळ व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व कवयित्री रुपाली वागरे-वैद्य यांनी सांगितले.


शांतता मिळणार नाही आत आहे युद्ध जर..

बुद्ध होइल मानवाचा पूर्ण झाला शुद्ध जर!

अशा दमदार शेरांनी नटलेली रचना गजलकारा दीपाली कुलकर्णी यांनी सादर केली.


अभिमानाचे जगणे आम्हा दिलेस तू

पाणी कसे चवदार केलेस तू..!

अशा समर्पक शब्दांत कवी रमेश मुनेश्वर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवनपट जिवंत केला.


एकसंध देश माझा शाहीनबागेत होरपळतो आहे..

जागे रहा दोस्तांनो माझा देश जळतो आहे!

अशा विदारक शब्दांत कवी राहुल जोंधळे यांनी प्रत्येक भारतीयाची अस्वस्थता नोंदवली व जागे होण्याचे आवाहन केले.


सोडून या जगाला का रे निघून गेला?

आकाश तारकांना कळला असेल बाबा!

अशा हळव्या रचनेतून कवी हिरालाल बागुल यांनी पितृप्रेम व्यक्त केले.


संकटकाळाचा हा तास आहे

प्रत्येकाला जगण्याची आस आहे!

अशी कोरोनाच्या अस्वस्थ काळात मनामनात आत्मविश्वास भरणारी रचना कवी नासा येवतीकर यांनी सादर केली.


आज माझ्या मनाची आग भडकली

नदीच्या किनारी चिता पेटली

कवी नागोराव डोंगरे यांच्या 'आई' 

या भावस्पर्शी कवितागायनास उपस्थितांची दाद मिळाली.


या माळावर फुले उमलली रंगबिरंगी किती..

एकदिलाने तरी राहती अवघ्या मानवजाती!

अशा शब्दांत भारतीय अखंडता व एकात्मतेचे दर्शन कवी पांडुरंग कोकुलवार यांनी करून दिले.


फुले शाहू आंबेडकरांचा वसा घेऊन जन्मावीत मुलं...

मग नक्कीच बहरतील मनामनावर समतेची फुलं!

असा दुर्दम्य आशावाद नवोदित कवयित्री भाग्यश्री आसोरे-जमदाडे यांनी व्यक्त केला.


डोक्यावर माझ्या सदा त्याची आभाळाची छाया

महिलांचा पाठीराखा झाला भीम भाऊराया!

अशा सार्थ शब्दांत बाबासाहेबांचे महिलोद्धाराचे अनन्यसाधारण कार्य कवी मनोहर बसवंते यांनी मांडले.


प्रत्येक वाक्य माझे न्यायासमान आहे

श्वासात भीम माझ्या मी संविधान आहे!

सिद्धार्थ गौतमाचा जर भूतकाळ माझा 

अस्वस्थ एवढे का मग वर्तमान आहे?

अशा दमदार शेरांमधून कवी,गजलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी व्यवस्थेवर आसूड ओढत जाब विचारला.


श्याम गायकवाड,कैलास धुतराज,शंकर गच्चे,प्रा.विलास हनवते,मिनाक्षी येनुगवार,सारीपुत्र चावरे,दत्ताहरी कदम,पंडीत तोटेवाड यांनीही आपल्या आशयघन रचनांमधून उपस्थितांची दाद मिळवली.


दीक्षा घेणारा माझा बाप

दीक्षा देणाराही माझा बाप...

भारत बुद्धमय करण्यासाठी पंचशीलेची कास धरली पाहिजे...

अन दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे!

असा अवघे विश्व समतामय करण्याचा संदेश कवीसंमेलनाध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी दिला.

साहित्यानंद प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक व भावी साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांनी अध्यक्षीय समारोप केला.

गजलकारा दीपाली कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले व कवीसंमेलनाची सांगता झाली.


समाजात स्वातंत्र्य,न्याय,समता व बंधुता यांचा नव्याने संदेश जावा यासाठी साहित्यानंद प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्रातील १३ जिल्हे व बेळगाव जिल्ह्यातही एकाच दिवशी एकाच वेळी या अशा प्रकारच्या सामाजिक कवितांच्या कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती

साहित्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष गजलकार विजय वडवेराव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages