आंबेडकरी संगित विश्वात अनेक कलावंतानी आपल्या गीतगायनातून भगवान बुद्ध व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रबोधनाच्या माध्यमातून जनमाणसांच्या मनात रुजवला असून त्यांनी निस्वार्थपणे आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं कार्य केलं आहे. त्यात आंबेडकरी गीतकार, गायक व संगीतकार विष्णू शिंदे यांचे कार्य अतिशय महत्वपूर्ण राहिलेले आहे.
विष्णू शिंदे हे मूळचे मराठवाड्यातील परळी वैजनाथ जवळील कानडी गावचे. विष्णू शिंदे व त्यांचे बंधू दत्ता शिंदे यांच सहावी,सातवी पर्येंतचं प्राथमिक शिक्षण परळी येथे झालं.1971 साली मराठवाड्यात भयंकर दुष्काळ पडल्यामुळे वडील तुळशीराम शिंदे,आई गंगाबाई शिंदे यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेवून 1972 साली मुंबई शहर गाठले.मुंबईत घाटकोपर भागातील पाईपलाईनच्या कडेला मोकळ्या जागेत बांबू व पालाच्या झोपडीत त्यांनी बस्तान बसविले.आईने भाऊ मानलेले कवी-गायक सोपान कोकाटे तसेच बाबूराव शिलवंत, महादेव मांजरे, दगडू गायकवाड,ज्ञानोबा मस्के ही कलावंत मंडळी तिथे एक वर्षापासून राहत होती.गायन केलेशिवाय जगण्यासाठी त्यांच्याकडे दुसरे कोणतेच साधन नव्हते.मराठवाड्यात चरित्र गायक म्हणून नावाजलेले विष्णू शिंदे यांचे आई-वडील प्रारंभी फुटपाथवर बसून एकतारीवर गायन करून प्रपंच चालवित असत.विष्णू शिंदे दत्ता शिंदे या दोघा भावांना संगीताचा वारसा आई-वडिलांकडूनच मिळाला आहे.
घाटकोपर येथे वास्तव्यास असताना शेजारी राहणारी कलावंत मंडळी हार्मोनियम, तबला वाजवून रिहर्सल करायचे. तेंव्हा तबला व हार्मोनियम ही वाद्ये कशी वाजवली जातात हे पहान्या साठी हे दोघे बंधू तेथे जाऊन बसत.एकदा एका कलावंताने ह्या दोघा भावांना अपमानी करून घरा बाहेर हाकलुन दिले.हे शिंदे यांच्या आईला सहन झालं नाही."माझ्या मुलांना सुद्धा तबला आणि हार्मोनियम घेवून देईन असे त्याच दिवशी तिने ठरवून टाकले" बळीराम निवडंगे नामक एका अंध कालवंताकडून 50 रुपयात जुणा तबला व 165 रुपयात हार्मोनियम खरेदी केली. आणि “तुम्हाला जसे वाजवता येईल तसे वाजवा"असे सुचवले.दोन्ही मुले तबला, हार्मोनियम वाद्य वाजवू लागल्यामुळे आई-वडिलांना खूप आनंद झाला.पुढे अचानक एके दिवशी म्युनिसिपालटीच्या अधिकाऱ्यांनी पाईप लाईन जवळील हे कलावंत राहत असलेली झोपडपट्टी उठवण्याचा निर्णय घेतला. मग सर्व कलावंतांनी विचार विनिमय करून जवळंच असलेल्या असल्फा व्हिलेजच्या डोंगर माथ्यावर चटई बांबूच्या झोपड्या उभ्या केल्या. इथे राहूनच विष्णू शिंदे यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.पुढे अकरावीला प्रवेश घेतला परंतु परिवार सांभाळन्याची जबाबदारी व वाढत्या कार्यक्रमांच्या व्यापामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही.ते राहत असलेल्या वस्तीमधून गायकांचे रोज आठ-दहा संच मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी गायनासाठी जात असत.त्याच समई आई-वडिलांना विश्रांती द्यावी म्हणुन विष्णू शिंदे - दत्ता शिंदे हे दोघे भाऊ मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी फूटपाथवर बसून गायन करू लागले. खुश होवून लोकांनी टाकलेल्या चिल्लर पैशाने अंथरून भरून जात असे.पावसाळ्यात मुंबईत दहा-दहा दिवस झड असायची.पाऊस लागुन राहिलेल्या दिवशी त्यांच गायन बंद आणि चूल ही बंद असायची. ज्यास्तच उपासमार होऊ लागली की,हार्मोनियम व तबल्यावर प्लास्टिक बांधून पडत्या पावसात हे दोघे भाऊ घाटकोपर रेल्वे स्टेशन गाठायचे.मग कुठल्यातरी रेल्वे फलाटावर गायन करून मिळालेल्या पैशातून घरच्यांसाठी वडापाव घेवून ते रात्री उशीरा घरी यायचे.घरी सर्वजण यांची आतुरतेने वाट पाहत बसलेले असत. अशा कठिण परिस्थितीत विष्णू शिंदे त्यांनी दिवस काढले.
"आंधळा मारतोय डोळा"या चालीवर "लंगडा मारतोय उड्या"हे पहिलं लोकगीत त्यांनी 1974 साली लिहिलं.लोकांना ते गीत खूप आवडलं.आई-वडिलांनी सुध्दा शाबासकी दिली.पुन्हा रोज एक नवीन गीत जन्मास येऊ लागले.1975 साली "मनोरंजन गीते" ही त्यांची पहिली गीत पुस्तीका प्रकाशित झाली.सांस्कृतिक क्षेत्रात कलावंत म्हणून स्वविश्वास दृढ होत असतांनाच धनंजय किर लिखित "डॉ.बाबासाहेब आंबेडकर"हा ग्रंथ त्यांच्या वाचणात आला.
"माझ्यासारख्या नेत्यांची दहा भाषणं आणि शाहिराचं एक गाणं उपस्थितांवर समान प्रभाव टाकीत असतं" हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कलावंतांवर विश्वास व्यक्त करून बोललेलं वाक्य डोळ्यासमोर ठेवून शिंदे यांचा पुढचा प्रवास सुरू झाला.आणि त्यात ते प्रचंड यशस्वी होत गेले.
मुंबई व मुंबईच्या बाहेर अनेक नामवंत कलावंतांसोबत मुकाबल्याच्या कार्यक्रमसह बुद्ध- भीमगीत गायनाचे आजवर जवळपास पंधरा हजाराहून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.त्यांचे गायन सुरू झाल्यास श्रोत्यांना रात्र संपून सकाळ कधी झाली याचे भान देखील राहत नसे.1990 साली त्यांचा "संघर्ष"हा गीत संग्रह प्रसिद्ध झाला.
पुढे कॅसेटचा नवा काळ सुरू झाला.अनेक कार्यक्रमांमुळे त्यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात होते. याचा लाभ घेन्या साठी टी.सिरीज, व्हीनस, टिप्स, सरगम, स्वरानंद, कृनाल अशा नामवंत कॅसेट कंपन्यांनी विष्णू शिंदे यांच्या आवाजात दोन हजाराहून अधिक गाणी रेकॉर्डिंग करून बाजारात आणली. "एहसान भीमजी के" या त्यांच्या हिंदी भिम गीतांच्या कॅसेट मधील मंगेशकर घराण्यातील गोड गळ्याच्या गायिका उषा मंगेशकर यांनी गायिलेलं “रामजी का लाल"हे गीत संपूर्ण देशभर खूपच लोकप्रिय झालं. त्यानंतर व्हिडिओचा काळ आला.एकंदरीतच हा काळ शिंदे यांच्या साठी सुवर्णकाळ ठरला. विष्णू शिंदे यांची काही निवडक गाणी येथे देत आहे.
युगों-युगों तक अमर रहेगा,धरतीपर त्रिकाल !
रामजी का लाल वो,रामजी का लाल !! धृ !!
अतुलित रूप उसका,अतुलित ज्ञान था !
जनम से अच्छुत लेकीन करम से महान था ! औरों के लिए पहले अपना, भिमने बनाया मन विशाल
अपने ही आसूंओं को,मन ही मन वो पिते थे !
दिन दलित बंधु सारे मर मर के जी रहे थे ! देखा गया ना भीम को यहा पे,दीन दुखीयों का बुरा हाल!
भीमराव आंबेडकर ये लाखों में नाम था !
संघर्ष करना लढना भीमजी का काम था!
"विष्णू"हमारे हक्क के लिए वो,लढता रहा था सालों साल
2) ह्या देशाच्या संस्कृतीला जीवेच मारू नका हो !
जात विचारू नका कुणाला जात विचारू नका हो!धृ!
जात विषमतेची मुळी, जात संकल्पना खुळी !
ह्या जातीने घेतले कोटी भावांचे बळी !
मारून टाका ह्या जातीला,कुणीच तारू नका हो!१!
जातीची बनवून सूरी, कोणी मारीली उरी !
ही स्वार्थी लुच्चेगिरी तुम्ही जाणा आता तरी !
समता मैत्री बंधुत्वाला दूर सारू नका हो !२!
खोटा जातीचा मंतर,भावात करी अंतर !
तुम्हा गुढ कळलं हे खरं, शाळा शिकल्या नंतर!
"विष्णू"कुणाला ह्या जातीचं विष हे चारू नका हो !३!
आंबेडकरी चळवळीला पोषक अशी हजारो गाणी विष्णू शिंदे यांनी लिहिली असून ती स्वतः व इतर कालवंतांकडून गाऊन घेतली आहेत.देशभरात हजारो गायक-गायिका त्यांचे शिष्यगण असून ते गीत गायनाद्वारे आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याचे काम सातत्यपूर्वक करीत असतात.
महाराष्ट्रात कलावंतांची काही कमी नाही. पण विष्णू शिंदे यांच वेगळेपन म्हणजे गीतकार-गायक -संगीतकार हे तिन्ही गुण त्यांच्या अंगी विराजमान आहेत.तरीही कोणत्याच प्रकारचा गर्व नाही,तसेच कोणते ही व्यसन नाही.इतर कलावंतांना सोबत घेवून चालणे व त्यांचा सन्मान करणे या सदगुणा मुळे ते अवघ्या महाराष्ट्रातील जनतेच्या आणि कलावंतांच्या मना-मनात आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी आपल्या कलावंतांसह खेड्या- पाड्यात जावून अन्याय झालेल्या पिडितांना गीतांद्वारे दिलासा देवून प्रतिकार करण्याची चेतना दिली. कार्यक्रम सुरू असताना अनेक ठिकाणी दगडफेक झाली.काही प्रसंगात जातीयवाद्यांकडुन त्यांना अपमान सहन करावा लागला.
महाराष्ट्रातील प्रख्यात आंबेडकरी साहित्यिक डाॅ.यशवंत मनोहर यांची प्रास्तावना असलेला विष्णू शिंदे यांनी लिहिलेला "त्रिरत्न"हा काव्यसंग्रह 14 ऑक्टोबर 2017 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रकाशित झाला आहे.ज्यात फुले,शाहु.आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित 151 गीतांचा समावेश आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात गटातटाच्या राजकारणामुळे आंबेडकरी चळवळीचे पर्यायाने बहुजन समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे.हे गटातटाचं राजकारणं कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख कालवंतांना एकत्र करून 2006 साली ऐक्या साठी महाराष्ट्रभर शेकडो कार्यक्रम करून जनजागृती केली तसेच चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन समोर प्राणांतिक उपोषण विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.
आयुष्यातील प्रत्येक वळणावरून पुढे जातांना पत्नी विमलताई यांची त्यांना सावली प्रमाणे साथ मिळाली. विष्णू शिंदे यांच्या कलावंत घराण्याचा सातव्या पिढीचा वारसा त्यांची मुले विशाल, विद्या, विश्वजित यांनी जपला असून तो पुढे चालू ठेवला आहे. कलावंत हा जगला पाहिजे,त्यांचे असणारे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत,या उदात्त हेतूने विष्णू शिंदे यांनी कलावंतासाठी "लोककला सांस्कृतिक मंच" ची स्थापना करून त्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर त्यांचे कार्य सुरू आहे.येणाऱ्या काळातही शिंदे यांच्या गीत गायनाची समाजाला खूप गरज आहे.
त्यांच्या गीत गायनाने आंबेडकरी चळवळीला बळ मिळो, हे कार्य करण्याकरिता विष्णू शिंदे यांना दिर्घायुष्य लाभो! त्यांच्या संगीत प्रवासास मंगल कामना !
- सदाशिव गच्चे, नांदेड
No comments:
Post a Comment