चिखलीफाटा येथे शनिवारी सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 19 November 2020

चिखलीफाटा येथे शनिवारी सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ..

 


किनवट ता.१९ : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) वतीने किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील चिखली फाटा येथील एम.एस.कॉटेक्स जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग येथे  कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ शनिवारी (ता.२१) सकाळी ११ वाजता आ.भीमराव केराम व खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. किनवट-माहूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला कापूस विक्री करिता आणावे, असे आवाहन सभापती अनिल पाटील कर्‍हाळे व सचिव रवी तिरमनवार यांनी केले आहे.


    शेतकर्‍यांच्या घरात पांढरे सोने येऊन महिन्याचा कालावधी लोटला अआहे. शासनाने लवकर कापूस खरेदी सुरू केली नसल्यामुळे, दिवाळी सारखा महत्वाचा सण साजरा करण्यासाठी तसेच कापूस वेचणी करणार्‍या मजुरांची मजूरी देण्याकरिता नाईलाजास्तव बर्‍याच शेतकर्‍यांना आपला कापूस अत्यंत कमी दराने खाजगी बाजारात विकावा लागला. आता मात्र शासनाची कापूस खरेदी सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शनिवार (ता.२१) पासून कापूस खरेदी सुरू होणार आहे. कापूस विक्रीसाठी आणतांना चालू हंगामातील ऑनलाईन सातबाराचा उतारा ज्यावर कापसाच्या पेर्‍याची व क्षेत्राच्या नोंदीसह तलाठी यांची स्वाक्षरी असावी. तसेच आधार लिंक असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते पुस्तक (पासबुक) ज्यावर आय.एफ.एस.सी कोड व खाते क्रमांक सुस्पष्ट असावा.  शिवाय आधारकार्डची झेराक्स व मोबाईल क्रमांकही सोबत आणावे. त्याचबरोबर सीसीआयच्या सूचनेनुसार स्वच्छ, केरकचरा विरहित कापसाची आद्रता १२ टक्क्याच्या आत असावी; अन्यथा तो कापूस नीट वाळवून आणावा. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बाजार समितीच्या आवारात व कापूस खरेदी केंद्रावर अनावश्यक गर्दी न करता, सॅनिटायझर व मास्कचा वापर व शारिरीक अंतर अनिवार्य आहे. कापूस विक्री करतेवेळी स्वत: शेतकर्‍याने अथवा त्यांची संमतीपत्र असलेल्या प्रतिनिधीने समक्ष उपस्थित असणे आवश्यक आहे. कापसाचा चुकारा ऑनलाईन थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे बाजार समितीचे सचिव रवी तिरमनवार यांनी सांगितले. याप्रसंगी सीसीआयचे अधिकारी (केंद्रप्रमुख) सचिन ढोरे व उपसभापती श्रीराम कांदे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages