नामांतराचा लढा सुरू झाला खेडोपाडी याबद्दल होणारी जनजागृती आणि दलितांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव तीव्रतेने होत असतांना मराठवाड्यातील खेडोपाडी सवर्णांच्या मन मेंदूत जात प्रतिष्ठेचा वणवा उठला.तो वणवा गावपातळीवर दलित वस्त्यांवर झुंडीने हल्ला चढवू लागला.वस्त्यांची राख रांगोळी करणे,कुणाचे हात तोडणे,पाय तोडणे,स्त्रियांवर बलात्कार करणे असे एक ना अनेक नीच कृत्य,
सवर्णांकडून होऊ लागले.अशीच एक घटना म्हणजे जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात "लिंबोनी" गावात घडलेली.
गायरान जमिनीवर आपला उदरनिर्वाह करणारी दलित कुटुंबावर रोष ठेवून त्यांच्या कष्टाच्या भाकरीवरच सवर्ण लोक गदा आणू लागले.याला विरोध म्हणून रितसर तक्रार नोंदवायला जाणारी दलित वस्तीच्या पदरात नैराश्य येत असे.त्यांना तेथील पोलिस पाटील वैगेरे सवर्णांच्या भीतीने सहकार्य करीत नसे.
पोलीस पाटलाकडे तक्रार केल्यामुळे आणखी चिडून २३ जून १९८६ रोजी तेथील सवर्णांनी दलित वस्तीतील काशीनाथ साळवे आणि दशरथ साळवे यांची घरे जाळून टाकली.तहसीलदाराकडे तक्रार केल्यामुळे गावातील सवर्णांनी गावच्या मंदिरात बैठक घेऊन दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकला आणि तिथून पुढे गावातील दलितांची आणखी वणवण सुरू झाली.दळण दळून न देणे,रोजगार न देणे,गायरान जमिनीत न जाऊन देणे,प्रवास करू न देणे असे अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली.
दलितांनी पुन्हा तत्कालीन तहसीलदार इंगळे यांच्याकडे तक्रार केली.त्याला गांभीर्याने घेत इंगळे यांनी पोलिसांचा ताफा लिंबूनीकडे रवाना केला.बंदी उठली परंतु प्रत्येक वस्तू दलितांना महागड्या किंमतीने देण्यात येत होती.
नामांतर लढा सुरू झाल्यानंतर या गावातील दलितांनी सुद्धा बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला लागावे या मागणीला दुजोरा देत, त्यासंदर्भात मोर्चे काढले होते,नेमका हाच राग धरून सवर्णांनी एके दिवशी पुन्हां हल्ला करून बावीस जणांना गंभीर घायाळ करत,दोन जणांना जीवे मारून टाकले.
या घटनेची माहिती पँथर गंगाधर गाडे साहेब यांना समजताच माईसाहेब आंबेडकर यांना बरोबर घेऊन ते घटनास्थळी पोहोचले.हत्याकांडाची संपूर्ण चौकशी करून जखमींना तात्काळ औरंगाबाद येथील रुग्णालयात वेगवेगळ्या ठिकाणी उपचाराची सोय केली.गावातील अन्यायग्रस्थाना अन्नधान्य आणि उपयोगी वस्तू पुरवण्यासाठी एक ट्रक भरून सदर गावात पोहोचवण्यात आला.आणि या घटनेबाबत अवघ्या महाराष्ट्रभर माईसाहेब आंबेडकर यांना बरोबर घेऊन जनआंदोलनच उभारले.आंदोलनाची तीव्रता पाहून शासनाला हत्याकांडातील आरोपीना शिक्षा करण्यास भाग पाडले.
गंगाधर गाडे साहेब एवढ्यावरच न थांबता तेथील दलित कुटुंबांना नोकरी मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
अश्या या लढवय्या पँथरने आयुष्याचा प्रत्येक क्षण सामान्य जनहिताच्या कामी लावला.बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गस्थ झालेला या पँथरचा इतिहास तरुणांना लढण्याचे बळ देतो.
‘पँथर्सनी प्रारंभापासून ते शेवटपर्यंत नामांतर किल्ला लढवला’लढा नामविस्ताराचा : ‘पँथर्सनी जेल भोगले, मार खाल्ला, संसार सोडले, नोकऱ्या सोडल्या, सर्वस्वी त्याग केला. दलितांचे आक्राळ विक्राळ रूप पाहून सरकारला नामांतर करणे भाग पडले. म्हणून स्वताकदीवर जिंकलेल्या या स्वाभिमानी लढाईचा प्रत्येक दलितास अभिमान वाटतो’ असे नामांतर लढ्याचे अग्रणी व माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले.
- स. सो. खंडाळकर
गंगाधर गाडे हे नामांतर लढ्याचे अग्रणी राहिले आहेत. कितीतरी मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह करून त्यांनी शेवटी नामविस्तार पदरात पाडून घेतला. या लढ्यातल्या एक ना अनेक कितीतरी आठवणी त्यांच्याकडे. एका दमात काय आणि किती सांगणार! पण ते सांगण्यापेक्षा या लढ्यातल्या प्रत्येकालाच त्यांनी केलेला त्याग, संघर्ष माहीत आहे. ते किती लढाऊ पँथर होते, त्यांची झेप कशी भल्याभल्यांना गारद करीत होती, हा स्वतंत्र विषय होऊ शकतो. नामांतर लढ्यातील गंगाधर गाडे यावरच एक भले मोठे पुस्तक होऊ शकते. आजही गंगाधर गाडे आणि नामांतर हे समीकरण कुणी विसरू शकत नाही.
१९७७ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील बीडचा कार्यक्रम आटोपून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जाणार होते. विमानतळाच्या रस्त्यावर मी आणि पँथर कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडले. मी स्वत: वसंतदादांच्या गाडीवर झेप घेतली. गाडीसमोर आडवा पडलो. त्याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अशाही वेळी मी वसंतदादा पाटील यांची गाडी ओढत होतो. माझी बोटे चिरली.
हात रक्तबंबाळ झाला. अंगावर जखमा झाल्या. पोलिसांच्या लाठ्यांनी संपूर्ण शरीर हिरवे-निळे झाले. रक्त गोठले. या आंदोलनात महिला आपल्या कच्च्याबच्च्यांसह आडव्या पडल्या. कोवळी बालके गाडीसमोर भिरकावण्यात आली. उस्मानपुरा भागातील जमनाबाई गायकवाड यांची मुलगी कायमची अपंग झाली, असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग गाडे यांनी यावेळी कथन केला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.
त्यांनी सांगितले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे हे स्वप्न पाहत होतो.
नवस्थापित पँथरचे सरचिटणीस या नात्याने ही मागणी मी ७ जुलै १९७७ रोजी केली. या मागणीसाठी पत्रके वाटणे, निदर्शने करणे, शिष्टमंडळे घेऊन जाणे, सभा-बैठका आयोजित करणे हे सातत्याने सुरू ठेवले. वसंतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ही मागणी एखाद्या समाजापुरती मर्यादित ठेवू नका. तिला व्यापक रूप द्या आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे असे की, ही मागणी विद्यापीठामार्फत केली तर आणखी बरे होईल. तेव्हापासून ते नामविस्तार करण्यापर्यंतच्या घटना घडामोडींचा मी साक्षीदार राहिलो. किंबहुना यात माझी कामगिरी व मी केलेला संघर्ष ठळक राहिला.
नांदेडला गौतम वाघमारे यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन केले. त्या घटनेने तर पुन्हा महाराष्ट्र हादरला. नामांतरासाठी वेळोवेळी केलेले बंद, काढलेले मोर्चे आजही आठवतात. बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या नावासाठी, सामाजिक समतेसाठी, परिवर्तनासाठी, दलितांच्या स्वाभिमानासाठी १६ वर्षे हा लढा लढावा लागला. त्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. अनेकांना जिवाची कुर्बानी द्यावी लागली.
No comments:
Post a Comment