बौद्ध संघटनांनी एकजुटीने काम करावे - अॅड. कविता निर्मला वामन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 21 November 2020

बौद्ध संघटनांनी एकजुटीने काम करावे - अॅड. कविता निर्मला वामन


नांदेड - राज्यासह देशभरात बौद्धांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. त्या आपापल्या परीने धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करीत आहेत. परंतु विविध संघटनांच्या काही समान मुद्द्यांवर बौद्ध संघर्ष समिती समन्वय घडवून आणत असून एकाच परिसरातील सर्वच बौद्ध संघटनांनी एकजुटीने काम केले पाहिजे अशी अपेक्षा बौद्ध भारत या त्रैमासिकाच्या कायदेविषयक सल्लागार अॅड. कविता निर्मला वामन यांनी व्यक्त केली. त्या सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात बोलत होत्या. यावेळी बौद्ध संघर्ष समितीच्या राज्य महासचिव दीपाली चव्हाण, राज्य संघटक किशोर पाटील, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते किशोर पाटील,    मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, सारिपुत्र चावरे यांची उपस्थिती होती. 



         सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील तरोडा शिवरोडस्थित दक्षता हाउसिंग सोसायटी परिसरात  'बौद्ध धम्म : संघर्ष आणि आव्हाने' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी अॅड. कविता वामन बोलत होत्या. दीपाली चव्हाण म्हणाल्या की, बौद्ध विहारे ही धम्म चळवळीची सांस्कृतिक केंद्रे आहेत. समाजातील विचारवंतांनी सांस्कृतिक आणि राजकीय आव्हाने स्विकारली आणि पेलली पाहिजेत. तरुणांनी या चळवळीत भाग घेतला पाहिजे. क्लास आणि मास ही आपल्या चळवळीचे वैशिष्ट्य बनले पाहिजेत. 



कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.साहित्य मंडळाच्या वतीने मान्यवरांचा ग्रंथभेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्रीसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर चर्चासत्रास प्रारंभ झाला. यात वैभव मुनेश्वर, बसवंत नरवाडे, जयशिला बुक्तरे, सुशिलाबाई धुतराज, शंकर गच्चे या चर्चकांनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार कैलास धुतराज यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages