किनवट ( प्रतिनिधी ) :
क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्त नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी डोंगरी तालुक्यातील अंबाडी घाटातील वनक्षत्र कुंडी पठार येथे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित काव्यमैफलित क्रांतिकारक रचना सादर करून बीरसांचा विचारांची पेरणी केली.
कवीसंमेलन अध्यक्ष म्हणून 'मी उजेड शोधतोय' या कवितासंग्रहाचे कवी सुभाष बोड्डेवार होते. पत्रकार गोकुळ भवरे, सांगावाकार महेंद्र नरवाडे, रमेश मुनेश्वर, प्रदीप कुडमेथे, रुपेश मुनेश्वर, रामस्वरूप मडावी व छायाचित्रकार निवेदक कानिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार युवाकवी पंकज भवरे यांनी मानले.
"छातीत वादळ फिरून जात कधी कधी
माझ्या गल्लीतलं
उघडे-नागड आदिवासी पोरगं
उजेड गच्च भरून घेऊ पाहणारे
त्यांचे आदिम अंधाराची डोळे
शोधत असतात युगप्रवर्तक पहाट
कधी घरात कधी उरात
तर कधी पोटात
पेटत असलेल्या उपवासी वणव्यात
तेव्हा दर क्षणी
जळत असतो माझ्या मनात शब्दसूर्य.. "
..कवी संमेलनाध्यक्षांनी सामाजिक परिस्थिती विशद करणारी क्रांतिकारक रचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
"आदिवासी जागला आज
बिरसा कळाया लागला,
क्रांतीची मशाल घेऊन
पुढे चालाया लागला..
आदिवासी सेना हो त्यांनी उभी केली
परकीयांचे सत्ता ती झुगारून दिली
जंगल जल जमीन आमची
डरकाळी फोडाया लागला.. "
क्रांतीची मशाल घेऊन पुढे चालाया लागला.. "
..क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्र्वर यांनी आदिवासी जागृत होऊन प्रगती करीत असल्याचे सकारात्मक रचना सादर केली.
"इतिहासाच्या पानामध्ये
जाणून घ्या घ्या हो स्थान
पहा बिरसाचा उलगुलान..
आदिवासींच्या हक्कासाठी
लढला तो वीर जवान.. "
..बिरसा एक इतिहासाचं सोनेरी पान आपल्या हक्कासाठी जीवाची पर्वा न करता लढणारा क्रांतीवीर महेंद्र नरवाडे यांनी क्रांतिकारक रचना सादर करून त्यांच्या कार्याची महती सांगितली.
"जल जमीन जंगल शाबूत ठेवू गा,
बिरसा चे विचार समजून घेउ गा..
जंगल आमचं घरदार,
जंगलावर हक्क आमचा
त्यांच्यासाठी डोक्यामध्ये पेरत जाऊ उलगुलान.. "
..कवी गीतकार रुपेश मुनेश्वर यांनी गेय कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
"आता मात्र त्रानहीही संपले होते
डोळ्यातले आसवांचे पाणीही आटले होते
देश रक्षणार्थ तुझे जीवन संपले ते मी ऐकले होते
तेव्हा माझ्या अंत्ययात्रेची वाट मी पाहत होते
आसुसलेले मन वाट तुझीच पाहत होते.. "
.. कवी रामस्वरूप मडावी यांनी शहीद सैनिका प्रति आदरभाव व्यक्त करणारी रचना सादर केली.
"बाबा गोनना हरमिंग मेहोन
नाकूने शाळाते वाटा गो
बाबा गोनना हेरंग मेहोन
बाबा गोनना सालदेन मनोन नाकूने शाळाते वाटा गो.. "
.. जंगो रायताड आदिवासी कुलदैवत प्रतिष्ठानचे प्रदीप कुडमेथे यांनी आदिवासी समाजातील मुले शिक्षणाकडे वळावेत तरच त्यांच्या प्रगती होईल अशा आशयाची गोंडी भाषेतील रचना सादर करून वाहवा मिळविली.
निसर्गरम्य ठिकाणी रंगलेल्या या काव्य मैफलित कोरोना कोविड १९ संदर्भात शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन घेण्यात आला होतो. एकापेक्षा एक क्रांतीकारक रचना सादर उपस्थित कविंनी सादर करून वाहवा मिळविली.
No comments:
Post a Comment