औरंगाबाद, दिनांक 09 – जिवीताची जोखीम पत्करून आपल्या देशवासियांच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिक, माजी सैनिकांप्रती सर्व नागरिकांनी नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे. सैनिकांच्या कार्याची महती लक्षात घेऊन प्रशासनही त्यांना प्रथम प्राधान्याने सर्व सोयी-सुवीधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा ध्वजनिधी संकलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन 2020-2021 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सय्यदा फिरासत यांच्यासह वीरमाता-पिता, वीरपत्नी, शौर्य पदकधारक, माजी सैनिक, त्यांचे पाल्य, कुटुंबीय इतर संबंधित उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, देशाच्या सीमा रक्षणासोबतच सैनिक देशांतर्गत सुरक्षा, अतिवृष्टी, पुर, नैसर्गिक आपत्ती व इतर आपतकालीन परिस्थितीत सर्व आघाड्यांवर जोखीम स्वीकारून पुढे असतात. आपल्या सर्वांच्या सुरक्षीततेमधील सैनिक हा घटक महत्वाचा असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन ही एक चांगली संधी आहे. या निधी संकलनात आपला जिल्हा नेहमीच उत्तम कामगिरी करत असून ध्वनदिन 2019-2020 निधी संकलनासाठी औरंगाबाद जिल्ह्याकरीता शासनाकडून, रू. 9267000 उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने 07 डिसेंबर 2020 रोजीच रूपये 10000000 (रूपये एक कोटी) चा धनादेश संकलीत करून शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलन करत गेल्या वर्षी ज्या पद्धतीने आपण उत्तम काम केलेले आहे त्याच प्रकारे 2020-2021 वर्षातही सर्वांच्या सहकार्याने जिल्हा निधी संकलनात अग्रेसर राहील, असे सांगून श्री. चव्हाण यांनी यावेळी सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीव्दारे उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त श्री. गुप्ता यांनी सैनिकांचे योगदान देशाच्या सुरक्षीततेमध्ये सर्वोच्च असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कामाचा आदर करण्याची संधी नागरिकांना या निधी संकलनाव्दारे उपलब्ध होत असते. या निधीचा उपयोग सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणकारी कामासाठी केला जात असल्याने अधिकाधिक प्रमाणात निधी संकलन करण्याचे आवाहन श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.
यावेळी वीरपत्नी, माता,पिता, शौर्य पदकधारक यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सैनिक कल्याण विभागातर्फे विशेष गौरव पुरस्कार देऊन माजी सैनिकांच्या इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सैनिक कल्याण समितीच्यावतीने एक कोटी रुपयांचा जमा झालेला निधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुण्याच्या सैनिक संचालक कार्यालयाला धनादेशाद्वारे यावेळी प्रदान करण्यात आला.
यावेळी शहीद शिपाई कैलास जाधव यांच्या वीरपत्नी श्रीमती कुसुमबाई जाधव, शहीद शिपाई भास्कर पातोंड यांच्या वीरपत्नी सुरेखा भास्कर पातोंड, शहीद सुभेदार सांडु दांडगे यांच्या वीरपत्नी शिला दांडगे, शहीद नायक चंद्रभान पवार, शौर्य चक्र यांच्या वीरपत्नी कांता पवार, शहीद हवलदार रविंद्र सावळाराम सुरडकर यांच्या वीरपत्नी आशा रविंद्र सुरडकर, शहीद नायक किरण पोपटराव थोरात यांच्या वीरपत्नी आरती किरण थोरात यांना गौरवण्यात आले. तसेच माजी सैनिक यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री. दामु सोनाजी पवार यांचा पाल्य कुमार अशिष, श्री. जनार्धन काकाजी गवळी यांचा पाल्य कुमार ओम, श्री. निवृत्ती पंढरीनाथ दैफळे यांच्या पाल्या कुमारी शुभांगी, श्री. अशोक दामोधर निळ यांच्या पाल्या कुमारी स्वाती, श्री . पंडीतराव दगडु वाबळे यांचा पाल्य कुमार पराग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी जय जवान अमर ज्योतीला पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती फिरासत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment