शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 30 January 2021

शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

                                 

औरंगाबाद,दिनांक.30(जिमाका): औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहरातील  शासकीय कला महाविद्यालयास एक प्रकारे ऐतिहासिक मुल्य आहे. परंतु विविध कारणामुळे ऐतिहासिक इमारतीची जीर्णाअवस्था  झाली आहे. परंतु यापुढे जिल्ह्याचा ऐतिहासीक वारसा जतन करुन कला शिक्षण  व पर्यटन वाढीच्या दृष्टीनेही  शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी  मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

शासकीय कला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व माजी विभाग प्रमुख प्रा. वामन चिंचोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त  प्रिंट मेकिंग कलावृत्तीचे प्रदर्शन शासकीय कला



महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी आ. अंबादास दानवे, शासकीय कला महाविद्यालयाचे डीन श्री. वडजे, माजी विद्यार्थी आयोजक  समिती औरंगाबाद विभागाचे किशोर निकम व इतर सदस्य तसेच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी  कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, शासकीय कला महाविद्यालयाने अनेक कलाकार दिले आहेत. ज्यामुळे महाविद्यालयाचेच नाही तर  आपल्या शहरालाही नाव लौकीक मिळाला आहे. येथील शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, कलेचा फायदा या शहरासाठीही व्हायला पाहीजे. त्यादृष्टीने  आजी माजी विद्यार्थ्यांच्या मागण्या, सूचनाही विचारात घेतल्या जातील. महाविद्यालयाच्या नुतनीकरणाचे डिझाइन तयार असून त्यात नवीन सुविधाही पुरविण्यात येणार असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.

आमदार श्री. दानवे म्हणाले की, शासकीय कला महाविद्यालय आणि परिसर ऐतिहासिक ठेवा आहे. या वास्तूमधूनच मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा संघर्ष पेटला होता. त्याची आठवण म्हणून येथे वंदेमातरम सभागृह बनविण्यात आले आहे. या महाविद्यालयाने पुर्ण महाराष्ट्राला गुणवंत कलाकार दिलेले आहेत. त्यांच्या कलाकृतीना प्रोत्साहन देणे  तसेच महाविद्यालयाच्या रुपातील ऐतिहासिक ठेवा पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही श्री. दानवे म्हणाले.

यावेळी माजी विभाग प्रमुख प्रा. वामन चिंचोलकर यांच्या प्रिंट मेकीग कलावृत्ती प्रदर्शनाची पाहणी तसेच महाविद्यालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने   पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अंबादास दानवे, यांनी केली. तसेच इमारत पुर्नरचना करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाबद्दल आजी माजी विद्यार्थी संघटनेने श्री. चव्हाण आणि श्री. दानवे यांचे आभार मानले.


No comments:

Post a Comment

Pages