किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व...! पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांची धम्मदेशना ----------- बावरीनगर इथं ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 28 January 2021

किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा 'धम्म' आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व...! पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांची धम्मदेशना ----------- बावरीनगर इथं ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात

 नांदेड, (प्रतिनिधी)- महाकारूणिक तथागताचा 'बुद्ध धम्म' हा कर्मकांड नसून तो जीवनमार्ग आहे. बुद्धाचा धम्म किती वाचला? किती कळला? किती पुजला ? आणि किती प्रचार-प्रसार केला? यापेक्षा तो आपल्या आचार -विचारांमध्ये किती आला? यालाच अनन्य महत्त्व आहे, असा उपदेश पूज्य भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी केला.


 तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे आज दिनांक २८ जानेवारी रोजी ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला सुरूवात झाली. भदन्त इन्दवन्श महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते सकाळी धम्मपरिषद परिसरामध्ये पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर धम्मदेसना देताना भदंत इन्दवन्श महाथेरो बोलत होते.


 मुळावा येथील भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे मुख्य संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


 याप्रसंगी पुढे बोलतांना भदंत इन्दवन्श महाथेरो यांनी तथागत भगवान बुद्धाने मानव कल्याणासाठी हा बुद्धधम्म दिला, असे सांगितले. पंचशील तत्वे, आर्यअष्टांगिक मार्ग अनुसरणामुळे जीवनातून दुःखाचा -हास होण्यास मोठी मदत मिळते. त्याचबरोबर शुद्धाचरणाने आयुष्य सुखकर होण्यासाठी बुद्धधम्म अतिशय उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.


 दोन दिवस चालणाऱ्या धर्मपरिषदेत पहिल्यांदाच 'ऑनलाइन' दूर दृश्य प्रणालीचा वापर करण्यात आला. परिषद स्थळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे पालन करून उपस्थित जनसमुदाय विद्वान भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घेतील, यासाठी आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे.


 आज पहिल्या दिवशी सकाळी त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधी वंदना, धम्म ध्वजारोहण अआदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री भव्य एल.ई.डी. स्क्रीन वर उपस्थित उपासकांना इटली, फ्रान्स, आयर्लंड, श्रीलंका, व्हिएतनाम आणि कंबोडिया आदी देशातील पूज्य भिक्खू संघ ऑनलाईन धम्मदेसना देणार आहे. धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उद्या दि. २९ जानेवारी रोजी दिवसभर भगवान बुद्धांच्या उपदेशावर भिक्खू संघाकडून धम्मदेसना दिली जाणार आहे. उद्या रात्री या ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा समारोप होईल, असे महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी स्पष्ट केले. धम्म परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भिख्खुसंघ  उपस्थित झाला आहे.

No comments:

Post a Comment

Pages