"महान धम्मप्रचारक भदंत आनंद कौसल्यायन" - मा. न्या. सुरेश घोरपडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 January 2021

"महान धम्मप्रचारक भदंत आनंद कौसल्यायन" - मा. न्या. सुरेश घोरपडे

 

   


 

     तथागत बुद्धांचा धम्म हा मानवतावादी धम्म आहे.    त्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय आहे.    हा धम्म पूर्ण नीतिमत्तेवर आधारित आहे.   त्यामध्ये मानवाला केंद्रबिंदू समजले आहे.   बौद्ध म्हणजे जात नाही तर ती एक विचारसरणी आहे.   जीवनमार्ग आहे.   तथागत बुद्धानंतर सम्राट अशोकाने जगभरात बुद्धधम्माचा प्रचार केला.   त्यांच्यानंतर मिलिंद, कनिष्क व हर्षवर्धन यांच्यासारख्या अनेक राजे लोकांनी व भिक्खू संघ आणि उपासकांनी बुद्धधम्माचा प्रचार व प्रसार केला. शंकराचार्य, कुमारील भट, राजा मिहिरकुल, राजा शशांक यांनी बुद्धधम्माला संपविण्याचा प्रयत्न केला.   कारण ते वर्णभेदी व जातीभेदाचे समर्थक होते.   त्यामुळे इ.स. १२०० पासून भारतातून बुद्धधम्माचा   ऱ्हास झाला.   परंतु इंग्रज आले आणि त्यांनी सम्राट अशोकाचे खंडहर  फँन्थेलर याने इ.स. १७०० मध्ये शोधले.    नंतर  जेम्स प्रिंसेप यांनी ७ वर्षांच्या अभ्यासानंतर अशोकाचे शिलालेख वाचले.   लाँर्ड बेंटिक, अलेक्झांडर कँनिंग हँम, जाँन स्मिथ यांनी बुद्धगया, लुंबिनी, कपिलवस्तु, कुशिनगर, अजिंठा लेणी इत्यादी पवित्र स्थळांचा शोध लावला.   त्यांनी पाली भाषेतील ग्रंथांचे भाषांतर इंग्रजीत केले.   त्यानंतर बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी कृष्णाजी केळूसकर (कदम) यांना तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज चरित्रग्रंथ लिहावयास सांगितले.   कृष्णाजी केळूसकर यांनी तथागत गौतम बुद्धांचे चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिले.   त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तथागत बुद्धांच्या धम्माची ओळख झाली व त्यांनी इ.स. १९५६ ला नागपूरला लाखो लोकांना बुद्धधम्माची दीक्षा दिली व भारतात बुद्धधम्माचे पुनरुज्जीवन केले.   डॉ. धम्मानंद कोसंबी, डॉ. राहुल सांकृत्यायन, भंते जगदिश काश्यप, डॉ. धर्मरक्षित,भंते अनागारिक धम्मपाल यांनी हिंदी-इंग्रजी मध्ये धम्मप्रसार केला.   त्याचप्रमाणे डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांनी बुद्धधम्माचा प्रचार प्रसार केला.

 

 जन्म व बालपण :-  डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांचा जन्म पंजाब प्रांतातील चंदिगढ जिल्ह्यात सुहाना या गावी  ५ जानेवारी १९०५  ला झाला.   त्यांचे लहानपणचे नांव   हरीनामदास असे होते. त्यांचा जन्म खत्री ओबीसी समाजात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नांव  लाला रामशरणदास असे होते. लहानपणीच त्यांचे वडील मरण पावले.   त्यांचा एक लहान भाऊ होता,  त्याचे नांव  हरिदास  असे होते.   त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती.   ते शिक्षणाच्या खर्चासाठी वर्तमानपत्र विकत असत, तसेच शिकवण्या घेत असत.   इ.स. १९२० मध्ये ते दहावी पास झाले.   तर १९२४ ला ते पदवी परीक्षा पास झाले.   ते लाहोरमध्ये असतांना उर्दू भाषेत लिहित असत.   त्यांच्या जीवनामध्ये एक अतिशय महत्वपूर्ण घटना घडली.   त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित करण्याची प्रथा होती.   त्यामुळे त्यांनी त्या अस्थी घेऊन रेल्वेने निघाले.   रेल्वे स्टेशनवर आल्यावर त्यांनी त्या अस्थिंच्या पिशवीला एका झाडावर लटकविले आणि थकलेले असल्यामुळे ते तेथेच झोपी गेले.   परंतु कोणीतरी त्यामध्ये किंमती वस्तू आहे असे समजून ती पिशवी घेऊन निघून गेले.   त्यांना अतिशय वाईट वाटले.   तेवढ्यात एक पंडित तेथे आला.   त्याने विचारले की काय झाले?  तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या अस्थी कोणीतरी घेऊन गेले आहे.   तेव्हा पंडित म्हणाला की, पापापासून वाचण्यासाठी सव्वा रुपया दक्षिणा दे.   परंतु बालक हरीनामजवळ काहीच पैसे नव्हते.   तेव्हा त्यांनी मनात विचार केला की, नदीमध्ये जर खरेपणा असेल तर त्यांचे काही बिघडणार नाही.   असे म्हणून त्यांनी वाळू नदीत फेकून दिली व पंडितला म्हणाले की, मी दक्षिणा देणार नाही आणि श्राद्धही करणार नाही.   येथूनच त्यांच्या बुद्धिवादी अध्ययनाला सुरुवात झाली.


महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्याशी भेट :-  या संघर्षाच्या काळात त्यांची भेट दामोधरदास नावाच्या साधुशी झाली.   त्यांचे नांव केदार पांडे असे होते.   जे पुढे  महापंडित राहुल सांकृत्यायन  या नावाने प्रसिद्ध झाले.   त्यावेळेस त्यांना परिव्राजकाचे कपडे भेट दिले आणि त्यांचे नांव  विश्वनाथ असे ठेवले.   महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी त्यांना भारतातील बुद्धधम्माच्या तिर्थस्थळांची यात्रा करण्याचा सल्ला दिला, ज्यावेळेस हरीनामदास साधुच्या रुपात भारतभ्रमण करीत होते. त्यावेळेस महापंडित राहुल सांस्कृत्यायन यांनी श्रीलंकेला येण्यासाठी त्यांना पत्र लिहिले. त्यानंतर ते मद्रासवरून श्रीलंकेला पोहोचले.   महापंडित राहुल सांकृत्यायनजी ईश्वराला मानत नव्हते.   त्यांच्याशी नेहमी चर्चा केल्याने विश्वनाथजी यांची हिंदू धर्मावरील आस्था संपली.   ते २३ वर्षांचे असतांना विद्यालंकार विहाराचे प्रमुख लुनुपोकुने धम्मानंद महास्थविर यांच्यापासून त्यांनी प्रव्रज्या ग्रहण केली व त्यांचे नांव  भिक्षू आनंद कौसल्यायन  असे झाले.   त्यावेळी  भंते अनागारिक धम्मपाल यांच्या सांगण्याप्रमाणे  भिक्खू आनंद कौसल्यायन  इंग्लंडला गेले. ते लंडनला दोन वर्षे राहिले. ते फ्रान्स आणि जर्मनीला सुद्धा गेले होते.   तेथे त्यांनी बुद्धधम्मावर प्रभावी भाषण दिले.   त्यांनी पाली त्रिपिटक भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला.   भिक्खू जगदिश कश्यप यांनी संपूर्ण  पाली त्रिपिटक  हिंदीमध्ये इ.स. १९५६ मध्ये संपादन केले व नालंदामध्ये नवनालंदा महाविहारची स्थापना केली.   महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी महत्त्वपूर्ण पाली साहित्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला.   त्याचप्रमाणे भंते आनंद कौसल्यायन यांनी श्रीलंकेतील सिंहली लिपीतील  महावंश  या चौथ्या शतकातील ग्रंथाचा हिंदीमध्ये अनुवाद केला.   तसेच त्यांनी जातक कथा, अंगुत्तरनिकाय, पाली धम्मपद, बुद्धवचन, पाली कच्चायन व्याकरण इत्यादी पाली ग्रंथांचे हिंदीमध्ये भाषांतर केले.   त्यांनी पाली हिंदीकोश तयार केला.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे हिंदीत भाषांतर केले.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९५६ ला महान बुद्धधम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  'बुद्ध आणि त्यांचा धम्म'  हा ग्रंथ इंग्रजीत लिहिला, पण त्याचे हिंदी भाषांतर भदंत आनंद कौसल्यायन यांनी केले.   यानंतर त्याचे भाषांतर पंजाबी भाषेत केले.   त्यानंतर  'बुद्ध और उनका संदेश'  या प्रोफेसर गांगुलीलिखित ग्रंथाचे त्यांनी हिंदीमध्ये भाषांतर केले.   त्यानंतर पी. लक्ष्मी नरसु यांनी महत्त्वाचा ग्रंथ  "इसेन्स ऑफ बुद्धिजम"   इ.स. १९०७ ला लिहिला.   हा ग्रंथ इंग्रजीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा वाचला, त्यांना सर्वांत चांगला ग्रंथ वाटला व तो ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९४८ ला परत प्रकाशित केला.   तो ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धधम्मावर सर्वांत चांगला वाटला होता.   या ग्रंथाचे सुद्धा भदंत आनंद कौसल्यायन यांनी हिंदीमध्ये भाषांतर केले.   त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा प्रभाव होता.

      तथागत बुद्धांनी सांगितले की, जगामध्ये दु:ख आहे आणि दु:खाचे निवारणसुद्धा होऊ शकते.   त्यासाठी त्रिशरण, पंचशील व अष्टांग मार्ग सर्वांसाठी सांगितला.   सर एडविन अरनाँल्ड यांनी बुद्धगया बघितली आणि इ.स. १८७९ मध्ये  'दि लाईट ऑफ एशिया' नावाचा तथागतांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा काव्यसंग्रह लिहिला.   इ.स. १९३२ मध्ये राहुल सांकृत्यायन यांच्याबरोबर भदंत आनंद कौसल्यायन युरोपमध्ये बुद्धधम्माचा प्रचार करण्यासाठी गेले.   भदंत आनंद कौसल्यायन यांना संस्कृत, पाली, इंग्रजी, मराठी, पंजाबी, हिंदी, सिंहली, उर्दू या भाषा येत होत्या.   त्यांनी चीन, जापान, थायलंड, म्यानमार या देशांना भेटी दिल्या.   श्रीलंकेच्या विद्याअलंकार विद्यापीठाने त्यांच्या शोधकार्याबद्दल त्यांना डि.लिट. ही मानक पदवी दिली.   नागपूर विद्यापीठाच्या सिनेटचे ते सदस्य होते.   नागपूरच्या दीक्षाभूमीवर ते राहत होते.   जेव्हा जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल विषय निघत असे तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असत.   राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा, महाराष्ट्र यांचे कार्य करतांना त्यांचा गांधीजींशी संपर्क आला.   तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात सरदार भगतसिंग यांच्याशी सुद्धा त्यांचा संपर्क आला होता.   हिंदी साहित्य संमेलन प्रयाग व पुरुषोत्तमदास टंडन यांच्याशी सुद्धा त्यांचा संपर्क होता.   दिल्लीतील बौद्ध बांधवांची अशी इच्छा होती की, भदंतजींनी मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीमध्ये राहावे.   परंतु भदंत आनंद कौसल्यायन नागपूर दीक्षाभूमीवरच राहिले.

   भदंतजींनी  'यदी बाबा न होते'  हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे.   भदंतजींनी बुद्धधम्माचा खूप प्रचार केला.   भदंतजींनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.   संक्षिप्त बुद्धचर्या, भगवद् गीता की बुद्धिवादी समिक्षा, दर्शनवेदसे मार्क्स तक, भगवद् गीता व धम्मपद, क्रांती के अग्रदूत बुद्ध, तथागत का शाश्वत संदेश, बुद्ध और उनके अनुचर, श्रीलंका, वर्णव्यवस्था या मरणव्यवस्था, बुद्ध धम्म और मार्क्सवाद, राहुल सांकृत्यायन, बौद्ध जीवनपद्धती, मनुस्मृती जलायी गयी क्यों? यांसारखे अनेक ग्रंथ लिहिले.

      प्रसिद्ध हिंदी चित्रपट 'अंगुलीमाल' या चित्रपटातील प्रसिद्ध गीत

घबराये जब मन अनमोल,

ह्रदय हो उठे डावा डौल।

ये माशल तू मुख से बोल,

बुद्धम सरणंग गच्छामी।।

हे गीत पौराणिक सिनेमातील गीतकार पं. भरत व्यास यांना लिहिण्यास सांगण्यात आले होते. परंतु बुद्धधम्माचे पंडित असलेले भदंत आनंद कौसल्यायन यांनी ते लिहिले आहे.   तसेच प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचे वडील हरीवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी साहित्यिक होते.   भदंत आनंद कौसल्यायन यांच्याशी हरीवंशराय बच्चन यांचे खूप चांगले संबंध होते.   हरीवंशराय बच्चन यांना मुलगा झाला त्यावेळेस भदंत आनंद कौसल्यायन त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेले होते.   त्यांनी भंतेजींना विचारले की, त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवावे? तेव्हा भंतेजींनी 'अमिताभ' हे नाव ठेवण्यास सांगितले होते.  कारण तथागत बुद्धाचे एक नाव 'अमिताभ' असे होते.


निर्वाण :- मे, १९८८ मध्ये भंतेजी नेहमीप्रमाणे सार्वजनिक कार्यात व्यस्त होते.   हिंदी साहित्य संमेलनासाठी ते अलाहाबादला गेले.   तेथून ते बुद्धगया आणि सारनाथला गेले. त्यानंतर ते आजारी पडले. नागपूरच्या हाँस्पिटलमध्ये २२ जून, १९८८ ला त्यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या जीवनात लहान मुलांच्या शिक्षणासाठी खूप कार्य केले. त्यांच्याबद्दल बोलतांना भंते सुरई ससाई म्हणाले की, भदंत आनंद कौसल्यायन बुद्धधम्माचा एक मजबूत खांब होते.   ज्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत धम्माचा खूप प्रचार प्रसार केला. त्यांच्या कार्याबद्दल त्यागाबद्दल अभिवादन!


No comments:

Post a Comment

Pages