नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण पूर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 1 January 2021

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण पूर्ण



नांदेड,  दि. 1 :- ग्रामपंचायत निवडणूका या संवेदनशील असतात. त्यामूळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रशिक्षण अत्यंत जबाबदारीने घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 रोजी पहिले प्रशिक्षण शंकरराव चव्हाण सभागृहात दोन सत्रात आज संपन्न  झाले आहे. यावेळी प्रत्येकांनी निवडणूकीचे कार्य जबाबदारीने पुर्ण करावे. निवडणुकीच्या  कामात टाळाटाळ, निष्काळजीपणा केल्यास त्यांच्याविरुध्द निवडणूक कायदयाने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निर्देश तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिले आहेत. 

राज्यात नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतच्या निवडणूका आहेत. नांदेड तालुक्यात एकूण 73 पैकी 65  ग्रामपंचायतच्या  निवडणूका होवू घातल्या आहेत. त्यासाठी 253  मतदान केंद्रे उभारली आहेत. मतदान केंद्रावर 800 पेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदान केंद्राचे रुपांतर दोन मतदान केंद्रात केले आहे. नांदेड तालुक्यात कमाल मतदार 860 एका केंद्रावर असून मतदान घेणे सोपे व्हावे म्हणून सर्व व्यवस्था चोखपणे तयार करण्यात आली  आहे. किमान मतदार असलेले केंद्र 200 ते 300 मतदाराचे आहे. यासाठी वाहन, पोलीस व्यवस्था, रुट गाईड, यासर्व व्यवस्था अत्यंत बारकाईने तयार करण्यात आल्या  आहेत. त्यामुळे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. हे मतदान मतदान यंत्राचा वापर करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण हे परिपूर्ण घेवून मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पुर्ण करावी असे आवाहन तहसीलदार किरण अंबेकर यांनी पहिल्या प्रशिक्षणात केले आहे. याशिवाय प्रत्येक मतदान अधिकाऱ्यांनी आपले काम कर्तव्य दक्षतेने पुर्ण करावे. 

प्रशिक्षणाची सुरुवात सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून वसुंधरा दिनाची प्रतिज्ञा घेवून करण्यात आली. ही  प्रतिज्ञा तहसीलदार किरण अंबेकर यांनी सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देवून वसुंधरा दिनाचे महत्व ही विशद केले. यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणाला पीपीटीच्या माध्यमातुन सुरुवात करण्यात आली. याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण नायब तहसीलदार (निवडणूक) सारंग चव्हाण यांनी केले. सादरीकरण करतांना श्री. चव्हाण  यांनी कशाप्रकारे साहित्य  स्वीकृतीपासून मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान घ्यावे. याचे विविध स्लाईडच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. मतदान घेताना कोणती खबरदारी घ्यावी, विविध संवेधानिक, असंवेधानीक लिफाफे, विविध अर्ज कसे  भरावे याचे  प्रशिक्षण देवून शंकांचे समाधान केले. 

शेवटी मतदान  अधिकारी व कर्मचारी यांना प्रश्न  विचारण्यात संधी देवून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. या प्रशिक्षणास दोन  सत्रात एकूण 1 हजार 600 कर्मचाऱ्यांना आदेश देवून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याची प्रशिक्षण शासकिय ग्रंथालयात दहा प्रशिक्षण केंद्रातुन देण्यात  आले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार निवडणूक सौ. उर्मीला कुलकर्णी यांनी तर आभार नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी मानले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अव्वल कारकुन कुणाल जगताप, दत्तात्रय पोकले,राजकुमार कोटूरवार, राजेश कुलकर्णी, हनमंत जाधव महसुल सहायक, व्यंकटी मुंडे, शमशोद्दीन, युसूफ, मुजीब व पवार यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Pages