नवी दिल्‍ली, 14 जानेवारी

प्रधानमंत्री  कौशल विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा (पीएमकेव्हीवाय 3.0) प्रारंभ उद्या देशातील सर्व राज्यांमधील 600 जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे.  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (एमएसडीई) नेतृत्वाखालील या टप्प्यात नव्या काळातील आणि कोविडशी संबंधित कौशल्यांवर भर देण्यात येईल.

कौशल्य भारत अभियान  पीएमकेव्हीवाय 3.0 मध्ये 2020-2021 च्या योजनेच्या कालावधीत 948.90 कोटी रुपये खर्चासह आठ लाख उमेदवारांच्या प्रशिक्षणाची कल्पना मांडली आहे. कौशल्य भारत अंतर्गत 729 प्रधानमंत्री कौशल केंद्रे (पीएमकेके), नोंदणीकृत बिगर-पीएमकेके प्रशिक्षण केंद्र आणि 200 हून अधिक आयटीआय कुशल व्यावसायिकांची मजबूत फळी तयार करण्यासाठी पीएमकेव्हीवाय 3.0.चा प्रारंभ करतील. पीएमकेव्हीवाय 1.0 आणि पीएमकेव्हीवाय 2.0 पासून मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर मंत्रालयाने सध्याच्या धोरणाशी सुसंगत आणि कोविड 19 महामारीमुळे प्रभावित कौशल्य परिसंस्थेला ऊर्जा देण्यासाठी  या योजनेच्या नवीन आवृत्तीत सुधारणा केली आहे. 

भारताला जगाची "कौशल्य राजधानी" बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी सुरू केलेल्या “कौशल्य भारत अभियानाला” पीएमकेव्हीवाय ही महत्वाकांक्षी  योजना सुरू केल्यामुळे मोठी गती मिळाली.

राज्यमंत्री  राज कुमार सिंह यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे योजनेच्या  तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करतील.  या कार्यक्रमाला कौशल्य राज्यमंत्री आणि खासदार देखील संबोधित करतील.