नामांतर लढ्यातील शहिदांना प्रजासत्ताक पक्षाच्या वतीने 14 जानेवारी रोजी अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 January 2021

नामांतर लढ्यातील शहिदांना प्रजासत्ताक पक्षाच्या वतीने 14 जानेवारी रोजी अभिवादन

 

नांदेड दि. 13 | औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे,  या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या अभूतपूर्व लढ्यात शहीद झालेल्या भीमविरांना प्रजासत्ताक पक्षाच्या वतीने आज दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात येणार आहे.

औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी अभूतपूर्व असे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी आणि बहुजन समाजाने सक्रिय सहभाग घेतला. 1978 ते 1994 पर्यंत दीर्घकाळ अभूतपूर्व आंदोलन करण्यात आले. 1978 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेने एकमताने नामांतर ठराव पारीत केल्यानंतर हिंसक दंगल नामांतर विरोधकांनी माजवली होती. त्या जातीय हिंसक दंगलीत टेंभुर्णी येथील पोचीराम कांबळे आणि सुगाव येथील जनार्दन मवाडे यांची क्रूर हत्या केली. घरेदारे जाळून राखरांगोळी केली. 1993 मध्ये नांदेड येथील युवक पॅंथर गौतम वाघमारे यांनी शासनाला लेखी इशारा देऊन आपले जीवन संपविले. 16 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर तत्कालीन शासनाने 14 जानेवारी 1994 रोजी नामांतर ठरावाची अंमलबजावणी केली.

आज या लढ्याचा 26 वा वर्षपूर्ती कार्यक्रम प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने युगपुरूष ज्योतिराव फुले यांच्या पुतळा येथे आयोजित केला आहे. त्यानिमित्त पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि युगपुरूष ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. फुले पुतळ्याशेजारील मंडपामध्ये शहीद पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे आणि या लढ्यात महाराष्ट्रातून ज्यांनी स्वत:चे आयुष्य अर्पण केले. अशा सर्व शहिदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रजासत्ताक पक्षाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यासह प्रा. देवीदास मनोहरे, पी.एस. गवळे, ऍड. एम.जी. बादलगावकर, जे.डी. कवडे, डी.पी. गायकवाड आदींची उपस्थिती राहणार आहे.

शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून शहिदांना मानवंदना द्यावी, असे आवाहन  रवी गायकवाड, शिलरत्न चावरे, किशोर अटकोरे, भगवान गायकवाड, प्रकाश लांडगे, विजय गोडबोले, व्यंकट इंगळे, धम्मानंद गजभारे, विकास इंगोले, विजय कदम, विजय थोरात, कपिल वावळे आदिंनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages