यवतमाळ जिल्ह्यात कोव्हीड-19 लसीचे आगमन 16 जानेवारी रोजी प्रत्यक्ष लसीकरणाची सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 January 2021

यवतमाळ जिल्ह्यात कोव्हीड-19 लसीचे आगमन 16 जानेवारी रोजी प्रत्यक्ष लसीकरणाची सुरुवात

यवतमाळ, दि. 14 : नागरिकांना बहुप्रतिक्षेत असलेली कोव्हीड – 19 ची लस मकरसंक्रांतीच्या पार्श्वभुमीवर तिळगुळाच्या रुपाने जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लस घेऊन आलेल्या व्हॅनचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

आज (दि. 14) आलेल्या व्हॅनमध्ये पहिल्या टप्प्यासाठी लसीचे एकूण 18500 डोसेस प्राप्त झाले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. संपूर्ण प्रशासन आणि डॉक्टरांना या लसीची प्रतिक्षा होती. 16 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल. यात दारव्हा, पांढरकवडा आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय आणि उमरखेड व वणी येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी 100 लाभार्थी याप्रमाणे 500 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. सर्व पाचही केंद्रांवर लसींचा पुरवठा आजच करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष ढोले, डॉ. पी.एस.चव्हाण, डॉ. प्रशांत पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची लस   प्राप्त झाली असून एकूण 18500 डोसेस व्हॅनद्वारे आले आहे. यात 70 डोसेस केंद्रीय   आरोग्य कर्मचा-यांकरीता तर 18430 डोसेस राज्य शासकीय व खाजगी आरोग्य   कर्मचा-यांकरीता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 18188 लाभार्थ्यांची को-वीन   सॉफ्टवेअरमध्ये नोंद करण्यात आली असून यात शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचा-यांची   संख्या 15366, केंद्रीय आरोग्य कर्मचा-यांची संख्या 65 आणि फ्रंटलाईन वर्करची   संख्या 2757 आहे. जिल्ह्यात एकूण 552 लस टोचकांची सविस्तर माहिती को-वीन   सॉफ्टवेअर मध्ये नोंदविण्यात आली आहे. तसेच 188 कर्मचारी हे कोव्हीड – 19 लसीकरण   कार्यक्रमात सुपरवायझर ची भुमिका पार पाडणार असून त्यांची नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये   करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Pages