किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 22 February 2021

किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

किनवट,दि. 19 (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा 391 वा जन्मोत्सव किनवट येथे स्थानिक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजता मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. आ.भीमराव केराम यांनी मध्यवर्ती चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ध्वजारोहण केल्यानंतर, सर्वांनी आदरपूर्वक अभिवादन केले. यावेळी शिवप्रेमींच्या उत्साहाला आनंदाचे उधान आले होते.


         ध्वजारोहणापूर्वी शिवप्रेमी तरुणांनी भगव्या ध्वजांसह गोकुंदा व किनवट शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपतींचा जयघोष करीत ‘भव्य बाईक रॅली’ काढली. कार्यकर्त्यांनी सर्वत्र ध्वज,पताकांनी सुशोभित केल्यामुळे परिसर भगवे झाल्याचे भासत होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जयंती उत्सवावर निर्बंध घातल्याने व कोरोना नियमांचे पालन करीत साध्यापद्धतीने साजरा करण्याचे निर्देश दिल्याने, दरवर्षीच्या तुलनेत थोड्या मर्यादा आल्या होत्या. मात्र, शिवप्रेमींचा उत्साहात फरक पडला नाही. या जयंतीनिमित्त जुन्या नगर परिषदेच्या प्रांगणात बालकांसाठी छापील चित्रामध्ये रंगभरण स्पर्धा, मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, किशोर वयोगटातील मुलांसाठी ‘छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र’ व ‘छत्रपती शिवरायांचा आदर्श’ या विषयावर भाषणस्पर्धा घेण्यात आली. तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांसाठी पालिकेचे नगरसेवक व इतर शिवप्रेमींकडून 2001,1501 व 1001 रुपयांची बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली होती. त्यामुळे सर्व स्पर्धा अत्यंत उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. शिवजयंतीनिमित्त डॉ.प्रसाद सुर्वे यांनी आयोजिलेल्या रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला. अभय महाजन या नगरसेवकांनी शहरातील ‘संथागार’ या वृद्धाश्रमातील निवासींना कपडे वाटप केले.


         जन्मोत्सव साजरा करण्याच्या प्रसंगी आ.भीमराव केराम यांच्यासह नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सुधाकर भोयर, श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल तिरमनवार, बालाजी पावडे, अजय कदम, आशिष कर्‍हाळे, उमाकांत कर्‍हाळे, मारोती भरकड, राजू सुरोशे, दगडू भरकड, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, प्रा.द्वारकादास वायाळ, अनिल पाटील कर्‍हाळे, वैजनाथ करपुडे पाटील, नगरसेवक जहीरोद्दीनखान, अभय महाजन, कैलास भगत, प्रविण म्याकलवार,  व्यंकट भंडारवार, बालाजी मुरकुटे, राम बुळे पाटील,गिरीश नेम्मानीवार, किरण किनवटकर, साहेबराव पवार, मधुकर अन्नेलवार,बापूसाहेब तुप्पेकर, शिवाजी बरबडकर, मंगेश भटकर, शैलेश गटलेवार, चेतन कर्‍हाळे, विनायक गव्हाणे यांचेसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. हा शिवजन्मोत्सव व विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रसाद सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष राजू शिंदे, संतोष डोणगे, ज्ञानेश्वर कदम, प्रा.जयवंत चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन कदम, शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष गोविंद आरसोड यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

Pages