किनवट पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यंकटराव नेम्मानीवार विजयी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 22 February 2021

किनवट पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यंकटराव नेम्मानीवार विजयीकिनवट, दि.22 (प्रतिनिधी) :  किनवट नगर परिषदेचे पूर्वीचे उपनगराध्यक्ष अजय चाडावार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.22) निवडणूक प्रक्रिया पार पडून, भाजपाचे व्यंकटराव गोपालराव नेम्मानीवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या  राहत तबस्सुम शफियोद्दीन काजी यांच्या विरोधात 11 विरुद्ध 8  मतांनी विजयी झाले.   पीठासीन तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा.जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार तर सहा.निवडणूक अधिकारी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी काम पाहिले.


     आज सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1  या कालावधीत भाजपाचे व्यंकटराव नेम्मानीवार,रा.काँ.चे गटनेते जहीरोद्दीन खान व राकाँ.च्याच  राहत तबस्सुम शफियोद्दीन काजी या तिघांनी आपापले नामनिर्देशनपत्र सादर केले  होते. छाननी दरम्यान जहीरोद्दीनखान यांनी आपला अर्ज परत घेतला. पालिकेत  सर्व नागरिकांतून निवडल्या  गेलेल्या भाजपाच्या नगराध्यक्षसह इतर 9 भाजपाचे नगरसेवक व एक भाजपास समर्थन दिलेली एक अपक्ष नगरसेविका मिळून एकूण 11 सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 व काँग्रेसचे 2 सदस्य असे एकूण 19 सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. मतदानास उपस्थित सर्व सदस्यांनी निवडणुकीदरम्यान हात उंचावून  मतदान केले. त्यात अपेक्षेप्रमाणे राकाँ.च्या तबस्सुम काजी यांना आठ तर व्यंकट नेम्मानीवार यांना नगराध्यक्षाचे मत मिळून अकरा मते पडलीत. पीठासीन अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यंकटराव नेम्मानीवार यांना  उपनगराध्यक्षपदांसाठी विजयी घोषित केले. सदर निवडणुकीत रमेश नेम्मानीवार, प्रकाश गुंटापेल्लीवार, गणेशसिंह ठाकूर या पालिका कर्मचार्‍यांनी मदत केली.


  “ निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आ.भीमराव केराम यांनी त्याच सभागृहात पत्रकारांसह उपस्थितांशी संवाद साधतांना, सदर निवडणूक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. पुढील काळात सर्वच नगरसेवकांनी किनवटचा चेहरामोहरा बदलून त्यास विकासाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी एकजुटीने काम करीत नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.”

No comments:

Post a Comment

Pages