शहर व परिसरातील मटका व अवैद्य दारू विक्री त्वरित बंद करा वंचित बहुजन आघाडीची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 14 March 2021

शहर व परिसरातील मटका व अवैद्य दारू विक्री त्वरित बंद करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

किनवट, ता १४ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस ठाणे अंतर्गत घोटी फाटा(ता. किनवट), शहरातील भाजी मंडई क्षेत्र आणि प्रसिद्ध व्यापारपेठ बोधडी (बुद्रुक, ता. किनवट) या क्षेत्रात खुलेआम मटका बुकिंग सेंटर व त्या ठिकाणी होत असलेली देशी दारूची अवैध विक्री ही त्वरित थांबून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची कारवाई करण्यासाठीचे निवेदन तालुका अध्यक्ष किसन लखु राठोड यांनी नुकतेच दिले आहे .

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील तीन महिन्यापूर्वी लपून छपून मटक्याच्या चिठ्ठ्या घेतल्या जात होत्या व त्या ठिकाणी देशी दारूची विक्री होत होती. परंतु, आता तर हे मटका बुकिंग चालक खुलेआम मटका चिठ्या घेऊन त्या ठिकाणी दारू विक्री करून, जोमाने व्यवहार करून गोरगरीब नागरिक, मजूर, युवक व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना जाळ्यात  ओढून घेत आहेत. ज्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय होण्यास विलंब लागणार नाही. अशी भयावह परिस्थिती निर्माण होत आहे.

           शहरातील भाजीमंडई क्षेत्रात भाजीपाला विक्री ऐवजी ठेले टाकून त्या ठिकाणी दिवसा खुलेआम मटका घेऊन त्या ठिकाणी मटका लावणाऱ्या साठी देशी दारू ची व्यवस्था करीत असल्याने या गजबजलेल्या ठिकाणी भाजीपाला खरेदी करणार्‍या महिलांची कुचंबना होत आहे.

      तसेच नव्याने व्यापारी क्षेत्र म्हणून उदयास आलेले घोटी फाटा या ठिकाणी तर चार मटका बुकिंग सेंटर कार्यरत असून या ठिकाणी मटका लावणाऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. त्याठिकाणी शेतकरी शेतीमाल विक्री करतो .शेतकरी या मटका बुक्कीत आकडा लावून व आकड्याचा निकाल लागेपर्यंत तेथेच वास्तव्य करीत असल्याने यांची येथे लूट होत आहे. तसेच किनवट पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र बोधडी बुद्रुक येथे व्यापारी बाजारपेठ असल्याने जागोजागी पानटपरी, ज्युस सेंटर, चहा हॉटेल मध्ये जाऊन खुलेआम मटका बुकिंग चालू असून त्याच ठिकाणी ग्राहकांची देशी दारू पिण्याची व्यवस्था आहे यामुळे नागरिकात असंतोष पसरला असून शांतता भंग होऊ शकते.

         तेव्हा आपण आपले कार्यक्षेत्र किनवट पोलीस स्टेशन क्षेत्रात या व्यवसायाची वाढ त्वरित थांबविली नाही तर चोऱ्या दरोडे लूटपाट च्या घटना घडू शकतात. तेव्हा तवरेने कारवाई अपेक्षित आहे. किनवट पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र हे अतिसंवेदनशील व नक्षलवादी क्षेत्र म्हणून सुपरिचित आहे. त्याठिकाणी अवैध व्यवसाय व शांतता भंग होऊ नये म्हणून व सामाजिक तत्वावर अंकुश ठेवणे कामी उपविभागीय पोलीस आधिकारी कार्यालयाची निर्मिती झाली आहे. तेव्हा आपण या प्रकरणी लक्ष घालून होणारे हे सर्व प्रकरण थांबवावेत, अशी विनंती करण्यात येत आहे असे निवेदनात मूद करण्यात आले आहे.

      या निवेदनाच्या प्रतीलिपी प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मुख्य कार्यालय, मुंबई,उद्धव ठाकरे ,मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय ,मुंबई ३२,पोलीस उप- महानिरीक्षक , उपमहानिरीक्षक परिक्षेत्र, नांदेड ,पोलीस अधीक्षक ,पोलीस अधीक्षक, कार्यालय, नांदेड, अप्पर पोलीस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, भोकर,पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, किनवट, तालुका किनवट यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages