डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाण्यास अनुयायांना शासनाची परवानगी  - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 10 April 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाण्यास अनुयायांना शासनाची परवानगी 

नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू असलेल्या सुरू चर्चांना अखेर राज्य शासनाने पुर्णविराम देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी जनतेला परवानगी दिली आहे. त्यात कोविड नियमावली पाळत महामानवाला अभिवादन करायचे आहे. राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. राज्य शासनाच्या गृहविभागाचे कार्यासन अधिकारी दिपक खरात यांच्या स्वाक्षरीने या सुचना जारी झाल्या आहेत.

मागील एक महिन्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भाने विविध प्रकारच्या चर्चा आणि त्यावरील उपाय योजना याबद्दल मोठ्या प्रमाणात मंथन झाले होते. या मंथनावर राज्य शासनाची दृष्टी होती. त्यानुसार राज्य शासनाने दि.9 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतांना कांही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी आदल्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येत एकत्र जमतात आणि त्यांची जयंती जल्लोषात साजरी होते. रात्री 12 वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी जमत असते. पण यंदा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षीत आहे.

कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूका काढण्यात येवू नयेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त्या ठिकाणी एकाच वेळी पाच पेक्षा जास्त माणसे नसावेत. शारिरीक अंतराचे पालन, स्वच्छता याचे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मास्क आणि सॅनेटायझर याचा वापर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी. दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होतांना विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात सार्वजनिक ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम, व्याख्यान, पथनाट्य व इतर अनेक स्पर्धा आयोजित होतात. पण यंदा असा कोणताही कार्यक्रम करण्यात येवू नये. यामध्ये आरोग्य शिबिर विशेष करून रक्तदान शिबिर याला स्थानिक प्रशासनाच्या पुर्व परवानगीने आयोजित करता येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती येईपर्यंत शासनाने या सुचनांमध्ये कांही बदल केला तर तो प्रत्यक्ष जयंती दिनी अंमलात येईल.

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मागील महिन्याभरापासून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भाने होत असलेल्या मंथनावर पुर्णविराम लागला आहे. कांही राजकीय मंडळींनी आम्ही जयंती मिरवणूकीतच साजरी करणार असे सांगून वाहवाह मिळवली होती पण शासनाच्या या निर्णयाने आता सर्वच चर्चांना पुर्ण विराम लागेल. डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचे अनुयायी सुध्दा शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतील आणि त्यातून देशाला एक नवीन संदेश देतील अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Pages