‘ई-पॉस’ मशीनवर आता ग्राहकांऐवजी दुकानदारांनाच अंगठा लावण्याची मुभा ; कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यसरकारने घेतला निर्णय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 May 2021

‘ई-पॉस’ मशीनवर आता ग्राहकांऐवजी दुकानदारांनाच अंगठा लावण्याची मुभा ; कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यसरकारने घेतला निर्णय


                                                             

किनवट, दि.07, :   शासनाने कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील रेशनकार्डधारकांना महिन्याभराचे रेशन मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या धान्याचे वितरण बायोमॅट्रिक्स पद्धतीने केल्यास ‘ई-पॉस’ मशीनवर ग्राहकांचा अंगठा घेतल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे  आता एक महिन्याकरिता ‘ई-पॉस’ मशीनवर ग्राहकांऐवजी दुकानदाराचाच अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याची मुभा देण्यात आली आहे.


      किनवट तालुक्यात एकूण 201 स्वस्त धान्य वितरण करणारी दुकाने असून, रेशनकार्डधारक कुटुंबांची संख्या 52 हजार 248 आहे. त्यात अंत्योदय मध्ये मोडणारी 15 हजार 300 कुटुंबे, प्राधान्य गटात (बीपीएल) येणारी 27 हजार 325 कुटुंबे, शेतकरी कुटुंब (एपीएल फार्मर) 6 हजार 603 असून, राशनचे धान्य न मिळणार्‍या गटातील एपीएल व एपीएच या गटामध्ये 2 हजार 428 कुटुंब तर एपीएल शूभ्र 592 कुटुंब आहेत.  कोरोना लॉकडाऊनमुळे दारिद्—य रेषेखालील कुटुंबांचा रोजगार गेल्याने, त्यांना दोन वेळची भाकरी मिळावी या करिता राज्य शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाप्रमाणे आता केंद्र शासनानेही मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  जिल्ह्यातील धान्याची मागणी नोंदवून आवश्यक तो धान्यसाठा वितरण व्यवस्थेद्वारे तालुका स्तरावर पोहोचविण्यात आला आहे. या धान्याचे वितरण ‘ई-पॉस’ मशीनवर ग्राहकांचा अंगठा घेऊन करण्याच्या सूचना होत्या. परंतु, कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागल्यामुळे याकरिता विरोध होऊ लागल्याने, शासनाने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन‘ई-पॉस’ मशीनवर ग्राहकांऐवजी दुकानदाराचाच अंगठा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


      या सोबतच दुसरेही एक कारण असे की, धान्य वाटप करतांना सॅनिटायझरची व्यवस्था, मास्कचा वापर आणि सोशन डिस्टसिंग पाळणे बंधनकारक आहे. मात्र एका दुकानदाराकडे शेकडो ग्राहक आहेत. त्यासर्वांसाठी सॅनिटायझर ठेवणे दुकानदाराला परवडणारे नाही. शासन रेशन दुकानदाराला सॅनिटायझर किंवा मास्क देत नाही. शिवाय अनेक दुकानदारांचे लसीकरण देखील झालेले नाही. तसेच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेशनचे धान्य ‘ई-पॉस’ मशीनद्वारे देतांना दुकानदाराचा अंगठा चालेल अशी परवानगी दिली जरी असली तरीपण दुकानदार ग्राहकांच्या संपर्कात येत असल्यामुळे दुकानदारांना शासनाकडून विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी दुकानदार करीत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, विमा सुरक्षाकवच, दुकानदारांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, बायोमॅट्रिकची सक्ती नको, कमीशन वाढवून मिळावे  अशा विविध मागण्यांसाठी एक मे पासून राशनदुकानदार संपावर गेल्यामुळे, केंद्रांचे मोफत धान्य तालुकास्तरावर पोहोचूनसुद्धा लाभार्थ्यांमध्ये अजून वाटप झालेले नाही.


“कोरोनाचा संसंर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने आता ‘ई-पॉस’ मशीनवर ग्राहकाऐवजी दुकानदारांचाच अंगठा लावून धान्य वितरण करण्यास परवानगी दिली आहे. तसेच धान्य वाटप करतांना सॅनिटायझरची व्यवस्था, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टसिंग पाळण्याची गरज आहे.”


- लोखंडे एम.बी.  नायब तहसीलदार, पुरवठा, किनवट.


 


संपावर गेलेल्या रेशन दुकानदारांच्या मागण्या“राज्यात आतापर्यंत 123 रेशन दुकानदारांचे कोरोनासंसर्गामुळे निधन झाले आहे. त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत द्यावी, स्वस्त धान्य दुकानदारांना 50 लाखांचे विमा सुरक्षाकवच द्यावे, लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकची सक्ती करू नये, स्वस्त धान्य दुकानदारांचे आधार प्रमाणित करून धान्य वाटपाची मुभा द्यावी, वाधवा समितीच्या अहवालाप्रमाणे मानधन द्यावे, दुकानदारांना महसूल चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, अशा मागण्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केल्या आहेत.”

No comments:

Post a Comment

Pages