‘ मागेल त्याला शेततळे ’ योजनेला स्थगिती राज्य शासनाकडून योजनेच्या अर्थसंकल्पीय निधीला चाप : शेतकरी वर्गात नाराजी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 22 May 2021

‘ मागेल त्याला शेततळे ’ योजनेला स्थगिती राज्य शासनाकडून योजनेच्या अर्थसंकल्पीय निधीला चाप : शेतकरी वर्गात नाराजी

किनवट, दि.22,  : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या अर्थसंकल्पीय निधीला कात्री लावली आहे. या योजनांमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजनासुद्धा असून, सदर योजनेच्या नवीन कामांना मंजूरी न देण्याचे आदेश कृषी विभागांना दिल्यामुळे,  सदर योजनेबाबत नवीन आदेश प्राप्त होईपर्यंत तूर्तास शेततळे योजना थांबलेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे.


       युती शासनाच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला शेतकर्‍यांनी भरभरून मोठा प्रतिसाद दिला होता. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने, राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे योजना’ सुरू करण्यामागचा शासनाचा उद्देश होता. शेतकर्‍यासांठी दरवर्षी लक्षांक प्राप्त झाल्यानंतर अर्ज प्राप्त होताच सोडत काढण्यात येत होती आणि त्यातून निवडलेल्या शेतकर्‍यांना शेततळ्याचा लाभ मिळत होता.


       सध्याच्या कोरोना विषाणूने धुमाकूळ माजविल्यामुळे सततचे लॉकडाऊन, हजारो नागरिकांना संसर्ग, अनेकांचा मृत्यू या भयावह परिस्थितीतून सावरण्यासाठी नियोजन करण्याची राज्यसरकारची अक्षरश: कसरत चालली आहे. यातून शासनाची तिजोरी बरीच रिकामी झाल्यामुळे, सरकार विविध योजनांच्या निधीला चाप लावीत असल्याचे दिसते. शेततळ्याबाबत राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाच्या सचिवांनी सूचना दिल्यानंतर कृषी आयुक्तालय पुणे यांनी कृषी विभागाला आदेश निर्गमित केल्याचे समजते.


   कमी प्रमाणात निधी मिळणार असल्यामुळे कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे योजनेत कार्यारंभ आदेश देऊ नये, नवीन कामे सुरू करू नये, तसेच नवीन कामासाठी आखणी करू नये, असे जिल्ह्यातील कृषी विभागांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा नवीन शेततळी होण्याची शक्यता धूसर आहे. यापूर्वी किनवट तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी शेततळ्यासाठी प्रस्ताव पाठवून लाभ घेतलेला आहे. यावर्षी सदर योजनेला स्थगिती मिळाल्यामुळे शेततळ्यासाठी इच्छुक शेतकरी अडचणीत आलेले आहेत.


“मागेल त्याला शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जायचे. सध्या ती साईटच बंद असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी सोयच उरली नाही. शासनाकडून जेव्हा साईट ओपन होईल. तेव्हाच शेततळ्यासाठी अर्ज स्वीकारले जातील.”


बी.बी.मुंडे, तालुका कृषी अधिकारी, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages