किनवट तालुक्यात तीन वर्षात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 May 2021

किनवट तालुक्यात तीन वर्षात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

किनवट , दि.२७ : शेतातील सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, वाढती महागाई, कर्जबाजारीपणा व  कुटुंबाला पोसतांना आलेली हतबलता यामुळे  किनवट तालुक्यात गेल्या ३ वर्षात तब्बल ३६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. यातील ३३ पात्र व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळाली असून, दोन शेतकरी अपात्र तर तीन महिन्यापूर्वी आत्महत्या केलेल्या एका मृत शेतकर्‍याचे प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित आहे.


     कृषीप्रधान देशामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा एकूण आकडा मन सुन्न करणारा आहे. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत असून, शेतकर्‍यांच्या अपेक्षा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या २० वर्षात राज्यात ३४ हजार पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबप्रमुखांनी आत्महत्या केल्याची शासनदफ्तरी नोंद आहे. गेल्या काही वर्षापासून शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांशी सामना करीत शेती पिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  बहुतांश शेतकरी दरवर्षी बँकांचे कर्ज काढून वा खाजगी सावकारासमोर हात पसरून शेतीचा हंगाम पूर्ण करीत आहेत. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, त्यामुळे होणारी सततची नापिकी, दारिद्—य तर पाचवीला पुजलेले. शेतात केलेल्या लागवडीचा खर्च व हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर यात प्रचंड तफावत. परिणामी वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा आणि त्यातून आलेले नैराश्य अन् या नैराश्यापोटीच बहुतेक शेतकर्‍यांनी मृत्यूला जवळ केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व कुटुंबच रस्त्यावर आले आहे. त्यांच्या लेकराबाळांचे शिक्षण थांबलेले असून, विवाहयोग्य मुलींचे लग्न लांबल्या गेले आहे.


      केंद्र व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची सामाजिक,आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी विविध कल्याणकारी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मागे केंद्र व राज्य शासनाने पॅकेज जाहीर केले होते, विशेषत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तरी आत्महत्या  थांबतील असे वाटत होते मात्र  शेतकर्‍यांचे आत्महत्यांचे सत्र थांबतांना दिसत नाही.


       गत तीन वर्षांमध्ये अर्थात जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये किनवट तालुक्यात एकूण १३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून, त्यातील ११ शेतकरी शासकीय अनुदानास पात्र ठरले असून, दोन व्यक्ती अपात्र ठरल्या आहेत. २०१९ मध्ये  ९ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपविले असून, ते सर्वजण सरकारी मदतीसाठी पात्र ठरून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिल्या गेला आहे. सन् २०२० मध्ये परत ९ शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले असून, ते सर्वही सरकारी निकषास पात्र ठरल्यामुळे त्यांच्याही कुटुंबियांना अनुदान देण्यात आले आहे. जानेवारी २०२१ ते आतापर्यंत एकूण पाच शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यातील पाथरी गावातील एक महिला शेतकरी आहे. यापैकी चौघेजण अनुदानासाठी पात्र ठरले असून, फेब्रुवारीत आत्महत्या केलेल्या आंदबोरी(चि)येथील शेतकर्‍याचे प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित आहे.


    आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी सर्वात जास्त मृत्यू विषारी द्रव पिऊन, काही गळफास घेऊन तर कुणी विहीरीत उडी मारून मृत्यू स्विकारला आहे. त्यामुळे  आपद्ग्रस्त कुटुंबांतील जाणती लेकरे न जाणो आपलाही बाप असले पाऊल उचलेल म्हणून, विषारी औषध वा दोरखंड लपवून ठेवतात असे एका ग्रामीण शेतकर्‍यांकडून कळाले.


    निसर्गाची अवकृपा व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे   शेती सध्या बिनभरवशाचा व्यवसाय ठरत आहे.

No comments:

Post a Comment

Pages