दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट - डॉ हर्षदीप कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 26 May 2021

दान पारमिता, कोव्हीड परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट - डॉ हर्षदीप कांबळे

आज बऱ्याच दिवसानंतर थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून काही दिवसांपासूनचे मनातले विचार शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. खूप सार्‍या जणांनी माझ्या ऑफिशियल वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या त्याबद्दलही धन्यवाद द्यायचे होते. तसे मी वाढदिवस साजरा करीतच नाही. उलट या परवाच्या १८ तारखेला मी ऑफिसमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत काम करून तो दिवस कसा जास्तीत जास्त काम करता येईल आणि १९तारखेला महाराष्ट्रासाठी बनवलेली ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीचे नवीन विशेष प्रोत्साहने मंजूर करून घेता येतील याचा विचार करीत होतो.दुसऱ्या दिवशी ते कॅबिनेटमध्ये मंजूर झाले. शासन निर्णयसुद्धा निघाला त्यामुळे आज थोडा मोकळा वेळ म्हणून हे लिखाण. वाढदिवसानिमित्तही खूप मेसेज होते. तसे  शुभेच्छांचा मी याआधी रिप्लाय करीत नव्हतो. कारण जन्माला येऊन मी खूप मोठा तीर मारला असे मला वाटत नाही. पण, मी रिप्लाय करत नाही म्हणून बऱ्याच निगेटिव्ह रिअॅक्शन जसे खूप मोठा साहेब समजतो, 'एक सेकंद तर लागतो रिप्लायसाठी'  वगैरे.. पण लोकांच्या या प्रेम व्यक्त करणाऱ्या भावना आहेत. हे समजून मी सर्वांचे धन्यवाद देतो. 


पण मी आज लिहितोय इथे मात्र एका वेगळ्या कारणांसाठी...

माझ्याकडे शासनाने वेगवेगळ्या अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून मी खूप व्यस्त आहे. त्यामध्ये काही जबाबदाऱ्या कोरोनाशी संबंधित आहेत. फार विचित्र आणि दारूण परिस्थिती कोरोनामुळे आपल्या आजूबाजूला निर्माण झाली आहे. मागील एक ते दोन महिन्यात बऱ्याचशा ओळखीच्या लोकांचे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे आणि त्यातल्या त्यात काही चळवळीतील तरुणांचे सुद्धा मृत्यू झाल्याचे कळले. अशा या भीषण परिस्थितीत रोज खूप जणांचे मदत करा म्हणून फोन यायचे. पैशापासून औषधे, इंजेक्शन, हॉस्पिटलचे बिल...ते ऐकून मन विषण्ण होत असे. शक्य तेवढी मदत करायचा प्रयत्न करीत होतो. पण, काही ठिकाणी औषधे उपलब्ध नसल्यामुळे काहीच करता येत नव्हते. अशाच वेळेस आणखी काय करता येईल याचा विचार मनामध्ये येत होता. याच वेळेस काही चांगल्या बातम्यासुद्धा ऐकायला वाचायला मिळत होत्या. दिल्लीमध्ये शिख समुदायाच्या लोकांनी कोरोनाग्रस्त लोकांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन, जेवणासाठी लंगर सुरू केले. मुस्लिम लोकांनीसुद्धा बऱ्याच ठिकाणी हेल्पलाइन सुरू करून मदत कार्य सुरू केले होते. काही इतर धर्मीय संघटना, धर्मविरहित एनजीओ पण या कामी पुढे आलेल्या वाचनात आल्या. मी त्यामध्ये महाराष्ट्रातील बौद्ध संघटना शोधत होतो. आपल्या इथे बाबासाहेबांच्या संघर्षाचे फळ म्हणून शिक्षित झालेले आणि स्वतःला बौद्ध म्हणणारे खूप सारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर्स,प्राध्यापक इ.  महाराष्ट्रात आहेत. काहीजण मोठ्या पदावर आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकही कर्मचारी अधिकारी यांचा पगार या कालावधीत सरकारने दिला नाही असे झाले नाही. मग असे असताना मला मात्र प्रश्न होता की या सर्व मदत कार्यामध्ये मी एक बुद्धिष्ट म्हणून कुठे आहे? बाकीचे कुठे आहेत? अशातच थायलंडमधील तैवानमधील काही भिक्कू व बौद्ध उपासक ज्यामध्ये माझी पत्नी रोजाना व्हॅनिच कांबळे पुढे येऊन आम्हाला भारताला मदत करायची आहे असे सांगून काम सुरू करायला सुरु करतात. मी कोविड संदर्भात महाराष्ट्राचा नोडल अधिकारी असल्यामुळे मला संपर्क करून माहिती घेतात. पण महाराष्ट्रातील बुद्धिष्ट व्यक्तीचा आम्हाला मदत करायची आहे जरा मार्गदर्शन करा, असा फक्त पुण्याचा प्रवीण सोडला तर एकाचाही मला फोन आला नाही.                    धम्मामध्ये दहा पारमिता सांगितल्या आहेत. दान पारमिता ही सर्वात आधी सांगितलेली आहे. दानाचे महत्व स्वतः तथागत बुद्धांनी त्यांच्या उपदेशात सांगितले आहे. धम्मामध्ये करूणा हा केंद्रबिंदू आहे. परंतु, मागच्या दोन ते तीन महिन्यात ही दान पारमिता ही करूणा फार कमी आढळून आलेली मी पाहिली. मागील वर्षी काही लोकांनी फुड पॅकेट्सची मदत केली.त्या वेळेस पण बहुतेक लोक घरी बसून स्वतःचाच सांभाळ करीत होते. या वेळेस परिस्थिती त्यापेक्षा गंभीर असताना मात्र आपण मदत कार्यात फारच कमी पडलो आहोत हे जाणवत होते.


औरंगाबादला डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या लाटेमध्ये त्यांच्या दवाखान्यात जे मृत्यू झाले त्यापैकी 30 टक्के बुद्धिष्ट समाजातील होते असे सांगितले.  मी त्याकरिता काही जणांशी बोललो की आपण एकत्रित येऊन काय करायला पाहिजे. समाजाला आपली गरज आहे. तुमचे जेवढे पैसे जमा होतील तेवढेच मी मित्रांच्या मदतीने डोनेशन म्हणून द्यायला तयार आहे. खूपच कमी प्रतिसाद होता. जेव्हा मी आपल्या तरुण मुलांशी बोललो तेव्हा ते कुठेही काम करायला तयार होते. त्यांचे एवढेच म्हणणे होते की, आमच्याकडे रिसोर्सेस नाहीत ते आम्हाला उपलब्ध करून द्यावे.  हा सगळा आलेला अनुभव या ठिकाणी लिहीत आहे याचे मुख्य कारण म्हणजे अशा प्रकारच्या संकटकाळात समाजातील स्वतः बुद्धिष्ट समजणाऱ्या, इतरांपेक्षा ज्यांचे जीवनमान चांगल्या स्थितीत आहे अशांच्या आचरणामध्ये करूणेची, दान पारमितेची जी कमतरता दिसून आली त्यावर प्रकाश टाकायचा म्हणून हे करतोय. प्रसिद्धीसाठी करतोय ही  टीका माझ्यावर होणार हे मी गृहीत धरून आहे. पण, हा संकट काळ संपलेला नाही दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येणार त्यामध्ये आपल्या मुलांनाही बाधा होऊ शकते हे लक्षात ठेवा. आणि सरकारी यंत्रणाव्यतिरिक्त महाराष्ट्रात बुद्धिष्ट समाजाने पुढे येऊन एक मदत यंत्रणा उभारायला पाहिजे. आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काम करायला पाहिजे. ते ग्राउंडवर काम करतात त्यांना रिसोर्सेस आणि वैद्यकीय मार्गदर्शन, मदत आपण दिली पाहिजे. माझ्यासारखे काही अधिकारी स्वतःच्या वेळेनुसार सोशल काम करतात तेवढेच पुरेसे नाही. जेव्हा समाजाला गरज आहे तेव्हा आपणच पुढे यायला पाहिजे. खूप श्रीमंत असूनही लोकांना आपला जीव गमावला आहे त्यामुळे धनाची मर्यादा समजून घ्यायला हवी.


बुद्धवचन आपण भाषणांमध्ये वापरतच असतो. आचरणामध्ये मात्र कधी येणार? हा मोठा प्रश्न आहे. काहीच पर्मनंट नाही हेही समजतो. पण त्याप्रमाणे कारवाई का करत नाही? हाही प्रश्नच आहे. आपल्याकडे बरेच लोक संघर्षातून पुढे आले आहेत. त्यामुळे तुमची मुले सुद्धा संघर्षातून पुढे येऊ शकतात. त्याच्याकरिता खूप साधनसामुग्री जमवून ठेवणेची गरज नाही हे समजून घ्यायला पाहिजे.

 दुसऱ्या बुद्धिस्ट देशातील लोक आपल्याला कोरोना संकट आहे म्हणून मदत करतात. पण, आपण मात्र एवढ्या संख्येने असूनही पुढे येत नाही, दान परिमिती चे आचरण आपण करत नाही तर कसले आपण बुद्धिस्ट??? कुशल कामाचे महत्त्व आपण समजून घेऊन चांगले काम करायची संधी मिळाली आहे हे लक्षात ठेवायला हवे. 

त्यानिमित्ताने तरुणांनीही माझी विनंती आहे की, या घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्या आई-वडिलांपेक्षा आणखी कसे चांगले काम करता येईल त्याचे नियोजन करा. स्वतःचा, घरचा खर्च कमी करून गरजूंना मदत करता येईल का? हे बघा. पुढचा काळ तुमचा आहे. समाजाचे आधारस्तंभ व्हायला पाहिजे हा    बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आग्रह आहे.  ह्या निमित्ताने एकदा वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुणांसोबत ऑनलाइन मीटिंग घेऊन धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनापर्यंत एक RESPONSE TEAM,ज्या मधे ज्यांच्याकडे Resources आहेत त्यांनाही सोबत घेऊन  बनवायचा विचार    व्यक्त करतो. तुमच्यामध्ये ऊर्जा आहे. तुम्ही मेहनती आहात, म्हणून या सर्व आचरणातून काहीतरी कुशल घडेल अशी आशा बाळगून, 

सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन इथे थांबतो. 


जय भीम! नमो बुद्धाय!! 

No comments:

Post a Comment

Pages