महाकवी वामनदादा आंबेडकरी क्रांतीचळवळीच्या ओठांवरील क्रांतीचे गाणे आहे.जे कधीच विरणारं नाही..
चाळीसगाव येथील मा.हरीभाऊ झुरा निकम यांची माझी प्रत्यक्ष मुलाखत झाली होती.त्यांनी सर्वप्रथम वामनदादांची भेट बाबासाहेबांशी घालून दिली.मा.रतनकुमार पंडागळे यांनी वामनदादांवर गौरव ग्रंथ प्रसिध्द केला.त्यात वामनदादांची मुलाखत आहे.त्यात वामनदादांनी या आठवणीला उजाळा दिलाय.
वामनदादा माझ्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत.मराठवाड्याच्या संरंजामी,जातीयग्रस्त सामाजिक व्यवस्थेला वैतागून गावगाडा झुगारून स्वातंत्र्याच्या दरम्यान अनेक दलित पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले.इंग्रजांचे अधिपत्य असल्याने शिक्षणाची ,मिशनरी चळवळ जोरात होती.साखर कारखाने ऊभे रहात होते.गावकुस नसलेल्या कारखाना परिसरात गावगाड्याची पाशवी पकड सैल झाली होती.कामगार ,कष्टकर्यांची नवी वसाहत विस्तारत होती.त्यांच्या हातात पै पैसे खुळखुळू लागले होते.अहमदनगर,कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा परिसरात चांगदेवनगर,अठरावाडी,सतरावाडी परिसर या नव्या दलित कामगार वसाहतीत वामनदादांच्या मैफली रात्र रात्रभर पेटत होत्या.आंबेडकर पेरत होत्या.मीही जमिनीवर ,मातीत बसून रात्रभर या मैफलीत हे नव्या युगभानाचे गाणं मेंदूत साठवत होतो.चंद्र ऊगवायचा तसा तसा वामनदादांचा पहाडी आवाजही उंचावत जायचा.पहाटे पर्यंत... नंतरही पुणतांबा आशाकेंद्र मिशनरी दवाखान्याच्या गेस्टहाऊसला वामनदादांचा बर्याचदा मुक्काम असायचा.याठीकाणी त्यांना गाणे लिहितांना मी अनेकदा पाहिले.मी बुध्द विहारासाठी बाबासाहेबांचे भव्य तैलचित्र केले होते.ते चित्र पाठीमागे आणि पांढर्या शुभ्र नेहरू शर्ट पायजम्यावर गुडघ्याावर बसलेले वामनदादा मी वादळ वारा ...हे वादळ होऊन गात..ते चित्र माझ्या मेंदूत स्पष्ट आहे..
काय होते दादा?
त्यांनी बाबासाहेब,त्यांचे क्रांतीतत्वज्ञान रक्त आणि मेंदूत सामावून घेतले होते. आंबेडकरी तत्वज्ञानाचे गाण्यातून अन्वयार्थ लावणारे ते भाष्यकार होते. बाबासाहेब आणि ते अद्वैत झाले होते. बाबासाहेबांचे क्रांतीकारकत्व अगदी साध्या शब्दात सामावून घेऊन ते जनसामान्यांपर्यंत पोहचवणारे सांस्क्रुतिक योध्दे होते.कारण बाबासाहेब म्हणतात , मी सांस्क्रुतिक युध्दावर आहे.या युध्दाचे ते सेनापती होते. वामनदादां एेवढे आंबेडकरी क्रांतीचे यथार्थ आकलन अभावानेच आढळते..".तिन वर्षाचा माझा भीमा लागला लुटू लुटू चालायला.." अशी ऊथळ गाणी त्यांनी लिहिली नाही..
बाबासाहेबांनी ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे या देशाचे दोन मुख्य शत्रु असल्याचे स्पष्ट केले.बाबासाहेबांच्या या क्रांतीकारी भाष्याकडे डोळेझाक करण्यात आली.. जाती अंत की वर्ग अंत ? हा तिढा निर्माण करून बाबासाहेबांनी स्पष्ट केलेल्या शत्रूंकडे दुर्लक्ष झाले.
वामनदादा मात्र हे शत्रू जोखतात,व गाण्यातून हा धागा अचूक पकडतात.." सांगा आम्हाला बिर्ला ,बाटा,टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे हाय हो? " ब्राम्हणशाही आणि भांडवलशाहीला गितातून अचूक टिपणारा ,पकडणारा हा महाकवी नव्हे काय?
जागतिकीकरणावरही भाष्य करणारा हा द्रष्टा महाकवी आहे. ... बाबासाहेबांचे क्रांतीकारी तत्वज्ञान मेंदूत रिचवून घेतल्यानेच विस हजारापर्यंत गाणी त्यांनी लिहिली. त्यांनी आपली वर्गीय चेतना जराही ढळू दिली नाही...बाबासाहेबांनी पुकारलेल्या सांस्क्रुतिक युध्दावरील हा सेनापती..जोपर्यंत आंबेडकरी चळवळ राहिल,जो पर्यंत शोषण राहील तो पर्यंत वामनदादाचे गाणे जिवंत राहिल.मुर्दाड मनात लढण्याची चेतना पेटवत राहिल.
भविष्यात आंबेडकरी क्रांती प्रस्थापित झाली तर महासूर्यकुळातील महाकवी म्हणून वामनदादांचे नाव , त्यांची गाणी क्रांती इतिहासाच्या पानावर सळसळत राहील.
बाबासाहेबांना सूर्यफुले वाहतांना या कविच्या समाधिवरही काही फुले वाहावीच लागतील...वामनदादाचं ते स्वप्न होतं.
"समाधीकडे त्या वाट ही वळावी..
तिथे आसवांची फुले ही गळावी..
तिथे थोडी जागा मला ही मिळावी.....
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी...
राजानंद सुरडकर
No comments:
Post a Comment