ना.दानवेंच्या समोर रेल्वेविषयक प्रश्न मांडणार- आ.भीमराव केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 July 2021

ना.दानवेंच्या समोर रेल्वेविषयक प्रश्न मांडणार- आ.भीमराव केराम

किनवट ,दि.१२ :  भारतीय जनता पक्षाचे जालना येथील सलग पाच वेळा विजयी झालेले खा. रावसाहेब दानवे यांना नुकतेच घोषित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रेल्वे राज्यमंत्री पद सोपवण्यात आल्याने, मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठवाडा रेल्वेचा अनुशेष यामुळे भरुन निघणार आहे. तसेच आपण ना.रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील रेल्वे विषय प्रश्न मांडणार असून, त्या सोडवण्याकरिता पाठपुरावाही करणार असल्याचे आ. भीमराव केराम यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.

   किनवट स्थानकातून धावणार्‍या रेल्वे गाड्या संदर्भातील निवेदन आपण ना.दानवे यांच्याकडे करणार आहोत.यात मुंबई ते नांदेड अशी धावणारी तपोवन एक्सप्रेस गाडी ही आदिलाबाद पर्यंत पुढे वाढवावी ही प्रमुख मागणी त्यांच्या समक्ष ठेवणार आहे. तसेच नांदेड पर्यंत येणार्‍या गाड्या ज्या तांत्रिक कारणामुळे आदिलाबाद किंवा किनवटपर्यंत येत नाहीत, ते म्हणजे येथे गाड्यांच्या देखभाली करिता आवश्यक असलेली पिटलाईन उपलब्ध नाही. ती पिटलाईन आदिलाबाद येथे उभारण्यात आली तर आपोआप याचा लाभ किनवट-माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे याकरिता पाठपुरावा करुन किनवट माहूर विधानसभा क्षेत्राला राज्याच्या व देशाच्या नकाशावर दळणवळणाद्वारे जोडण्यास मदत होणार असल्याचेही आ.केराम यांनी  सांगितले.


       किनवट स्थानकातून जाणारी साप्ताहिक दिक्षाभूमी एक्सप्रेस जे की, बौद्ध तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गयापर्यंत जाते. त्याच सोबत हिंदूंसाठी पवित्र असलेल्या वाराणसी येथे पूर्णा- पटना एक्सप्रेस जाते. ह्या दोन्ही एक्सप्रेस साप्ताहिक ऐवजी दररोज सोडण्यात यावी. यामुळे कोल्हापुर ते वाराणसी व बौध्द गया पर्यंत किनवटचा संपर्क जोडला जाणार आहे. यासोबच किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील शेतकर्‍यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता  ज्या योजनांद्वारे शेतकर्‍यांचा  माल रेल्वे द्वारे वाहतूक करण्यास रेल्वतर्फे ज्या सवलती  उपलब्ध करुन दिल्या जातात, त्या सुविधा किनवट रेल्वे स्थानकावर कार्यान्वित करण्याकरिता देखील प्रयत्न करणार आहे.


       या सोबतच किनवट माहूर तालुक्यातील अनेक नागरिक हे शिक्षण व नोकरी निमित्त नांदेड येथे ये-जा करीत असतात. त्यांच्याकरिता सायंकाळी किनवट व नांदेड येथून तथा सकाळी व संध्याकाळी नांदेड येथून जलदगती रेल्वे सुरु करण्याकरिता  प्रयत्न करणार असल्याचे आ. केराम यांनी सांगितले आहे. किनवट येथून सुटणार्‍या कृष्णा एक्सप्रेसला मुदखेड स्थानकावर अजंठा एक्सप्रेस सोबत कनेक्ट करण्यात यावे ही मागणी देखील करणार आहे. ज्यामुळे किनवट येथून रात्रीतून मुंबई, औरंगाबाद गाठता शक्य होईल. त्याच सोबत प्रवाशी गाड्यांची संख्या देखील वाढविण्यात यावी व नांदेड ते बंगलुरु अशी धावणारी हंपीलिंक एक्सप्रेस ही गाडी आदिलाबाद ते बंगलुरु अशी सुरू करण्याचे रेल्वेच्या विचाराधीन असून, त्यास तात्काळ आदिलाबादपर्यंत सोडावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Pages