सांस्कृतिक परिवर्तनाचा 'मावळा' व्हावं म्हणून - श्रीरंजन आवटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 July 2021

सांस्कृतिक परिवर्तनाचा 'मावळा' व्हावं म्हणून - श्रीरंजन आवटे

छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेइतके राजकीय भांडवल कुठल्याच ऐतिहासिक व्यक्तीचे झाले नसावे. इतिहासाची सोयीस्कर मांडणी करुन आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न विविध गटांनी केला. शिवरायांचे पोवाडे गाताना, त्यांच्या गौरवीकरणाचे ढोंग करताना धर्मनिरपेक्ष, समतावादी राजाचे अलगद अपहरण केले गेले. त्यांच्यावर मालकी हक्क सांगणा-यांनीही त्यांना जातीत कोंडले. 


 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे राजकुमार तांगडे यांनी लिहिलेले नाटक या राजकारणाची चिरफाड करण्यात यशस्वी झाले. हे नाटक ही मराठी सांस्कृतिक विश्वातील महत्वाची घटना आहे, असं मला वाटतं. सांस्कृतिक राजकारणाचा आशय कलात्मक आणि लोकप्रिय पद्धतीने पोहोचवण्याचं श्रेय या नाटकाला आहे. 


'शिवाजी कोण होता' हे कॉ. गोविंद पानसरे यांनी सांगितलं मात्र आजही आपणाला छत्रपती शिवरायांचं खरं रुप समजत नाही कारण शाहिरांना आपण इतिहासकार आणि संशोधक मानतो. पोवाडे आणि बखरी हा इतिहास नसतो. आरत्या आणि भूपाळ्या हे संदर्भ किंवा वस्तुनिष्ठ तपशील नसतात. अमोघ वक्तृत्वशैली म्हणजे दाखले नसतात. शाहिरांना मठाधिपती करुन त्यांच्या चरणी लीन होणा-यांनी किमान स्वतःला इतिहासाचे अभ्यासक म्हणू नये. 


वयाचा कोणताही टप्पा पूर्ण करणा-या कोणाही व्यक्तीस सदिच्छा आहेतच; मात्र ऐतिहासिक वस्तुस्थितीचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्याचं अपश्रेय त्यांच्या तराजूत ठेवायला विसरता कामा नये. 


'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात शिवरायांचा जिरेटोप बसेल असं डोकं सापडत नाही. मला वाटतं आपल्या सर्वांना या प्रतीकांचा नेमका अर्थ समजेल तेव्हा 'याचं काय करायचं?' असा नाटकातल्या सारखा प्रश्न आपल्याला पडणार नाही आणि तोच सुदिन असेल. मग शिवरायांचं अपहरण महाराष्ट्रास भूषणावह ठरणार नाही. 


मुद्दा केवळ शिवरायांचा नाही तर इथल्या सांस्कृतिक राजकारणाचा आणि परिवर्तनाचा आहे, हे लक्षात येईल तेव्हा व्यापक पट नजरेच्या टापूत येईल आणि मग प्रत्येक मावळा 'सुराज्याचे' स्वप्न पाहू लागेल.

     - श्रीरंजन आवटे

No comments:

Post a Comment

Pages