‘क्रॉपसॅप’ अंतर्गत शेती कार्यशाळेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 30 July 2021

‘क्रॉपसॅप’ अंतर्गत शेती कार्यशाळेचे आयोजन

किनवट, दि.30 : तालुका कृषी कार्यालयातर्फे मौजे अंबाडीतांडा, दहेली व गणेशपूर येथे ‘क्रॉपसॅप’ अंतर्गत सोयाबीन, कापूस आदी पिकांबाबत कार्यशाळा घेण्यात येऊन, शेतकर्‍यांना  रोग व किडींपासून पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आदीबाबत  मार्गदर्शन करण्यात आले.


    निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अवघड झालेला आहे; त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी कमी पाण्यावर अधिक उत्पादन कसे घ्यावे तसेच कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांवर पडणारे रोग व कीड रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. यात कापसाचे अतोनात नुकसान करणार्‍या शेंदरी व गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शनासह एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, दशपर्णी अर्क, निंबोळीअर्क तयार करून उपयोग करणे या विषयी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या कार्यशाळेत पिकांवरील किडींपैकी मित्रकिडी व शत्रूकिडी यांची ओळख करून देऊन, त्यांचे कार्य तसेच पक्षी थांबे, पिवळे आणि नीळे चिकट सापळ आदी विषयी माहिती देण्यात आली. त्या नंतर शेतकर्‍यांचे गट करून त्यांना पिकांचे निरीक्षण करून, दिलेल्या माहितीच्या आधारे किडींची प्रत्यक्ष ओळख करून घेण्यास मदत करण्यात आली. 


     कृषी सहायक एस.पी.बोंदरवाड यांनी दहेली येथे, कृषी सहायक शरद नीलकंठवार यांनी अंबाडीतांडा येथे तर डी.एच.दासरवार यांनी गणेशपूर येथे या शेती कार्यशाळेचे आयोजन केले होते. अंबाडी येथील शेतीकार्यशाळेच्या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक गजानन भालेवाड, सधन शेतकरी उमाजी चव्हाण, मारोतराव मुनेश्वर, आनंदराव ठमके, राजू ठमकेसह बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages