बुद्ध,फुले ,शाहु,आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची पेरणी करणारी प्रबोधन चळवळ महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी,गायक, शाहीर व संगीतकार यांनी गतीमान केली त्यात शाहीर बाबुराव गाडेकर यांचे योगदान मोलाचे आहे.
शाहीर बाबुराव गाडेकर यांचा जन्म नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील पिंपळढव या गावी झाला. आई हौसाबाई व वडील खंडोजी गाडेकर यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करून व शिक्षण देवून बाबूराव यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली. त्यांच्या घरात कोणीही कलावंत नव्हते, परंतु गावातील भजनीमंडळातील गीताचा त्यांच्या वर प्रभाव पडल्यामुळे बाबूरावामध्ये गायणाची आवड निर्माण झाली.
गावात काही ही प्रगती होणार नाही,हे जाणून आई-वडिलांनी पिंपळढव गाव सोडले व तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे भोकर येथे राहावयास आले. तेथील लोकसंपर्क व प्रबोधनपर कार्यक्रम यामुळे बाबुराव गाडेकर यांच्यावर बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे संस्कार होवू लागले.तसेच वामनदादा कार्डक यांची गीतं ऐकून ऐकून ते स्वतः ही गीतगायनाचे कार्यक्रम करू लागले.ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते खेडो-पाडी,वाडी-तांड्यावर भीमजयंती-बुद्धजयंतीचे सोहळे आयोजित करत तिथे लोक बाबुराव गाडेकर यांना कार्यक्रमास बोलवायचे आणि गाडेकर हे सुद्धा कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता संचासाहित हजर राहून कार्यक्रम यशस्वी करायचे.यामुळे त्या परिसरात शाहीर बाबुराव गाडेकर यांचे चांगलेच नाव झाले होते.
गाडेकर हे पुर्वाश्रमीचे मातंग समाजातील असून त्यांच्यावर गीत गायनामुळे बुद्ध-फुले -शाहू-आंबेडकरी विचारांचा एवढा प्रभाव पडला की,कुणाचीही पर्वा न करता आपला परिवार सांभाळत-सांभाळत त्यांनी प्रबोधनाचे काम जोमाने चालूच ठेवले. स्वतः शाहिरी करून बुद्ध, फुले,शाहु, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची गाणी पहाडी आवाजात सादर करायचे. परीसरात लोकं त्यांना कार्यक्रमासाठी बोलवू लागले. गायनाचे कार्यक्रम इतरत्र खुप ठिकाणी झाले .महाराष्ट्रात पुणे, भिमा कोरेगाव, सांगली,बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातुर, परभणी, यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, अकोलाव ईतर राज्यात आदिलाबाद, कर्नाटक, औराद जि. बीदर अशा विविध ठिकाणी दोन हजार च्या वर कार्यक्रम केले.
सन 2009 साली त्यांनी प्रा.अशोककुमार दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "भीम माझा बापाचा बाप" व "परिवर्तनाचं निळं वादळ",भीमामुळे झाले मोदी प्रायमिनिस्टर" ह्या तीन सीडी काढल्या.त्याचे संगीत व गायन स्वतः गाडेकर यांनीच केले.ह्या सीडीला त्या काळी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.स्टेज वरील कार्यक्रम संपला की,लोक सीडी विकत घेऊन जात.
बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा घेवून प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असतांना गाडेकर यांच्यात वैचारिक परिवर्तन घडून आले.माणूस म्हणून मानासन्माचे जीवन जगायचे असेल तर आता आपण हिंदू धर्माला सोडून बौद्ध म्हणून जीवन जगले पाहिजे अशी गाडेकरांची मनोभूमिका तयार झाली.पत्नी पद्मिनबाईने होकार दिला आणि यातूनच गाडेकर यांनी आपल्या परिवारासह नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 2 ऑक्टोबर 2006 रोजी पुज्य भदंत सुरई ससाई यांच्या हस्ते बौद्ध धम्म स्वीकारला.त्यामुळे मी जीवनात आनंदी झालो असे ते सांगतात. धम्म स्वीकारून आल्यानंतर भोकर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे व वारगडे यांनी गाडेकर यांचा परिवारासह भोकर शहरातून मिरवणूक काढून खूप मोठा सत्कार केला.गाडेकर सर्व रूढी परंपरेला झुगारून बौद्ध झाले. सन 2017 साली त्यांनी आपल्या मुलीचा मंगल परिणय बोद्ध पद्धतीने केला.या मंगल परिणयाची पंचक्रोशीत चर्चा झाली .बाबुराव व त्याची पत्नी पद्मिनबाई,त्यांची तीन लेकरे हा पुर्ण परिवार बुद्ध धम्म स्वीकारून शुद्ध झाला .समाजही त्यांच्याप्रमाणे सुधारला पाहिजे अशी ते अपेक्षा व्यक्त करतात.त्यांच्या संचात तबला सचिन कांबळे,ढोल वादक साहेबराव सोनसळे,बंँजो उत्तम रावळे व कोरसला सूर्यकांत डोंगरे,त्यांची दोन्ही मुले प्रसेनजित व तथागत गाडेकर सोबत असतात.परिवर्तनाच्या या लढ्यात शाहीर बाबूराव गाडेकर यांच्या क्रांतीकारी प्रबोधनाने समाजाला निश्चितच चांगली दिशा मिळेल व बुद्धाचा मावनमुक्तीचा व सन्मार्गाचा मार्ग कळेल!
त्यांची मनपसंत गीतं
१) बुद्ध कबीर आणि जोतिबा फुललेला
तयानिच समतेचा मार्ग दावीला
या कोटी कोटी लेकरांची वंदना भीमाला.
२)शिकलेना कुणी भीमा एवढे
विद्वान झुकती भीमापुढे
गांधी टिळक सावरकर हारले भीमापुढे
३)सरड्यापरी असा मान करु नको वर
आधी जयभीम कर आधी जयभीम कर
४)धम्माची दिक्षा घ्यावे सुखी जीवन जगावे
बुध्दाच्या विचारांने नितीमान तुम्ही व्हावे
५)चिंता माझी करु नका साहेब,रमा बोले भीमाला
मन लावून अभ्यास करा ,सांगते तुम्हाला.
एक शेर-
विषमतेकडुन चला समतेकडे
अंधारातून चला प्रकाशाकडे
मंदिराकडुन चला विहाराकडे
इथेच मिळते मानवाला करुणा
मैत्रीभाव आणि मानवतेचे धडे
त्या नीच रुढीला गाडण्यासाठी
गाडेकर चला आता बुद्धाकडे.
पुरस्कार व सन्मान
सांगली येथे 2012 रोजी झालेल्या भीमजयंती कार्यक्रमात त्यांना शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नांदेड येथिल त्रिरत्न भवरे कामारीकर यांच्या बहुजन युवा टायगर प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने उत्कृष्ठ शाहीरी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले गेले. सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती सोहळा निमित्त गाडेकर यांचा प्रबोधनकार म्हणून संयोजन समितीच्या वतीने सत्कार केला. जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांनीही लार्ड बुध्दा टि.व्ही वर त्यांची मुलाखत प्रसारित केली
संदेश
शाहीर बाबुराव गाडेकर समाजाला प्रबोधनातुन दिशा देतांना सागतात आपणही भगवान बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपले जीवन सुधारावे .
शाहिर गाडेकरांच्या पुढील गतीमान प्रबोधन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद.
- महेंद्र नरवाडे किनवट(नांदेड)
मो.न.7066650366.
No comments:
Post a Comment