अतिवृष्टीमुळे 22 हजार 459 हेक्टरवरील पिके बाधित किनवट तालुक्यात 31 हजार 249 शेतकर्‍यांना फटका - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 August 2021

अतिवृष्टीमुळे 22 हजार 459 हेक्टरवरील पिके बाधित किनवट तालुक्यात 31 हजार 249 शेतकर्‍यांना फटका

किनवट, दि.27 :    जुलै महिन्याच्या 21 तारखेला रात्री सातही मंडळात झालेल्या धुवाधार अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील जिरायत व बागायत मिळून  एकूण 22 हजार 459 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीसह संपूर्ण जिल्ह्यातील जिरायती व बागायती मिळून एकूण 44 हजार 609 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले; असा अंतीम संयुक्त सर्वेक्षण अहवाल महसूल विभागाने राज्याच्या कृषी आयुक्तालयाला नुकताच पाठविला आहे. यात किनवट तालुक्यातील 31 हजार 249 शेतकर्‍यांना तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 71 हजार 221 शेतकर्‍यांना या अतिवृष्टीचा फटका बसल्याची माहिती अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हानीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी  एकूण 30 कोटी 35 लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून, यामध्ये  किनवट तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 15 कोटी 28 लाख 08 हजार 300 रुपयांच्या अपेक्षित निधीची मागणी नोंदविलेली आहे.


  किनवट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जुलै महिन्याच्या 21 तारखेला अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनाला तत्काळ अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व नुकसानग्रस्त भागात महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त यंत्रणेने पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला अहवाल दिला होता. यात या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सखल भागात पाणी साचून पिके चिबडली तर जोरदार पावसामुळे अनेक भागातील जमिनी खरडून गेल्यात.    


         अहवालामध्ये  किनवट तालुक्यातील जिरायत पिकाखालील 33 टक्क्यापेक्षा जास्त बाधित झालेले एकूण  क्षेत्र 22 हजार 446 हेक्टर असून, त्यातील सोयाबीन पिकाचे बाधित क्षेत्र 8 हजार 978.40 हेक्टर तर कापूस पिकाचे बाधित क्षेत्र 13 हजार 467 .60 हेक्टर आहे.  तसेच तालुक्यातील बागायत पिकाखालील एकूण बाधित क्षेत्र केवळ 13 हेक्टर असून, ते  हळद या पिकाचे आहे.


    तालुक्यामध्ये कापूस व सोयाबीन या जिरायत पिकामधील हानीग्रस्त झालेल्या एकूण शेतकर्‍यांची संख्या 31 हजार 236 आहे. यांना प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये प्रमाणे  15 कोटी 26 लक्ष 32 हजार 800 रुपये एवढ्या अपेक्षित निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच बागायत पिकातील हळदीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या 17 असून, त्यांना 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 1 लाख 75 हजार 500 रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.


      जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हिमायतनगर, उमरी, कंधार, धर्माबाद, नायगाव, लोहा, भोकर, नांदेड, बिलोली,  देगलूर व किनवट तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान किनवट तालुक्यात  झाले असून, शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.


 


जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे मागणी केलेला अपेक्षित निधी


 हिमायतनगर 09 लाख 37 हजार, उमरी 10 लाख 40 हजार,  कंधार 10 लाख 81 हजार, धर्माबाद 20 लाख 88 हजार,  नायगाव 26 लाख 38 हजार, लोहा 70 लाख 04 हजार, भोकर 81 लाख 03 हजार, नांदेड 89 लाख 90 हजार, बिलोली 5 कोटी 12 लाख,  देगलूर 06 कोटी 76 लाख,   तर किनवट 15 कोटी 28 लाख असा एकूण सुमारे 30 कोटी 35 लाख रुपये निधीची मागणी केली आहे. अर्धापूर, मुखेड, मुदखेड, हदगाव व माहूर या पाच तालुक्यांत नुकसान झाले असल्याचे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages