किनवट, दि.21 : दिशाभूल करणारे हमालीचे प्रमाणपत्र जोडून किनवट बाजार समितीचे हमाल व मापाडी संचालकपद मिळविणार्या अ.सत्तार अ.रमजान यांचे संचालकपद रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शे.इस्माईल शे.मदार यांनी येथील सहाय्यक निबंधकांकडे दिले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी अ.रमजान यांनी दिलदार गाडी हमाल संघटनेचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यात अ.रमजान हे व्यापारी संकुल, भुसार दुकान व कृषी केंद्रात हमाली करत असल्याचे नमूद केले असल्यामुळे, त्यांना बाजार समितीकडून हमालीचा परवाना दिल्या गेले होते. त्याच परवाना आधारे त्यांनी बाजार समितीची निवडणूक लढवून हमाल व मापाडी संचालकपद मिळविले. वास्तविक पाहता अ.रमजान हे हमाली करीत नसून, ते ‘सत्तार ट्रान्सपोर्ट’ या माल वाहतूक करणार्या कंपनीचे मालक असून, त्याचे कार्यालय आंबेडकर चौकाच्या जवळच माहूर मार्गावर आहे. या ट्रान्सपोर्ट द्वारे ते व्यापार्यांच्या विक्रीचा माल नांदेड, नागपूर, यवतमाळ, आदिलाबाद, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी वाहतूक करतात. तसेच यापोटी व्यापार्यांकडून कमिशन घेऊन त्यांच्या दुकानावर विक्रीमाल पोहोचवितात. त्यामुळे त्यांनी हमाल असल्याची खोटी बतावणी करून संचालक पद मिळविले असल्यामुळे, या प्रकरणी चौकशी करून त्यांचे बाजार समितीचे संचालकपद व हमाली परवाना रद्द करावा, अशी मागणी शे.इस्माईल शे.मदार यांनी केली आहे. निवेदनाची प्रत बाजार समितीचे सभापती व सचिवांकडेही देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment