किनवट, दि.28 : मांडवा शिवारात पट्टेदार वाघाने गाय व बैलाची शिकार केल्यानंतर लोकजागृतीसाठी वनविभागाने मांडवा-घोगरवाडी परिसरात जंगलाच्या प्रमूख मार्गावर 22 सप्टेंबर पासून सावधगिरीचं फलकं लावायला सुरुवात केली आहे. या फलकांमुळे नागरिकांमध्ये जागरुकता येऊन ते पाळीव जनावरांना जंगलात चरायला जाण्यापासून टाळतील अशी अपेक्षा आहे. तसेच वाघ-बिबटांचा वावर वाढला असल्यामुळे, अवैध जंगलतोडीवर बराचसा आळा बसला आहे, अशी नागरिकांत चर्चा आहे.
विदर्भातील पांढरकवडा जवळील टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची संख्या वाढल्यामुळे, अंदाजे तीन ते चार वर्षाचे तीन वाघ लगतच्या किनवटच्या जंगलात व पैनगंगा अभयारण्यात येऊन आपापले अधिवास क्षेत्र निश्चित करून रहात असल्याचे समजते. टिपेश्वर अभयारण्यात अधिकृतरित्या रेकार्डला 18 ते 19 वाघांची नोंद असली तरी प्रत्यक्षात 30 ते 32 वाघ असल्याचे सांगितले जाते. वन्यजीव तज्ज्ञांच्या मतानुसार अधिवासासाठी नर वाघाला किमान 80 चौरस किलो मीटर तर वाघिणीला किमान 20 चौरस कि.मी.क्षेत्र लागते. टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र 148 चौरस किलोमीटर आहे. तज्ज्ञांच्या मते तिथे जास्तीत जास्त दोन नर व पाच मादी वाघ संचार करू शकतात. त्यामुळे इतर वाघांना तुलनेत अधिवास क्षेत्र कमी पडत असल्यामुळे, ते आजूबाजूच्या जंगलांचा आश्रय घेत आहेत. वाघाचे बछडे साधारणत: दीड ते दोन वर्षाची झाली की, त्यांची आई त्यांना सोबत ठेवत नाही. विशेषत: नर वाघ आपले क्षेत्र शोघण्यासाठी बाहेर पडतात. मांडवा येथील पशूंवरील हल्ला हे या स्थलांतर केलल्या पट्टेदार वाघाचा प्रताप असल्याचे कळते. तसेच किनवटच्या जंगलात अस्वलांचेही प्रमाण वाढले आहे. तीन वर्षापूर्वी मांडवा येथेच अस्वलाच्या हल्ल्यात एका आदिवासी इसमाचा मृत्यू झाला होता. त्या आदिवासी इसमाचे शव अंधार पडल्यानंतर तसेच जंगलात राहिल्यामुळे, त्याची प्राण्यांनी रात्रभरात फारच विटंबना केली होती. ते प्रकरण वनविभागावर विशेषत: सहायक वनसंरक्षकावर फारच शेकले होते.
31 ऑगस्ट रोजी पट्टेदार वाघाने मांडवा शिवारात गाय व बैलाला ठार मारले. तत्पूर्वी 28 ऑगस्ट रोजी कालवड व तरण्याबांड गोर्ह्याचाही फडशा पाडला होता. यासर्व पार्श्वभूमीवर वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जंगलव्याप्त परिसरात असलेल्या गावांमध्ये कुणीही एकटे-दुकटे जंगलात जाऊ नये, पाळीव पशूंनाही चरण्यासाठी नेऊ नये, शेतात जातांना समूहाने जावे आणि संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी घराकडे परतावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वनविभागाने या भागात गस्तही वाढविली असून, वाघ व बिबटांचा संचार असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. अशाच ट्रॅप कॅमेर्यात गायीवर हल्ला केलेला पट्टेदार वाघ कैद झाला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी अजून एखादी दुर्घटना घडू नये म्हणून मांडवा बीटच्या वनरक्षक कोमल मरसकोल्हे यांच्या हस्ते जनजागृतीसाठी फलकं लावण्यात आलीत. फलकांवर दिलेल्या सूचना पाळल्या तर निश्चितच पशू वा माणसांचे प्राण वाचतील, एवढे मात्र निश्चित !
No comments:
Post a Comment